दिवाळी २०२० : आत्मनिर्भर

jalgaon-digital
4 Min Read

नाशिक | शमिका खुशाल कारिया

सध्या आत्मनिर्भर या शब्दाचे चर्वण जोरात चालले आहे. आत्मनिर्भरता म्हणजे इतरांवर अवलंबून न राहता स्वतःचे स्वतः बघणे. आत्मनिर्भरता हा शब्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात वापरल्यामुळे सगळीकडे या शब्दाची चर्चा सुरू झाली आहे. कोरोना विषाणूचा कहर जसजसा वाढत आहे तसतसे देशातील आज अगणित लोकांचे रोजगार धोक्यात आले आहेत, ज्यामुळे दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत उरलेली नाहीये.

अशा परिस्थितीत आत्मनिर्भर व्हा हे बोलणे कितपत योग्य आहे? तसेच आत्मनिर्भर होण्यासाठी ज्या हिमतीची गरज आहे त्यासाठी आपले सरकार आणि समाज तयार आहेत का, हाही एक प्रश्नच आहे, कारण प्रसिद्धी मिळण्यासाठी आणि लोकांचे समाधान करण्यासाठी केल्या जाणार्‍या घोषणा आणि देशाच्या दीर्घकालीन विकासासाठी आखलेली धोरणे यात फरक असतो.

तात्त्विक दृष्टीने विचार केल्यास या विश्वात कोणीही पूर्णपणे आत्मनिर्भर नाही. सार्वभौम राजा असला तरी त्यालादेखील इतरांची गरज आहेच. त्याचे कारण मनुष्य हा सर्व बाबतीत अपूर्ण आहे. गेल्या वर्षभरापासून जागतिक पातळीवर स्वयंसिद्धता, आत्मनिर्भरता, स्वावलंबन अशा वेगवेगळ्या नावाने जागतिकीकरणाचा प्रवाह बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपले तेच चांगले आणि बाहेरचे ते परके असे लोकांच्या मनात बिंबवले जाऊ लागले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ‘लेटस् मेक अमेरिका फर्स्ट’ ही घोषणा असो किंवा भारतातील लोकांची ‘चीनवर बंदी घाला’ अशी मानसिकता निर्माण होणे असो, यामध्ये सारखीच संकुचितता जाणवते. आत्मनिर्भरता या शब्दाचा अर्थ देशांतर्गत लोकसंख्येचे पालन-पोषण योग्य पद्धतीने करण्यासाठी देशांतर्गत संसाधनांचा पुरेपूर वापर करून घेणे हा आहे.

यामध्ये परदेशी सहाय्य नको ही भूमिका नसून सरसकट परदेशी मालावर अवलंबून नको, ही भूमिका आहे. पण राष्ट्रीय दृष्टीने विचार केला तरीदेखील भारताला सुरक्षेसाठी इतर राष्ट्रांकडून शस्त्रास्त्रे विकत घ्यावी लागतात हे कटू सत्य आहे. याचे कारण हजार वर्षांची गुलामी. आपण भारतीयांनी सोन्याचा विचार केला तेवढा लोखंडाचा केला नाही. दोन-दोन हात लांबीचे धनुष्य बाळगले मात्र बंदुकीचा विचार केला नाही.

पुराणात वर्णनानुसार खरोखर ब्रह्मास्त्र, पाशुपतास्त्र, नारायणास्त्र इ. उपलब्ध होते तर इंग्रजांच्या बंदुकीपुढे ते निष्प्रभ का ठरले? तात्पर्य, आपली शोधक बुद्धी कुठेतरी कमी पडली असावी. यात विचार करण्याची गोष्ट म्हणजे सर्वसामान्य आणि गरिबांचे काय? पैसा कमी तर गरजा कमी त्यामुळे तो आहे त्यावरच निर्भर असतो. उच्चभ्रू, धनवान यांच्या गरजा अफाट. पैसा खर्च करावयाचा नाद, मग भारतीय वस्तूला कोण विचारतो? त्यांना तर टूथपेस्टपासून पतंगीच्या धाग्यापर्यंत सर्वच वस्तू विदेशी हव्यात, इतर उपकरणांच्या बाबतीत न बोललेले बरे.

आत्मनिर्भर होण्यासाठी स्वदेशनिष्ठा व अनावश्यक गरजांवर अंकुश हे दोनच उपाय आहेत. भारताने जागतिक बाजारपेठेमधील एक वस्तू विकत घेणारा देश अशी आपली प्रतिमा बदलून वस्तू बनवणारा देश अशी प्रतिमा निर्माण करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलायला हवीत.

आपल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या..

एक राष्ट्र की शक्ति उसकी आत्मनिर्भरता में है, दुसरी से उधार लेकर काम चलाने में नहीं । आत्मनिर्भरता से ही मनुष्य की प्रगति सम्भव है ।

त्याचप्रमाणे चाणक्यांचे वचन आहे

अर्थी दोष न पश्यती

तुकोबरायांनीसुद्धा म्हटले आहेच की,

अल्पाजीवन करी, तुका म्हणे साधी हरी

हे सत्य आहे की, चैनबाज जीवनाची परिणीती महान संकटात होत असते. म्हणजेच गरजा कमी करा, आपल्या देशात निर्माण होणार्‍या वस्तू वापरा, आर्थिकदृष्ट्या देश समृद्ध करा, पण तरीदेखील सर्वच बाबतीत सर्व आत्मनिर्भर होणार नाही, हेही सत्य आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *