Tuesday, April 23, 2024
Homeधुळेजिल्ह्याला विकासाचे व्हिजन असणारे नेतृत्व हवे

जिल्ह्याला विकासाचे व्हिजन असणारे नेतृत्व हवे

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

इतर जिल्ह्यांच्या तुलनेत धुळे जिल्हा विकासाच्या दृष्टीने मागे राहिला. याचे कारण या जिल्ह्याला विकासाचे व्हिजन असणारे सक्षम नेतृत्व मिळाले नाही. यामुळे

- Advertisement -

जिल्ह्याचे नुकसान झाले. मात्र भविष्यात युवकांमधूनच नेतृत्व उदयास येईल असा आत्मविश्वास युवा आघाड्यांच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला.

दै.देशदूतच्या संवाद कट्टा या लाईव्ह कार्यक्रमात आज ‘राजकीय पक्षांच्या आघाड्या करतात तरी काय?’ या विष्यावर चर्चा करण्यात आली.

यात शिवसेनेच्या युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड.पंकज गोरे, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश मधुकर गर्दे, भारतीय युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कुणाल चौधरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कुणाल संजय पवार, मनसेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.दुष्यंतराजे देशमुख यांनी यात सहभाग घेतला. ब्युरोचिफ अनिल चव्हाण यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

सेनेचे अ‍ॅड.पंकज गोरे यांनी थेट विषयात हात घालून या जिल्ह्याला दिर्घकाळ सक्षम नेतृत्व मिळाले नाही. म्हणूनच अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत धुळे जिल्हा मागे राहिला, असे सांगितले. शिवसेनेच्या माध्यमातून सत्तेत नसतांना केलेली आंदोलने आणि आता सत्तेत असल्याने प्रश्नांचा पाठपुरावा करीत केली जाणारी सोडवून, याबाबतची माहितीही दिली. कोरोना काळात जात-पात धर्माच्या पलिकडे जावून महिला, पुरुषांना, रुग्णांना त्यांनी केलेल्या सहकार्याची उदाहरणे सांगितली. यासोबतच ते मुंबई येथील सिध्दीविनायक न्यासाचे विश्वस्त असल्याने या माध्यमातून केल्या जाणार्‍या सातत्याच्या मदतीविषयीची माहिती त्यांनी यानिमित्ताने दिली.

राष्ट्रवादीचे कुणाल पवार यांनी मनपातील सत्ताधारी भाजपावर शाब्दीक हल्ला केला. भाजपाच्या संकट मोचकांनी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? रस्त्यांची वाट लागून पिण्याच्या पाण्याची अवस्था काय? कोट्यवधी योजनांच्या कामात सहभागी कोण? असे प्रश्न उपस्थित करुन मनपा निवडणुकीवरही त्यांनी संशय व्यक्त केला. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात भाजप कमकुवत ठरत असल्याचे सांगत कोरोना काळात केलेल्या मदत कार्याची त्यांनी माहिती दिली.

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे यांनी विशेषतः बेरोजगारीच्या मुद्यावर लक्ष वेधले. शेतकरी, शेतमजूरांचे प्रश्न आजही मोठे असून ते सोडवणुकीसाठी काँग्रेसच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. काँग्रेस देखील रक्तदानासह वैद्यकीय सेवा व मदतकार्यात मागे राहिलेली नाही, असे ते म्हणाले.

मनसेच्या अ‍ॅड. देशमुख यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी मांडलेल्या मुद्यांना समर्थन देत भाजपावर टिका केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने कोरोना काळात केलेली मदत कार्य आणि भविष्यात युवकांचे संघटन उभे करुन नवे नेतृत्व निर्माण करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोरोना काळात धुळे मार्गे जाणार्‍या परप्रांतीयांनाही मदत केल्याचा उल्लेख करीत राजसाहेबांचा विरोध परप्रांतीयांना नाही तर त्या प्रांतातील सरकारांनी, नेत्यांनी यांच्यासाठी काहीच का केले नाही? का त्यांना त्यांचे राज्य सोडून बाहेर जावे लागले. याबाबत रोष असल्याचे ते म्हणाले.

भाजपचे प्रतिनिधी म्हणून युवा मोर्चाचे कुणाल चौधरी यांनी भाजपवर होणार्‍या आरोपांचे खंडन केले. मुळात यापुर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हातात 15 वर्ष मनपाची सत्ता होती, त्यांनी काय केले? उलट शहरात सध्या सुरु असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या योजनांमुळे नजीकच्या भविष्यात या शहरात डोळ्याला विकास दिसेल आणि नागरिकांनाही सुविधा मिळतील. मात्र आपले अपशय लपविण्यासाठी इतर पक्ष भाजपवर टिका करीत असल्याचा चिमटा त्यांनी घेतला. कोरोना काळात दररोज 20 हजार फूड पॅकेटच्या माध्यमातून अविरत झालेल्या अन्नसेवेचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

युवा आघाड्यांची आघाडी

कोरोनाचे संकट असतांना लॉकडाऊन काळात विविध राजकीय पक्षांच्या युवा आघाड्यांनी मोलाची भूमिका निभावली, रक्ताचा तुटवडा भासू दिला नाही. अहोरात्र झटून कुणालाही उपाशी झोपू दिले नाही. भविष्यात युवकांमधूनच व्हिजन असणारे, सामाजिक संवेदना जोपासणारे नेतृत्व उदयास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पक्षभेद विसरुन एकत्र येण्याची साद

या शहरात, जिल्ह्यात बेरोजगारी, शेतकरी, शेतमजूर यांचे प्रश्न, महिलांवरील अत्याचार अशा अनेक समस्या आजही भेडसावत आहेत. लॉकडाऊन कालावधीत आलेले वाढीव वीज बिल ही देखील एक सामाजिक समस्या बनली आहे. अशा जनहिताच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पक्षभेद विसरुन आपण सारे युवक एकत्र येवू, राजकारण होत राहिल. पण विकासासाठी एकत्र लढू, असशी सादही या युवा पदाधिकार्‍यांनी परस्परांना घातली. तसेच कोणालाही कसलीही समस्या असली तरी त्यांनी शहरातील भगवा चौकात असलेल्या सेना कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन युवा सेनेचे अ‍ॅड.पंकज गोरे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या