Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedतू तर चाफेकळी

तू तर चाफेकळी

अरुणा सरनाईक

कलिकाच्या सौंदर्याकडे पाहून मी तिच्याशी विवाह केला. लग्नानंतर काही वर्षे आनंदात गेली. पण नंतर कलिका बदलली. एक़दा मी तिला एक कठोर वाक्यं बोललो. त्यामुळे कलिका मनाने खचली. ती स्वत:लाच दोष देत राहिली आणि काही दिवसांनी तिला मानसिक आजारांनी घेरलं.

- Advertisement -

माझी चाफेकळी एकदम काळवंडून गेली. यावेळी मला दोन्ही मुलांनी सोबत केली. नंतर तिच्यावर उपचार सुरु झाले आणि काळवंडलेली कलिका पुन्हा चाफेकळी बनली.

लांबलचक बेडवर झोपलेल्या कलिकेला पाहून माझं मन कितीतरी मागे गेलं. किती वर्षांची हीची आणि माझी एकत्र वाटचाल! फॅमिली फ्रेंडस् असणारी आमची दोन कुटुंब. कधी नात्याच्या बंधनात बाधली गेली ते समजलंच नाही.गावातील प्रतिष्ठित श्रीमंत मान्यवर कुटुंब एका पवित्र नात्यानं बांधली जातात म्हणून सारं गावं आनंदलं होतं. मी तरी अवघा पंचवीस वर्षांचा होतो. कलिका तर जेमतेम 18-19 च्या उंबरठ्यावरची होती. सरळ भांग, लांब दोन वेण्या पुढे घेवून बेलबॉटम पॅन्टवर टॉप घालून फिरणारी कलिका अनेकजणांच्या दिलाची धडकन होती. कॉलेजच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतल्या घेतल्या सार्‍या कॉलेजची हवा गुल करून टाकली होती. मुळच्या गोर्‍या रंगावर तारूण्याची एक नवीन झिलाई आलेली होती अपर्‍या नाकाची. करवंदाच्या काळयाभोर डोळयांची कलिका खरंच छान दिसायची! तसा मी रांगडाच म्हणावा लागेल. भरपूर उंची, आडवा बांधा, सावळा रंग. कलिका खूपच लहान दिसायची, नाजुकशी चाफेकळीच! तिचे वडील आणि माझे वडील पक्के मित्र. आयांमध्ये फारशी मैत्री नसावी. असलाच तर एक सूक्ष्म न जाणवणारा ताण असावा. लग्न ठरल्यात जमा होतं. वाट फक्त कलिकेच्या ग्रॅज्युएट होण्याची होती.दोघंही एकमेकांना आवडत होतो. दिवसाचा बराचसा वेळ सेाबत सोबत असायचो.

एका कॉलेज डे ला कलिका म्हणाली ,‘जय मला कॉलेजला सोडशील का ? आज आम्ही साडी नेसायची ठरवलेली आहे. मी कशी गाडी चालवणार? त्यापेक्षा तू मला कारने सोड आणि हो एक गम्मत आहे बरं का! मी नाही सांगणार इतक्यात तुला. सरप्राईज आहे.’ आपलं नकटं नाक उडवत, डोळे मिचकावत कलिका बोलली. दिसून दिसून किती चांगली दिसणार? मी माझ्याही नकळत बोललो. रोजच ती चांगली दिसते.

हिरव्यागार चाफारंगाची गर्द शिफॉन. त्यावर त्याच रंगाचा स्लिव्हलेस ब्लाउज. रोजच्या दोन वेण्यांऐवजी लांब केसांचा झुबका. कानाच्या मागून गालाशी लगट करणार्‍या दोन बटा. कानात त्याच हिरव्या रंगाला मॅच करणारे टॉप्स. अख्ख चाफ्याचं वन अंगावर आल्यासारखं सर्वत्र हिरवा रंग आणि सर्व अंगाानी उजळणारी कलिका. अक्षरश: आज तिच्या सोनसळी पिवळया गोर्‍या वर्णाचा मला साक्षात्कार झाला. आज ती चाफेकळीच दिसत होती. अर्धोन्मिलीत मुग्ध कळी स्वत:च्या सौदर्यांची विशेष जाणीव नसणारी. माझ्याही नकळत मी स्टिअरिंंगवरचे हात खाली घेतले. दार उघडून तिच्या स्वागतासाठी महाराजाच्या आविर्भावात उभा राहीलो. पायर्‍या उतरून अलगद येणारी कलिका माझ्या जवळ आली. हातांच्या पकडीतून निसटून गाडीत बसली देखील. ‘नको असा पाहू! आज माझाच माझ्यावर विश्वास नाही. तयार होऊन आरशात स्वत:ला निरखताना माझीच मला लाज वाटत होती. मी काहीच बोललो नाही. सहजच माझ्या तोंडून निघून गेलं, ‘गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी.’ वातावरणातल्या सुखद उन्मादाचा ताण दोघानांही सहन होतही नव्हता आणि हवासाही हेाता. नकोशा एकांताचा भंग करत कलिका म्हणाली, ‘पुन्हा म्हण ना रे एकदा तू तर चाफेकळी….’ ‘आता नाही म्हणणार!’ मी पण भाव खात बोललो. ‘तुला मी नाहीच म्हटलं, सहजच गुणगुणलो.’

