देशदूत शब्दगंध : नंदुरबार जिल्ह्यात गावित-रघुवंशी युतीचे काय होणार?

राज्यात भाजपा-सेना युती संपुष्टात

राज्यात युती असो वा नसो, नंदुरबार जिल्ह्यात आमची युती आता कायमस्वरूपी राहील, असे भाषण विधानसभा निवडणुकीदरम्यान माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत केले होते. मात्र, आता राज्यात युतीमध्ये टोकाचे मतभेद झाल्याने युती संपुष्टात आली आहे. आजच शिवसेनेने पत्रकार परिषद घेऊन विधानसभेत कोणी कोणाला काय आश्वासन दिले, हे महत्त्वाचे नसून, आघाडी धर्म न पाळल्यास पक्षांतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढील महिन्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही दिग्गज नेत्यांची युती राहील की नाही? काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या महाविकास आघाडीचा ‘फॉर्म्युला’ कसा राहील? तिन्ही पक्षांचे एकमत होईल काय? जागांचे वाटप कसे करणार? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहेत.

नंदुरबार व धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. येत्या 7 जानेवारी 2020 रोजी मतदान होणार असून, 8 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. सद्य:स्थितीत नंदुरबार जिल्हा परिषदेत 55 जागांपैकी 29 जागा काँग्रेसकडे, 25 राष्ट्रवादीकडे व एक भाजपाकडे आहे. जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांपैकी नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा, तळोदा व धडगाव पाच समित्या काँग्रेस, तर शहादा पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे.  तसेच जिल्ह्यातील चारपैकी प्रत्येकी दोन नगरपालिका भाजपा व काँग्रेसच्या ताब्यात आहेत. हे पक्षीय बलाबल पाहता काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष मजबूत स्थितीत वाटतात. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांनी राजीनामा देऊन अनुक्रमे शिवसेना व भाजपात प्रवेश केला आहे.

जिल्ह्यातील सर्वत्र राजकीय सत्तेत बरोबरीने राहणार्‍या या दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाने पक्षांतर केले. त्यामुळे आज दोन्ही पक्ष पूर्णवेळ जिल्हाध्यक्षाविना आहेत. याशिवाय शहादा येथील सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, नवापूरचे भरत गावित यांनीदेखील भाजपात प्रवेश केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपाचे अस्तित्व नसताना आता या पक्षाला महत्त्व प्राप्त झाले आहे; परंतु ही परिस्थिती राज्यात भाजपाची सत्ता असतानाची होती. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. राज्यात भाजपाचा विजयरथ रोखण्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला यश आले आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेत वेगळीच स्थिती पाहायला मिळणार आहे. एक तर आता भाजपा-सेना युतीमध्ये टोकाचे मतभेद होऊन 30 वर्षांची युती संपुष्टात आली आहे, तर भिन्न विचारसरणीचे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष राज्यात एकत्र सत्तेवर आले आहेत. त्यामुळे भाजपाविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना असा सामना रंगणार आहेे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी ‘राज्यात भाजपा-शिवसेनेची युती असोसोल नंदुरबार जिल्ह्यात आ.डॉ.गावित आणि रघुवंशी यांची युती कायम राहील’ असे जाहीररीत्या भाषणात सांगितले होते.

गावित-रघुवंशी यांची यापूर्वी अघोषित युती असल्याच्या चर्चा गेल्या दहा वर्षांपासून ऐकायला मिळत होत्या. म्हणूनच विधानसभेत आ.गावित व नगरपालिकेत श्री.रघुवंशी यांना कधीही पराभव पाहायला मिळाला नाही, असेही सांगण्यात येते; परंतु श्री.रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांची युती अधोरेखित झाली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरून युतीमध्ये संघर्ष पेटला. हा संघर्ष एवढा विकोपाला गेला की, तीस वर्षांची भाजपा-सेनेची युती संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता राज्यात भाजपा आणि शिवसेना हे एकमेकांचे कट्टर विरोधक बनले आहेत. त्यामुळे आगामी प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिवसेना हे एकमेकांसमोर कट्टर विरोधक म्हणूनच  रिंगणात उतरतील, यात शंका नाही; परंतु राज्यातील युती तुटल्याने नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणाने वेगळे वळण घेतले आहे.

कारण आता नंदुरबारातील रघुवंशी व गावित परिवारातील तिसरी पिढी अर्थात अ‍ॅड.राम रघुवंशी, डॉ.सुप्रिया गावित या जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात ‘एंट्री’ करणार आहेत. या दोघा युवा नेत्यांचा राजकारणातील प्रवेश अनेक दिग्गजांच्या अपेक्षांवर पाणी फिरवणारा ठरणार आहे. कारण नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद  कायमस्वरूपी अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी केवळ अनुसूचित जमातीचे उमेदवारच दावेदार असतात. जि.प. उपाध्यक्ष व विविध समित्यांचे सभापतिपद हे राखीव नसल्याने या पदांसाठी बिगरआदिवासी उमेदवारांमध्ये नेहमीच वर्चस्वाची लढाई होऊन चढाओढ पाहायला मिळते.

सद्य:स्थितीत जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी माजी अध्यक्षा सौ.कुमुदिनी गावित यांचे नाव चर्चेत असले तरी, त्यांच्या कन्या डॉ.सुप्रिया गावित यादेखील आता चर्चेत आल्या आहेत. तसेच उपाध्यक्षपदासाठी अभिजित पाटील, जयपालसिंह रावल, रामचंद्र पाटील, रवींद्र गिरासे, डॉ.भगवान पाटील हे उत्सुक असताना आता चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र अ‍ॅड.राम रघुवंशी यांचे नाव आघाडीवर आले आहे.

अ‍ॅड.रघुवंशी यांना या निवडणुकीद्वारे राजकारणात आणून श्री.रघुवंशी हे त्यांचा वारसा जोपासणार असल्याचे दिसत आहे. श्री.रघुवंशी हेदेखील जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनच राजकारणात आले होते. त्यानंतर त्यांना जि.प.अध्यक्ष व आमदारकी  मिळाली होती. त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून श्री.रघुवंशी हे आपल्या पुत्राला राजकारणात आणतील, हे निश्चित मानले जात आहे; परंतु यासाठी दोन्ही परिवारांना एकमेकांची साथ असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, आघाडी व युती धर्मामुळे संकट उभे राहिले आहे. श्री.रघुवंशी यांना आता भाजपासोबतच महाविकास आघाडीशीदेखील संघर्ष करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कारण ऐन निवडणुकीच्या काळात त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांत त्यांच्याबाबत नाराजी आहे. याशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेची युती झाली तर या तिन्ही पक्षांच्या जिल्ह्यातील नेत्यांचे एकमत होईल का? 56 जागांचे वाटप कशा पद्धतीने करतील? त्यात कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या?  कोणत्या पक्षाला अध्यक्षपद द्यावे? कोणाला उपाध्यक्षपद? हे प्रश्न उपस्थित होणार आहेत.

त्यामुळे प्रचंड चुरस निर्माण होणार आहे. याशिवाय राज्यात युती असो वा नसो, जिल्ह्यात आमची युती कायम राहील, असे वक्तव्य करणार्‍या श्री.रघुवंशी यांना आ.डॉ.गावित किती साथ देतील? शिवसेनेच्या दोन्ही जिल्हाप्रमुखांनी आजच पत्रकार परिषद घेऊन जिल्हा परिषदेत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे संयुक्तरीत्या निवडणूक लढवणार असून, आघाडी धर्म न पाळणार्‍यांवर पक्षांतर्गत कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे श्री.रघुवंशी यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार असून, यात आ.डॉ.गावित यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *