Thursday, April 25, 2024
Homeधुळेचुणूक ओळखा, खेळाडू घडवा, पण त्यांचा वापर करुन घेवू नका !

चुणूक ओळखा, खेळाडू घडवा, पण त्यांचा वापर करुन घेवू नका !

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

आपल्याकडील मुला-मुलींमध्ये क्षमता आहे, प्रचंड मेहनत करण्याची तयारी आहे. त्यांच्यावर व्यवस्थीत लक्ष दिले आणि त्यांना पाठबळ दिले तर ते उत्कृष्ठ खेळाडू म्हणून नावारुपास येवू शकतात.

- Advertisement -

त्यांच्यातील चुणूक ओळखता आली पाहिजे, खेळाडू घडले पाहिजेत. मात्र त्यांचा वापर होता कामा नये, अशी अपेक्षा आजच्या चर्चेतून व्यक्त करण्यात आली. खेळांसाठी महापालिकेसह व्यावसायीक व दानशुरांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही सांगण्यात आले.

दै.देशदूतच्या ऑनलाईन संवाद कट्टा या कार्यक्रमात आज ‘शरीर धन-तालीम, जीम की आहार?’ या विषयावर चर्चा करण्यात आली. यात महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे पंच, महाराष्ट्र व ऑल इंडिया चॅम्पीयन संजय गिरी, शारिरीक शिक्षण प्रशिक्षक डॉ.नरेश बागल, जीम कोच तथा आहार तज्ज्ञ कमलाकर अघाडे यांनी सहभाग घेतला. ब्युरोचिफ अनिल चव्हाण यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

महाराष्ट्रात कोल्हापूर नंतर धुळे ही कुस्तीची पंढरी म्हणून ओळखली जाते. पुर्वी खुंटा-खुंटावर व्यायामशाळा होत्या. धुळ्यातील अनेक मल्लांनी महाराष्ट्रभरातील आखाडे गाजविले. आता व्यायाम शाळांची संख्या घटलेली दिसते. तालमीपेक्षा जीमकडे तरुण-तरुणांचा ओढा दिसतो. याबाबत संजय गिरी म्हणाले, पुर्वी आपल्या घरात एक तरी मल्ल असावा असा प्रयत्न होत असे. कालांतराने हा समज दूर होत चाललाय.

सध्या मोबाईल आणि जीममुळे तालमीत येणार्‍यांची संख्या घटली आहे. कमी श्रमात यश हवे आहे. यास पालकांचीही बदललेली मानसीकता कारणीभूत आहे. त्याचप्रमाणे मुल्लांकडे होणारे दुर्लक्ष, त्यांना मिळणारे अपुरी साधणे, त्यांचा वापर करुन घेण्याची राजकीय व सामाजिक प्रवृत्ती ही देखील कुस्तीपासून त्यांना दूर नेण्यास त्यांना कारणीभूत ठरते.

एकदा नाव झाले की, काहींनी पहेलवान असल्याचा गैरफायदा घेणे सुरु केले. यामुळे देखील हे क्षेत्र बदनाम झाल्याचे श्री.गिरी यांनी सांगितले. शासनाने सर्वच क्षेत्रात 5 टक्के आरक्षण दिल्यामुळे काहीजण खेळाकडे वळतात.

मात्र महापालिकेने खेळासाठी आपल्या बजेटमध्ये काही टक्के तरतूद करावी, समाजातील दानशूर, व्यावसायीकांनी पुढे यावे. महापौर केसरी कुस्ती स्पर्धेसह पुर्वीसारख्या ठेक्याच्या कुस्त्या पुन्हा सुरु व्हाव्यात आणि मल्लांचा राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी वापर करुन घेवू नये, अशी अपेक्षाही श्री.गिरी यांनी व्यक्त केली.

डॉ.नरेश बागल म्हणाले, खेळाडू घडवायचे असतील तर शालेय जीवनातच विद्यार्थ्यांवर त्यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. एकदा शारिरीक वाढ झाल्यानंतर महाविद्यालयीन स्थरावर येणारे विद्यार्थी तेव्हढे लवचीक-काटक नसतात. परिश्रम घेण्यातही ते कमी पडतात. मात्र परिस्थितीमुळे रोजगाराच्या शोधात पोलीस भरतीकडे लक्ष देणारे विद्यार्थी खेळाकडे वळतात. दुसर्‍या शब्दात सांगायचे झाल्यास महाविद्यालयीन स्तरावरील खेळाडू शक्यतो भरतीकडेच कल देतात.

यामागे त्यांची परिस्थिती देखील कारणीभूत असते. मुळात निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात असली पाहिजे. तरच चांगला खेळाडू होता येते. ग्रामीण भागातील मुला-मुलींमध्ये चिकाटी आणि परिश्रम घेण्याची क्षमता अधिक असल्याने ते याबाबतीत पुढे जाणवतात. खरे खेळाडू शासनाच्या पाच टक्के आरक्षणाचा विचार करीतच नाही. मुळातच त्यांच्यात गट्स असतात. तरीही महापालिका, जिल्हा क्रीडा संकुल आणि समाजातील व्यक्तींनी खेळाडूंना प्रोत्साहन व सहकार्य करण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे डॉ.बागल म्हणाले.

जीम कोच कमलाकर अघाडे यांनी शरीराबाबत जागृत बनलेल्या सध्याच्या मानसिकतेकडे लक्ष वेधले. आपण शारिरीक दृष्ट्या पिळदार दिसावे, आपल्यात फिटनेस असावा यासाठी तरुण-तरुणींसह महिला पुरुषही कमालिचे जागृत झाले आहेत. खर्चही करण्याची त्यांची तयारी आहे. त्यामुळे सध्या आणि भविष्यातही जीम मधील गर्दी आणखी वाढतांना दिसेल.

विशेषतः आहाराबाबत देखील कमालीची सजगता निर्माण झाली असून काय खावे, किती खावे, कसे खावे यासाठी आहार तज्ज्ञ व डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो आहे. मुळात कसरत करण्यास विशिष्ट वय नाही. कोणत्याही वयापर्यंत कसरत करता येते. एका वाक्यात सांगायचे झाल्यास झेपेल तोवर आपण कसरत करु शकतो, असे सांगत श्री.अघाडे म्हणाले काहींना कमी कालावधीत शरीर बनवायचे असते. त्यासाठी चुकीचे प्रयोग केल्याने त्यांच्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी मान्य केले.

खंडणी, सुपारी घेणारच नाहीत..

पहेलवान म्हणून एकदा नाव झाले की, अनेकांचा संबंध गुंडगीरीशी येतो. मात्र खरा मल्ल हा अशा भानगडीत पडत नाही. तो कधी खंडणी, सुपारीही घेणारच नाही. विशेष म्हणजे खरा मल्ल हा कुणाच्या दावणीला बांधला जात नाही.

तर तो आपल्या ताकदीने, कौशल्याने नाव उज्वल करीत असतो. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना आपल्या उद्दीष्टांपर्यंत पोहचता येत नाही. त्यातल्या त्यात त्यांच्यावरील जबाबदार्‍या वाढल्याने त्यांना उत्पन्नाचे अधिकृत मार्ग शोधावे लागतात. यामुळेही त्यांची दिशा विचलीत होते, असे संजय गिरी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या