पण माझी हिरव्या रंगाची आवड लक्षात ठेवून कलिकानं लग्नात हिरवा गर्द शालू घेतला. सोन्याच्या दागिन्यांनी लहडलेली,हिरव्यागार शालुत लपेटलेली कलिका जेव्हा लग्नमंडपात आली तेव्हा माझी सुमाआत्या मला म्हणाली ,‘अरे ही चाफेकळी तुला रांगडयाला बरी गावली!’ फटकळ असली तरी सुमाआत्या माझ्या विशेष प्रेमातली होती.

आमच्या पहिल्या भेटीच्या वेळी बेडरूममध्ये अख्खं हिरवगार कोकणच होतं.त्या सार्‍या पार्श्वभूमीवर सोनसळी रंगाच्या साडीतली कलिका माझी आतुरतेने वाट बघत होती. माझ्या कुशीत चेहरा लपवत म्हणाली, ‘आता तरी म्हणना !’ आता प्रचिती आल्याशिवाय काही खरं नाही. अतीव समाधानानं झोपलेल्या कलिकेला सकाळी सकाळी जागं करत तिच्या कानात गुणगुणलो, ‘गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी काय हरविले सांग शोधिशी या तरूतळी……’. तिच्याही नकळत लाजत ती मला बिलगली.

दिवस जात होते. वर्ष उलटली. नाजुकशी दिसणारी कलिका दोन मुलांनंतर देखील तशीच राहिली. ललीत ,तनय, कलिका आणि मी. आम्ही चौघं बाहेर पडलो की ती दोघांची बहीण दिसायची. खूपदा वाटायचं हे दोन रांगडे गडी आहेत आपल्यासारखे अंगपिडानं मजबूत . एखादी कलिका सारखी नाजुकशी मुलगी हवी!तनयच्यानंतर तो विषय तसाच राहिला.

मुलं मोठी होत होती. सुरुवातीला खोडकर बंड असणारे ललीत, तनय एका ठराविक काळानंतर ऐकेनासे झाले. त्यांचं शिक्षणातलं लक्ष उडालं. व्यवसायात थोडा माघारलो होतो. मधला 10-12 वर्षांचा काळ अतिशय कठीण गेला. ललीतला असालयम् मध्ये ठेवावं लागलं. तनयची मुलींची प्रकरणं वाढतंच होती. घरातलं आनंदी वातावरण नाहीसं झालं. या सार्‍यांमध्ये कलिकाला सांभाळणं जड गेलं. कधी कधी तिचा राग यायचा. इतका कसा हिचा स्वभाव हळवा? समाजात सगळेच हिच्यासारखे चांगले नसतात. माझाही वैताग व्हायचा. कधीतरी एकदा रागाच्या भरात मी बोलून गेलो, ‘अशा कचकड्याच्या बाहुलीशी लग्न करण्यापेक्षा दुसरीशी लग्न केलं असतं तर आज चित्र वेगळ राहीलं असतं. या परिस्थितीत मला तिचा आधार वाटला असता.’ या वाक्याचा परिणाम इतका खोलवर होईल याचा विचार मी केला नाही. माझे शब्द ऐकून मट्कन खाली बसणार्‍या कलिकेकडे न बघताच मी धाड्कन दरवाजा आपटुन निघून गेलो.नंतरच्या दिवसातील धावपळ, मुलांचे प्रश्न, कंपनीतील वाढत्या समस्या या ताणांवर माझंही ड्रि्ंक्सचं प्रमाण वाढलं. वाईट काळ होता तो. तनयचे वाढते प्रकार. असालयम्च्या मिटींग्ज्. ललीतचा हैदोस . एका प्रकरणात तनयला पोलिसांनी पकडून नेलं होतं. कुठवर मी पुरणार? या मध्ये कलिकेकडे माझं पार दुर्लक्ष झालं.इतक्या आघाडयांवर मी एकटाच लढत होतो. कोणाचीच साथ नाही. त्या दिवसानंतर कलिका जणू मुकीच झाली होती. हसणं नाही, बोलणं नाही. एकातांत एकटचं बसणं. मी पण रागातच होतो. समोरची परिस्थिती सांभाळू की कलिका? मी परिस्थितीला प्राधान्य दिलं. कलिका माझीच होती. तिचा राग कधीही काढता येईल असा सोयिस्कर अर्थ काढून मी स्वत:ला समजावलं.फारच वाटलं तर तिला तिच्या भावाकडे पाठवता येईल. माझा विचार किती चुकीचा होता. या चुकीमुळे किती मोठा फटका मला बसणार होता. काय नुकसान झालं असतं या विचाराने देखील मन थरारतं. एखादं चुकीचं वाक्य एखाद्याचं अवघं भावविश्व उध्वस्त करू शकतं ? आणि या पापाचा धनी मी होणार होतो. माझंच आयुष्य मीच पणाला लावणार होतो!

त्या दिवशी धाडकन दार आपटून मी बाहेर पडलो ते केवळ रागातच. सहजच तोंडून निघाले शब्द ,‘दुसरी कणखर मनाची बायको मिळाली असती तर समस्या सोडवायला मदतीला धावली असती.’ या वाक्याचीं फार खोल जखम कलिकेच्या मनावर झाली. हळवी भावनाप्रधान कलिका पार उध्वस्त झाली. त्यात मी केलेलं दुर्लक्ष . या सर्वात ती पार कोलमडून गेली. तिच्यातले बदल मला लक्षात आले नाहीत. फक्त अबोलपण लक्षात आलं. दिवसेंदिवस मी घराबाहेर असायचो. कंपनीला ताळयावर आणण्यासाठी दिवसरात्र खपत होतो. ललीतला शेवटी मुक्तांगणमध्ये ठेवून दिलं. त्याही वेळेला मी एकटाच गेलो. मुक्तांगणच्या दारातून आत शिरतांना ब्रम्हांड आठवलं. पहिल्यांदा जेव्हा नर्सनं त्याला माझ्या हातात ठेवला . वाटलं ही माझी स्वत:ची हक्काची, निर्मिती आहे. माझ्या आणि कलिकेच्या श्वासावर फुललेलं फुल मी आयुष्यभर जपेन! कुठं कमी पडलो मी! त्याचे करवंदी डोळे अगदी कलिकासारखे होते.तासंतास मी तो डोळे उघडून बघेपर्यत त्याला हातात घेऊन बसायचो. माझी आई म्हणायची देखील, ‘अरे लहान बाळ आहे तो, दिवसाचे 22 तास झोपणार. किती वेळ घेवून बसशील? पण मी ते मानायला तयार नसायचो. आणि आज ?त्याच माझ्या ललीतला कठोर होऊन मुक्तांगणला ठेवतो आहे. विझल्या डोळयांनी अन् थकल्या मनानं मी त्याचा निरोप घेतला. तो जाणिवेपलीकडे होता आणि मी पूर्ण जाणिवेत होतो ना! तिथल्या व्यवस्थापकांनी आश्वासन दिलंय की तुमचा ललीत पूर्वीसारखा होईल. धीरानं घ्या.निदान 40 दिवस मी तरी शांत राहीन.हे खरं होतं का? त्याची विविध रूपं डोळयासमोरून हलत नव्हती. अनेक प्रसंग ,अनेक आठवणी. कसं सहन करणारं? विव्हल मनाच्या तळाशी एक निश्चिंतता होती. कारण तो चांगल्या हातात होता. घरी आल्यावर प्रथम तनयकडे लक्ष देणं आवश्यक होतं!कलिकेची रिअ‍ॅक्शन अगदीच नगण्य होती. हेही मला खुपलं नाही. ललीत विषयी सांगताच तिनं फक्त डोळे उचलुन एकच क्षण पाहीलं. दुसर्‍या क्षणी मान फिरवून ती समोरून निघून गेली.मी सुटकेचा निश्वास टाकला. निदान तिच्या प्रश्नांच्या मार्‍यापासून सुटका झाली. सध्या आता ऐरणीवर तनय होता.

त्या दिवशी संध्याकाळ पूर्ण त्याच्या सहवासात घालवली. त्याची कोण मैत्रिण होती तिला पण सोबत घेतलं. दोघांशी बोललो. सुरुवातीला दडपणाखाली असलेली दोघंही हळुहळु मोकळी झाली. क्षणात लक्षात आलं अरेच्च्या, हिलाच हाताशी धरलं तर? सना तिचं नाव. कशाचा तरी शार्टकट असावा. छोटीशी लहानखुर्‍या चणीची सना उद्या जर सून म्हणून घरात आली तर कलिकेला मुळीच शोभणारी नव्हती.कुठं माझी सोनकळी नाजूक कलिका आणि कुठं ही ?पण तिच्याशी बोलता बोलता तिच्या ठाम विचारांची ओळख पटली. तनयला चांगली सांभाळेल असं वाटून गेलं. माझं घर हीच साभांळेल अशा निर्णयापयर्ंत मी कधी पोचलो तेच मला समजलं नाही. कुठेतरी मी थोडासा रिलॅक्स झालो. अजून तरी ते फक्त मित्र आहेत. पुढे संबंध वाढतील की नाही गॉड नोज. पण आज मित्र म्हणूनही सना तनयला मदत करायला तयार आहे.तनय उद्यापासून कंपनीत अर्धावेळ येणार होता. आज डायरीच्या पानावर तनय विषयीच्या समाधानाची अक्षररेघ नव्यानं उमटली. ललीत देखील स्वत:ला तयार करत होता. त्याने तसं मला फोनवर सािंंंगतलं. तो म्हणाला , ‘बाबा, तू मला फोन करू नकोस एवढयात. मीच काही दिवसांनी तुला बोलेन. फक्त माँला सांभाळ. मी तिला खूप ़त्रास दिलाय. रात्री कधीतरी गाढ झोपेत तिच्या सायमाखल्या हाताचा गालावरील स्पर्श आठवतो मग मीच माझा हात गालावर ठेवून तो स्पर्श पुन्हा अनुभवतो. मग वाटतं माँ माझ्याजवळच आहे. येईल ना रे माँ माझयाजवळ?’ माझं कोकरू ते! स्वत:हून सुधारणेचा चंग बांधून लढतोयं स्वत:च्या व्यसनांशी! देवा त्याला मदत करशील ना!

