Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकदेशदूत वृत्ताची दखल : तामसवाडीत स्वतंत्र सबस्टेशन निर्मिती होणार

देशदूत वृत्ताची दखल : तामसवाडीत स्वतंत्र सबस्टेशन निर्मिती होणार

करंजीखुर्द । वार्ताहर Niphad, Karanjikhurd

करंजीखुर्द, ब्राम्हणवाडे, तामसवाडी, तारूखेडले या तालुक्याच्या सरहद्दीवर वसलेल्या गावांना वीजवितरण कडून 24 तासांपैकी रात्रीच्या वेळेस अवघा दोन तास वीजपुरवठा होत असल्याने देशदूतने याबाबतचे सविस्तर वृत्त प्रकाशित करताच वीजवितरण कंपनी खडबडून जागी होत वीजवितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी या गावांसाठी स्वतंत्र बैठक घेताच नादुरुस्त झालेले रोहित्र दुरुस्त करून देत वीजपुरवठा सुरू करून देत आठ तास वीजपुरवठा सुरू करून या गावांसाठी स्वतंत्र वीज सबस्टेशन देण्याची घोषणा करीत त्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने परिसरात शेतकर्‍यांनी देशदूतचे आभार व्यक्त करून देशदूत आमच्यासाठी देवदूत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

निफाड तालुक्यातील पूर्व भागाच्या गोदावरी नदीपात्रातील तारूखेडले, तामसवाडी, करंजी, ब्राम्हणवाडे गावांना दिवसातून अवघी दोन तास अन् ती देखील रात्रीच्या वीज मिळत असल्याने शेतीपिकांना पाणी देणे अवघड झाले होते. त्यातच या परिसरात बिबटे, तरस यासह हिंस्त्र श्वापदाचा मोठा वापर असल्याने शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण होते.

वीज दोन तास येत असतांनाही वीजबिले मात्र भरमसाठ येत असल्याने देशदूतने याबाबत वृत्त प्रकाशित केल्याने विजवितरणचे उपकार्यकारी अभियंता पाटील, सहाय्यक अभियंता कातकाडे, म्हाळसाकोरे सबस्टेशनच्या अभियंता मनीषा वासनिक, सायखेडा अभियंता मोरे आदींसह विजवितरण सेवकांनी वरील गावातील शेतकर्‍यांची बैठक घेत प्रथम या गावांचा वीजपुरवठा सुरळीत करून त्यांना सलग आठ तास वीजपुरवठा सुरू केला आहे.

यावेळी जि.प. सदस्य सुरेश कमानकर, माजी जि.प. उपाध्यक्ष दिगंबर गिते, बबन जगताप आदींसह परिसरातील गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. या ग्रामस्थानी विजवितरणच्या तक्रारींचा पाढाच अभियंत्यांसमोर कथन केला. यावेळी शेतकर्‍यांशी संवाद साधतांना विजवितरणचे अभियंता पाटील म्हणाले की, कृषी पंपासाठी नवीन वीजजोडणी देण्यात येत असून पहिल्या वर्षी वीजबिलाची थकबाकी भरली तर थकबाकीदार 50 टक्के सवलत व व्याज आणि विलंब आकार पूर्णपणे माफ करण्यात येऊन पहिली थकबाकी भरणा केल्यानंतर 60 टक्के सवलत मिळणार आहे.

तर वीजबिल वसूल रकमेतून त्याच गावासाठी पायाभूत सुविधा राबविण्यात येणार आहे. तसेच करंजी, तारूखेडले, तामसवाडी गावांना विजपुरवठा करणे, ट्रान्सफार्मर तत्काळ दुरूस्त करून या गावाला सलग आठ तास वीजपुरवठा सुरू केले आहे. तसेच या गावाला स्वतंत्र नविन सबस्टेशन कार्यान्वित करण्याचे आश्वासन देत त्याची कार्यवाही तत्काळ सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. देशदूतच्या वृत्तामुळे म्हाळसाकोरे सबस्टेशन अंतर्गत असणार्‍या गावांसह शिवारात सलग आठ तास वीजपुरवठा सुरळीत सुरू झाल्याने या गावातील पदाधिकारी, व्यवसायिक, शेतकरी व शेतमजुरांनी दै.देशदूतला धन्यवाद दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या