Friday, April 26, 2024
Homeनगरऑनलाईन फॉर्म भरून शासनाच्या कर्ज योजनेचा लाभ घ्या

ऑनलाईन फॉर्म भरून शासनाच्या कर्ज योजनेचा लाभ घ्या

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Devalali Pravara

नगरपरिषद हद्दीतील देवळाली प्रवरा शहरातील पथविक्रेत्यांना आर्थिक सक्षम होण्यासाठी पीएम स्टेट्व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी अंतर्गत राष्ट्रीयीकृत बँकेकडून देवळालीप्रवरा शहरातील 268 लाभार्थींना आत्तापर्यंत कर्ज उपलब्ध झालेले असून अजूनही रस्त्यावर व्यवसाय करणार्‍या लाभार्थींना प्रथमतः 10 हजार रुपये व नंतर 20 हजार रुपये कर्ज राष्ट्रीयीकृत बँकेकडून उपलब्ध होत असल्याने कर्जाची आवश्यकता असणार्‍या पथविक्रेत्यांनी ऑनलाईन फॉर्म भरावेत ,असे आवाहन नगरपरिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.

- Advertisement -

केंद्र व राज्य शासन नगरविकास विभागाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार देवळालीप्रवरा नगरपरिषदेने दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहरातील पथविक्रेत्यांचे कायम, हंगामी व तात्पुरत्या गटात गेल्या दोन वर्षांपूर्वी बायोमेट्रिक पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आले, याद्वारे एकूण 331 पथविक्रेत्यांची नोंदणीकृत यादी उपलब्ध झाली आहे. त्यानंतरही रस्त्यावर फिरून आपला व्यवसाय करून कुटुंबाची उपजीविका करणार्‍यांना भांडवल म्हणून बँकेमार्फत पतपुरवठा करण्याच्या सूचना केंद्र शासनाकडून प्राप्त झाल्या होत्या.

पथविक्रेत्यांना सूक्ष्म पतपुरवठा करण्याच्या मार्गदर्शक सुचनेनुसार लाभार्थींनी नियमित कर्ज फेडले तर कर्जास 7 टक्के व्याज अनुदान मिळणार आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक गरजुंना मिळावा यासाठी देवळालीप्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली असून या समितीद्वारे प्रत्येक लाभार्थींना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले होते. त्यामुळे देवळालीप्रवरा शहरातील 400 लाभार्थींनी कर्ज मागणीसाठी ऑनलाईन फॉर्म भरले होते. त्यापैकी आज अखेर 268 लाभार्थ्यांना 10 हजार रुपये प्रमाणे कर्जाचे वितरण झाले आहे. तर नियमित परतफेड केलेल्या 23 लाभार्थींना 20 हजार रुपये कर्ज प्राप्त झाले आहे.

रस्त्यावर भाजी, पाव, अंडी, भांडी, बांगड्या, कपडे विकणारे फेरीवाले यांनी कर्ज अर्जास शिफारस होण्यासाठी आधार कार्ड, कुपन, मोबाईल क्रमांक अपडेट करून नगरपरिषदेच्या दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका विभागात संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासक, मुख्याधिकारी व सहायक प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या