त्या रात्री अचानक जाग आली. बघतो तर कलिका….. रायटिंग टेबलाजवळील खुर्चीत बसलेली, तोंडात ओढणीचा बोळा खुपसून थरथरत होती. आपल्याच हातांच्या वेढयात स्वत:ला आवळत होती.तिचं घाबरं होणं, मनातल्या मनात हुंदके दाबणं मला विचित्र वाटलं. हातावर तिला उचलून बेडवर ठेवताना तिचं वजन अतिशय कमी झाल्याचं जाणवलं. दोन्ही हातात मी तिला उचलताच तिच्याही नकळत तिच्या दोन्ही हातांची कवळ माझ्या गळयाभोवती पडली. किती अनावर क्षणांची रोषणाई माझया डोळयासमोरून लख्खं झळकून गेली. किती दिवस,….. किती महिने……… आता आठवत देखील नाही. ‘जय, मी नाही तुझ्यायोग्य. मी नाही तुला साथ देऊ शकले… पण मला सोडून जाऊ नकोस.’ ती भानावर नव्हती. तिच्याशीच ती बोलत होती.बेडवर तिला ठेवतांना लक्षात आलं डोळयाभोवती काळी वर्तुळ, कपाळावर आठ्या, केसांचा रूक्षपणा स्पर्श न करता जाणवत होता.काय दशा झालीय कलिकेची. गेल्या सहा- सात महिन्यात काय दु:ख हिच्या मनात कोडलयं?तिच्या अंगावर शॉल घालून मी टेबलाकडे वळलो. कागदावर काहीतरी लिहिलेलं होतं. अक्षरांची सुसंगत लागत नव्हती. उलटसुलट वाक्य संदर्भ मात्र सांगत होते.गेल्या 6 महिन्यातले कलिकेचे चुप्प राहणं स्पष्ट होत होतं. माझ्या एका वाक्यानं तिला पार उन्मळून टाकलं होतं. मी जयला योग्य नाही याच आशयाची वाक्यं लिहिलेली कागदं माझया अंगावर धावून येत होती. त्या वाक्याचीं वावटळं ,वादळाच्या स्वरूपात येवून कलिकेला उध्वस्त करून गेली. अख्ख्या रात्रभर मी त्या वादळाला तोंड देत होतो. माझी कलिका निसटेल का हातातून? केव्हातरी जाग आली. माझ्या डोक्यावर कोणीतरी हातानं स्पर्श करित होतं. वाटलं कलिका तर नसेल?तिला अशी सवय होती. माझ्या बर्‍याच सकाळी तिच्या हस्तस्पर्शानं सुरू व्हायच्या.पण कलिका? पाहिलं तर तो तनय होता. बाबा उठ,सनानं बघ तुझ्यासाठी चहा केलाय. ब्रेकफास्ट तयार झालाय. कंपनीत आज महत्वाची मिटींग आहे.आधी कलिकेकडे बघितलं. ती शांत झोपली होती.रात्रीच्या पडझडीचा मागमूस तिच्या चेहर्‍यावर अजिबात नव्हता. हातातल्या घड्याळात 9 वाजले होते. या वेळेपावतो ऑफिसात पोचायला हवं.समोर तनय होता.पूर्ण तयार झालेला. माझंच प्रतिरूप! ‘चल तुझं आटोपून तू ये. मी पुढे होतो. सकाळी साडेदहा वाजता डॉ. मानेची अपॉइंटमेंट घेतली आहे. माँला एवढयात जाग येणार नाही. 10च्या सुमारास तिला उठव. तू ती आणि सना तयार रहा. मी शंकरला गाडी घेवून पाठविन. सनासोबत डॉक्टरकडे माँला नेवून आण. संध्याकाळी बोलू आपण. चल अच्छा गुड डे!’‘अरे पण काही सांगशील की नाही? काय झालं कलिकेला?’ ‘ते सगळं संध्याकाळी बोलू. आज एक महत्वाची मिटिंग आहे 1 वाजता. तू दवाखाना आटपून पोच एकपर्यंत ऑफिसला. विचारांचं काहूर बाजूला सारून मी स्वत:ला तनयवर सोपवून दिलं. मनात चिवार करू लागलो कधी मोठा आणि शहाणा झाला एवढा हा? मी विचारात असतांनाच तनय गेला देखील. ‘अंकल चहा !’ सनाच्या आवाजानं मी भानावर आलो. हातात चहाचा कप घेऊन सना उभी होती. फिक्या अबोली रंगाच्या पांढर्‍या फुलाफुलांच्या सलवार कमीझमध्ये. पहिल्यांदाच मला तिच्यातल्या साधेपणांची,स्वच्छ मनाची ओळख झाली. ‘तुम्ही चहा घ्या. ब्रेकफास्टला मी उपमा करायला सागिंतलाय. तुमचं आटोपून घ्या. तोवर मी माँकडे बघते.’ यंत्रवत हालचाल करत मी समोर येईल त्याला तयारी दाखवली.मी तयार होवून डायनिंग टेबलवर आलो तर सनानं कलिकेला तयार केलेलं होतं. पिवळसर रंगाच्या सलवार कमीझमध्ये कलिका आणि सना बहिणीबहिणी दिसत होत्या. केसांचा छोटीशी पोनी घातलेली कलिका थकलेली दिसत होती. कालच्या वादळाच्या खुणा चेहर्‍यावर अलिप्त भाव ठेवून गेलेल्या होत्या. ती तिच्यात जगात होती. आमच्या जगाशी फारकत घेऊन स्वत:च्या जगाची तटबंदी करून घेतलेली कलिका हाताच्या अंतरावर जरूर होती. पण तिच्या मनानं मात्र आमचं नातं, आमचं अस्तित्व नाकारलं होत.

