Friday, April 26, 2024
Homeधुळेदेऊरची शिवार वस्ती ऐन सणासुदीत उजळली

देऊरची शिवार वस्ती ऐन सणासुदीत उजळली

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

कधी बिबट्याची दहशत तर कधी जंगली श्वापदाची भिती, त्यात सिंगल फेज विज वाहीनी बंद असल्याने अंधाराच्या साम्राज्यात गेल्या सहा महिन्यापासून तालुक्यातील देऊर येथील शेत शिवारात राहणार्‍या रहिवाशांना जीव मुठीत धरुन रात्र काढावी लागत होती.

- Advertisement -

अशा वेळी आ.कुणाल पाटील यांनी तातडीने दखल घेत विज वाहीनी सुरु करण्याच्या सूचना संबधितांना दिल्या.

त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात देऊरची शेतशिवारातील वस्ती व तेथील घरे प्रकाशाने उजळून निघाली आहे.

त्यामुळे रहिवाशांना निडरपणे वावरण्याचा आधार मिळाला. तर विद्यार्थ्यांना विजेच्या प्रकाशात अभ्यास आणि गृहीणींना स्वयंपाक करण्याची सोय झाली आहे.

धुळे तालुक्यातील देऊर आणि साक्री तालुक्यातील ककाणी, म्हसदीशी सलग्न असलेल्या शेतशिवारात राहणार्‍या घरातील शेतकरी तसेच जागल्या कुटूंबातील रहिवाशी गेल्या सहा महिन्यापासून वीज जोडणीअभावी अंधाराशी लढा देत होते.

देऊर, म्हसदी परिसरात मोठे जंगल क्षेत्र असल्याने बिबट्या, वाघ यांच्यासह जंगली श्वापदांची दहशत आहे. अनेकवेळी या श्वापदांनी हल्ला करण्याचाही प्रयत्न केला आहे. देऊर गावापासून सुमारे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर शेतशिवारात असंख्य कुटूंबे कायमस्वरुपी वास्तव्यास आहेत.

या ठिकाणी गेल्या सहा महिन्यापासून विज पुरवठा खंडीत झाल्याने येथील रहिवाशांना अंधारात जीवन जगावे लागत होते.पावसाळ्याचे दिवस असल्याने जंगली हिस्त्र प्राण्यांसह शेतातील साप, विंचू आदी विषारी जिव जनावरांच्या दहशतीत त्यांना रात्र काढावी लागत असे.

तसेच दिवसा ऑनलाईन शाळेनंतर रात्री विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कसरत करावी लागल होती. त्यामुळे लॉकडाऊननंतर वीजजोडणी अभावी विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानीला सामोरे जावे लागत होते. अशावेळी शेतशिवारात वीजजोडणी मिळावी म्हणून देऊर येथील तुषार देवरे, बारकू बेडसे, सुभाष देवरे, जिभाऊ देवरे, अनिल बेडसे, दिपक शेवाळे, केशव सोनवणे, अर्जुन सोनवणे, नितिन शिंदे, सचिन शिंदे यांच्यासह शेतकर्‍यांनी आ.कुणाल पाटील यांची भेट घेऊन त्यांना सिंगल फेज जोडणीव्दारे घरात विज पुरवठा सुरु करण्याची मागणी केली होती.

त्यानुसार आ.कुणाल पाटील यांनी तातडीने दखल घेत महाराष्ट्र वीज वितरण कंपनीला पत्र देऊन सिंगल फेल वीज जोडणीच्या सूचना दिल्या. त्यामुळे महावितरणचे कार्यकारी अभियंता धनंजय भामरे उपकार्यकारी अभियंता मनोज भावसार, व्ही.एन.सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता एस.के.बेंद्रे, योगेश खैरनार, बी.व्ही.सुर्यवंशी यांनी तत्काळ तांत्रिक तपासणी करुन सिंगल फेज सिंगल फेज विज प्रवाह सुरु केला. यामुळे शेतशिवारात राहणार्‍या रहिवाशांना आता 24 तास वीज पुरवठा मिळणार आहे.

दरम्यान आ.कुणाल पाटील यांनी तातडीने दखल घेत ऐन सणासुदीच्या दिवसात या भागात शेतशिवारातील प्रत्येक घर प्रकाशाने उजळून निघाले आहे. परिणामी विद्यार्थ्यांची रात्री विजेच्या प्रकाशात अभ्यास करण्याची सोय झाली असून गृहीणींनाही स्वयंपाकाचा आनंद घेता येत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांनी आ.कुणाल पाटील यांच्याप्रती समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या