Thursday, April 25, 2024
Homeधुळेम.गांधींची प्रतिमा जाणीवपूर्वक चुकीची मांडण्याचा झाला प्रयत्न

म.गांधींची प्रतिमा जाणीवपूर्वक चुकीची मांडण्याचा झाला प्रयत्न

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

मोहन ते महात्मा.. हा गांधींचा जीवन प्रवास समजून घेणे सोपे नाही. ते व्यक्ती नव्हे तर विचार आहे, गांधी जगण्याची शैली आहे.

- Advertisement -

मात्र ज्यांना ते पचले नाहीत त्यांनीच गांधींची प्रतिमा जाणीवपूर्वक चुकीची मांडण्याचाच आजपर्यंत प्रयत्न झाला.त्यामुळे नव्याने गांधी समजून घेण्याची गरज असल्याचा सूर आजच्या चर्चेतून उमटला.

दै.देशदूतच्या संवाद कट्टा या लाईव्ह कार्यक्रमात ‘होय, गांधी अजून जीवंत आहे’ या विषयावर चर्चा करण्यात आली. यात गांधी विचारांचे प्रचारक तथा साम्ययोग साधनाचे संपादक रमेश दाणे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत गांधी तत्वज्ञान केंद्राचे माजी समन्वयक प्रा.विलास चव्हाण यांनी सहभाग घेतला. ब्युरोचिफ अनिल चव्हाण यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

श्री.दाणे म्हणाले, विसाव्या शतकातील हिरो ठरलेले आणि कृतीतून विचार सिध्द करणारे गांधी या व्यक्तीला मारले गेले. पण त्यांचा विचार कसा मरणार ? गांधींना जगाने स्विकारले आहे.

गांधींच्या देशातील नागरिक म्हणून भारतीयांची जगभरात मान उंचावली आहे. कोणताही विचार आपल्या कृतीत आणून मग तो मांडणारे गांधी प्रयोगशील होते. त्यांनी मांडलेले अनुभव कदाचित चुकतीलही असे तेच म्हणत.

त्यांनी यंत्रांचा विरोध नाही केला पण माणसाच्या हाताचे काम हिरावून घेवून त्यांची उपासमार घडविणार्‍या व्यवस्थेचा मात्र विरोध केला. गावे भक्कम व्हावी, स्वावलंबनाने माणसे सक्षम व्हावी, ती नितीमुल्यांनी उभी रहावीत हाच गांधींचा आग्रह होता. खेड्याकडे चला याचा अर्थ हाच होता.

गांधींनी सांगितलेल्या अहिंसेचा देखील चुकीचा अर्थ लावला गेला. एका गालावर मारले की दुसरा पुढे केला पाहिजे, हे गांधींच्या नावावर खपवले गेले. मुळात हे ख्रिस्ती तत्वज्ञान आहे. गांधींची अहिंसा इतकी तकलादू नव्हती व नाही, असेही श्री.दाणे म्हणाले.

गांधींची कायमच चुकीची प्रतिमा निर्माण करण्यात आली आहे. त्यांच्या संदर्भात चुकीची माहिती जोडण्यात आली आहे. देशाच्या फाळणीला गांधींचा विरोध होता.

द्विराष्ट्रवादाची संकल्पना हिच मुळात सावरकरांची होती. तसा ठरावही त्यावेळी झालेला आहे. फाळणी करणार असाल तर आधी माझ्या प्रेतावरुन जावे लागेल हे गांधींनी ठणकावून सांगितले होते. भगतसिंगसह तिघांची फाशी रोखण्यासाठी गांधींनी पाच पत्रे लिहीली होती. यासाठी गांधींनी जे प्रयत्न केले ते कोणीच करु शकत नाही असे, सुभाषचंद्रबोस यांचे जाहीर वक्तव्य आहे. गांधी-आंबेडकर वाद हा देखील जाणीवपूर्वक घडविलेला विषय आहे. पाकिस्तानला 55 कोटी रुपये द्यावेत हे अखेरपर्यंत गांधींना माहितीच नव्हते. यासारखे कितीतरी विषय गांधींशी जोडून त्यांच्या नावावर खपविण्यात आले. तरुण पिढीची माथी भडकविण्यात आली. म्हणूनच ते गांधींपासून दूर राहिल्याचे श्री.दाणे म्हणाले.

तरुणांना पुन्हा गांधी समजविण्याची गरज- प्रा.चव्हाण

आम्ही महाविद्यालयीन तरुण-तरुणींना योग्य पध्दतीने गांधी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या डोक्यातील शंकांचे निरसन केले. सप्रमाण गांधी समजविले, तर त्यांना ते कळतात. आमचे प्रयत्न यशस्वी ठरले आहेत, असे गांधी तत्वज्ञान केंद्राचे माजी समन्वयक प्रा.विलास चव्हाण म्हणाले. गांधींनी सांगितलेली 11 तत्व जीवनात आचरणाची खरी गरज आहे. मुळात गांधी हे विज्ञानवादी होते ही बाब प्रकरशाने मांडण्यात आली नाही. म्हणूनच त्यांच्यावर काही आरोप करुन त्यांची प्रतिमा मलीन करण्याचे काम विशिष्ट वर्गाने केले. खरेदतर गांधी हे अजब रसायन आहे. श्रमाचे मोल सांगणारा झाडू, सेवाव्रत शिकविणारी झोळी आणि उपजिविकेसाठी स्वावलंबन सांगणारा चरखा ही गांधींनी दिलेली मुलमंत्रे आहेत. अंतरजातीय विवाहांना त्याकाळात गांधींनी प्रोत्साहन दिले. दरी दूर करण्याचा प्रयत्न केला, हेही समजून घ्यायला हवे असेही प्रा.विलास चव्हाण म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या