डॉ.माने. शहरातील प्रसिध्द मानसोपचारतज्ञ.कलिकेला त्यांच्याकडे न्यावं लागेल हे मला पचनी पडायला जड जात होत. प्रत्यक्ष डॉक्टरांच्या केबीनमध्ये जातांना मन अपराधी भावनेनं भरून आलं. कलिकेविषयी एकाच वेळी प्रेम आणि राग मनात दाटून आला होता. एवढं कसं माणसाचं मनं हळवं असावं? नवराबायकोत का वादविवाद होत नाहीत? अगदी भाडणंसुध्दा होतात. मग मीच का एवढं केलयं? त्या काही शब्दांचा हिनं असा अर्थ लावून स्वत:ला इतका त्रास करावा?…. ‘या कलिकाताई, या जयसाहेब! काय म्हणताय? डॉक्टरांच्या उमद्या हसर्‍या व्यक्तीमत्वाचा मला केवढा विश्वास वाटला. ‘मला तनय बोलला आहे. आपण यांच्या काही टेस्ट करून घेऊया. बाजूच्या केबीनमध्ये माझी असिस्टंट आहे. कलिकाताईंना एकटीनेच बोलू द्या. त्या अर्ध्या तासाचं टेंशन बहुतेक माझा जीव खाणार काय! उद्या बाकिच्यांना समजलं तर ?काय करू ? डॉक्टर तुम्हाला बोलवतात. काय पुढ्यात वाढून ठेवलंय देव जाणे! ‘तसं काळजीचं कारण नाही. पण वर्षभर ट्रि्टमेंट घ्यावी लागेलं.काही सिटिंग्ज घ्याव्या लागतील. कशाचा तरी धक्का बसून मनात काही ब्लॉकेजेस् आहेत. आपण कुठेतरी कमी पडतो, कोणाची मदत करू शकत नाही, या भावनेनं त्या ग्रस्त आहेत. पण डोण्ट वरी. सगळं ठिक होईल.’ काहीही न बोलता पुढच्या भेटीची वेळ ठरवून कलिकेला घेऊन घरी आलो.इतकी कशी ही हळवी ? हाच प्रश्न मला वारंवार त्रासत होता. पण हाच तर हळवेपणा मला भावला होता ना ! याच स्वभावावर तर मी लोभावलो होतो. अगदी फुलासारखं सांभाळतो हं तिला, याचा केवढा अंहकार होतो मला. मग आता का? मी तिला दोष देतो आहे. ती तर तशीच आहे पहिल्यापासून बदललो तो मीच?

गाडीमध्ये शेजारी बसलेली कलिका स्वत:शीच अंग चोरून होती. एखाद्या भ़ित्र्या सशासारखी अंगाचं मुटुकुळं करून आपल्याच हातानी स्वत:ला. साधा संवाद सुध्दा तिच्याशी मी साधू शकत नव्हतो. ‘थोडीफार औषधं घ्यावं लागतील एवढंच. मग बरं वाटेल’ या बोलण्यावर तिच्याकडून साधा हुंकार देखील नव्हता.

दिवस जात होते. डॉ. माने जरी धीर देत होते तरी माझा धीर मात्र खचत चालला होता. औषधांमुळे कलिका दिवस अन दिवस सुस्त असायची. डोळयातलं भकासपण वाढतच होतं. या सर्व धावपळीत तनय शहाणा होत होता आणि सना! प्रत्येक गोष्टींमध्ये मला तनयच्या बरोबरीनं सोबत होती. कलिकेला बोलतं करायची जबाबदारी सनानंच न बोलता उचलली होती. तिच्या अस्तित्वाचा गंध घरादाराला आधार देत होता.

अशातच एक दिवस सुमाआत्या आली. माझी लाडकी आत्या आमच्या मदतीला धावून आली होती.कलिकेचा सगळा प्रकार लक्षात आला. ‘माझी चाफेकळी पार झाडून गेली रे ! जय अस कसं दुर्लक्ष केलं बाबा पोरीकडं? कलिकेला पोटाशी घेऊन रडरड रडली. पण लागलीच खंबीरपणे म्हणाली, ‘नको रे पोरा धीर सोडू. मी आलेय ना. मी बघते पोरीकडं. जरा दोन दिवस गाडी देशील तुझी? चलशील बरोबर तर छानचं पण एकच अट, प्रश्न विचारायचे नाही. ड्ायव्हर दे सोबत.’ सुमाआत्या काही वेडवाकडं करणार नाही याची खात्री होती. मलाही वेळ हवा होता.ललीतची मुदत संपत आली होती. एकदा तनय सनाशी बोलायचं होत. कंपनीच्या एक दोन महत्वाच्या मिटिंग्ज होत्या आणि 15 दिवसानंतर डॉ. मानेंची भेट होती. मी विचार केला करू दे सुमाआत्याला तिच्या मनाप्रमाणं. ‘चल, तुला गाडी आणि ड्रायव्हर देतो. माझी पण अडचण नको. ‘निवान्त रहा रे पोरा !’ माझ्या डेाक्यावरून प्रेमानं हात फिरवत आत्या बोलली.

तनय आणि सना लग्नाला तयार होते. तनयचा सगळा भूतकाळ सध्याच्या वागणुकीनं धुतला गेला. सनाला फक्त आजचा आणि आजचाच तनय हवा होता.पुढे तो असाच राहील अशी तिची पक्की खात्री हेाती.लग्नाला मात्र वेळ होता. कंपनीचा सेटअप, काही सुधारणा याविषयीचे सनाचे काही प्लॅन होते.हे सारं सना-तनयनी मला जेव्हा सांगितलं तेव्हा नवलच वाटलं. सना एकदम आपलीशी वाटून गेली. त्याच बरोबर कलिका थोडी जरी अशी असती तर? ……तनयची मला काळजी उरली नाही. तो चांगल्या हातात होता.तनय-सना पुण्याला ललीतला भेटून आले होते.त्याची प्रगती चांगली होती.सना तर सतत मुक्तांगणच्या संपर्कात होती. हातातल्या चहाच्या रिकाम्या कपाशी चाळा करत तनय बोलत होता.तेव्हा माझाच मी स्वत:ला लख्खपणे दिसत होतो. काही महत्वाचं सागायचं असलं की मला एक चहाचा कप लागायचा. यावर कित्येकदा कलिका ओरडायची सुध्दा ! किती काळ पुढे घेऊन आला. आम्हाला हे कळेल का कलिकेला? फक्त माँ लवकर बरी व्हायला हवी.पुन्हा पहिल्यासारखी होईल ना रे बाबा ती? तनय पुन्हा लहान होत होता. मी वाटेल ते करेन. खूप चांगला वागेन. तुला, माँला अजिबात त्रास देणार नाही. पण मला फक्त माँ पहिली हवी. ललीतला हे काहीच माहीती नाहीयं. तो परत यायच्या आत ती पूर्वीसारखी व्हायला हवी रे. हातानं त्याला लहान मुलासारखा जवळ ओढून घेत मी त्याला शांतवत असतांना मी मला पण शांत करत होतो.

रोज सकाळी उठल्या उठल्या सुमाआत्या कलिकेला घेऊन बाहेर पडायची. तिच्या औषधांच्या वेळा, सतत पाय पोटाशी घेऊन कित्येक दिवस बसल्यामुळे आखडलेले पायाचे सांधे. त्यासाठी फिजिओथेरपी सुरू होती. हाताची बोटं घट्ट धरून काळीनिळी झाली होती. माझा सोनचाफा देठासकट काळवंडला होता. पण हे सारं सुमाआत्या वेळच्यावेळी साभांळून दिवसभर तिच्यात असायची. सना म्हणाली होती ‘अंकल, सुमाआत्या सगळं व्यवस्थित करतात. करू देना त्यांना त्यांच्या मनासारखं माँ बरी झाल्याशी मतलब.’ मी शेवटी तिच्यावर सेापवून दिलं.आता वेध लागले होते ललीतचे तीन चार दिवसात तो येईल. चाळीस दिवसांचा माझा त्याच्याशी न बोलण्याचा संकल्प पाळणं कठिण होत होता.

‘बाबा कसा आहेस रे?’ रात्री 12 वाजता माझा मोबाईल वाजला. अरे आता 40 दिवस संपलेत ! हो ना बाबा!’ शंखातल्या स्वच्छ पाण्यासारखा त्याचा निर्मळ आवाज ! काय करू? कानात पंचप्राण आणू की, अवघं विश्व! सार्‍या देहाचे कान झाले.त्या आवाजाचा प्रवाह शतधारांनी मला चिंब करत होता. ललीत! हो बाबा.पुढच्या आठवडयात मी घरी असेन माँला कधी भेटेन असं झालय .दादा कसा आहे? 40 दिवसांचा बॅकलाग क्षणात भरून निघाला.ललीत! नको बोलूस बाबा ! माझंच ऐक.बराच वेळ ललीत बोलत होता. काही वेळा शब्द कानात शिरत होते काही वेळा नाही. त्याचा आवाज मी मा़त्र कानात साठवून घेत होतो.

एक दिवस कलिका देवासमोर हात जोडून बसलेली पाहीली. तिला तसं पाहून देखील बराच काळ लोटला होतो.डोळे उघडून मला पाहताच हसली. ते हसणं माझ्याकरिता होतं की नाही ते मला माहीत नाही. पण काहीतरी चांगलं होण्याची ती सुरुवात होती हे मात्र निश्चित. डॉ माने किंवा सुमाआत्याचे स्वामी कोणाच्याही प्रयत्नाने का होईना कलिका सुधारत होती. चेहर्‍यावर ओळखीच्या खुणा तुरळक का होईना दिसू लागल्या होत्या.ललित तर तिला पाहताच हादरला. माझ्यामुळे माँ अशी झाली? याचाच त्यानं धोशा लावला. तो तरी आतातच बरा व्हायला लागला होता. पुन्हा काही झालं तर ? यावेळी मात्र सनानं त्याला सावरलं.

एक दिवस आत्याला बरं नव्हतं. मला म्हणाली ‘तूच जा ना कलिका सेाबत स्वामींकडे. तिला रस्ता माहीत आहे.’ मलाही स्वामींना भेटायची उत्सुकता होती. सार्‍या रस्ताभर कलिका शांत होती. निदान ओळखीचा माणूस सोबत असल्याची जाणीव होती.स्वामींना पाहताच मन आदरानं लवून गेलं.त्यांच्या व्यक्तिमत्वात एक विश्वास जाणवला. पुढच्या प्रत्येक वेळी मी सोबत गेलो. जसा जात राहीलो तसा विश्वास अधिकच द़ृढ झाला.

आज कलिका बर्‍याच दिवसांनी आनंदात होती.सात-आठ महिन्याच्या औषधानं आणि स्वामींच्या डाउझिंगमुळे तिच्यात बराच फरक झाला होता. संध्याकाळी टेरेसवर चहा पितांना मला म्हणाली, ‘अरे जय, आता आपण तनय- सनाच्या लग्नाचं पक्कं करूया.’ ती संध्याकाळ माझ्यासाठी अविस्मरणीय ठरली. पुढच्या सगळयाच घटना वेगवान ठरल्या.साखरपुड्यापासून धूमधडाका सुरू झाला. प्रत्येक कार्यक्रम तिला जोरात करायचा होता. या सार्‍याचा ताण कलिकेला कितपत झेपेल हा प्रश्न मी वारंवार स्वामींना आणि डॉ. मानेना विचारत होतो. डॉ माने म्हणायचे, ‘आमची ट्रि्टमेंट पूर्ण झाली आहे. फिजीओथेरपी मात्र चालू ठेवा.मनावर ताण येणार नाही याची काळजी घ्या.’ स्वामी मात्र खात्री देत होते. करू देत तिला तिच्या मनाप्रमाणं. काही होणार नाही. ललीत, तनय सगळेच उत्साहात होते.कधीतरी कलिकेची शक्ती कमी पडायची, मन हलकं व्हायचं. पण पुन्हा उभारी धरायची. अशातच एक दिवस पाय मुरगळला तेव्हा खूप नाराज झाली. मला बोलली, अरे आपल्या लग्नात नाच-गाणी काही नव्हतं. अर्थात तेव्हा पध्दत नव्हती. आता मात्र तनयच्या लग्नात आपण जोडीनं नाच करूया. आता कसं? डॉ. म्हणाले काही दिवस पायासाठी फिजीओथेरपी आणि ट्रॅक्शन घ्या. बरं वाटेलं. पुन्हा तेच चक्र सुरू झालं.

भल्या मोठया लाकडी बेडवर कलिका झोपलेली आहे. डावूझिंगसाठी अर्धा तास लागायचा. हा अर्धा तास मला कुठं कुठं फिरवून आणायचा. डावूझिंग संपलं होतं. खूप दिवसांनी मी तिला निरखत होतो.पन्नाशीच्या पुढच्या वयाची माझी नाजुकशी चाफेकळी ,कलिका काही खुणा सोडल्या तर अजूनही तशीच होती. तिच्या पिंग्या केसांच्या रेशीमलडी रूपेरी तारांसकट सळसळत होत्या. हात उंचावून केस बांधण्याची तिची अदा वय होऊन गेलं तरी अजूनही जीवघेणी हेाती. ओढणीचा फलकारा खांद्यावर लोटत ,उरलेल्या केसांना क्लचरमध्ये अडकवत मला म्हणाली ‘चल रे जय, अजून बरंच आवरायचं आहे.’ गालातल्या गालात हसत स्वामीजी नमस्कारासाठी वाकलेल्या कलिकेला आशीर्वाद देत म्हणाले ,‘अशीच रहा! वयाच्या वळणाचा हिशेब जय ठेवेल. त्याच्याही अन् तझ्याही.’ तिच्या डोक्यावर टपली मारत मी म्हणालो. ‘चला आता, आधी ट्रॅक्शन, मग डान्स प्रॅक्टिस. गाडीत माझ्या खांद्यावर रेललेल्या कलिकेनं डोळे न उघडता हळूच म्हटलं, ‘जय, म्हण ना रे एकदा गर्द सभोवती रान …..’ ‘तू तर चाफेकळी’ मी ओळ पूर्ण केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या