Saturday, April 27, 2024
Homeधुळेमूख हे शरिराचे प्रवेशद्वार, काळजी तर घेतलीच पाहिजे

मूख हे शरिराचे प्रवेशद्वार, काळजी तर घेतलीच पाहिजे

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शरिराची रचना विशिष्ट प्रकारची बनली आहे. एखाद्या सुंदर वास्तुचे प्रवेशद्वार त्याहून सुंदर असते तसे मुख हे आपल्या शरिराचे प्रवेशद्वार असून याची काळजी घ्यायलाच हवी.

- Advertisement -

हे प्रवेशद्वार निरोगी, स्वच्छ, सुंदर राहील याबाबत खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे. सध्या तर याबाबतीत जास्तीची काळजी घेण्याची गरज असल्याचे मत दंतचिकित्सक डॉ.विशाल वाणी यांनी व्यक्त केले.

रोटरी क्लब धुळे क्रॉसरोड आणि दै. देशदूतच्या वतीने विधायक, मार्गदर्शक उपक्रम राबविण्यात येत आहे. यात दररोज सायंकाळी 4 वाजता विविध तज्ज्ञ डॉक्टरांचे वेगवेगळ्या विषयांवर ऑनलाईन पध्दतीने मार्गदर्शन सुरु आहे. या उपक्रमात आज डॉ.विशाल वाणी यांनी मौखिक आरोग्य आणि उपचार या विषयावर मार्गदर्शन केले.

डॉ.वाणी म्हणाले, मौखिक आरोग्याबाबत प्रत्येकाने जागृत असणे आवश्यक आहे. आपण कोणता ब्रश वापरतो, ब्रश कसा करतो इथपासून ते दातांमधील स्वच्छता, हिरड्यांची काळजी व स्वच्छता, दातांचा निटनेटकेपणा यासंदर्भात वेगवेगळ्या पातळ्यांवर सातत्याने प्रबोधन सुरु आहे. धुळे डेंटल असोसिएशनच्या वेगवेगळ्या पदांवर काम करतांना आपणही याबाबतच्या कार्यशाळा घेतल्या आहेत. बर्‍याचदा विविध व्यसनांमुळे, सवयींमुळे मौखिक आरोग्य बिघडते. काहींना जन्मतः दातांची समस्या असते. दात तिरपे असणे, दातांमध्ये फटी असणे, दात किडणे अथवा हिरड्यांच्या आजारामुळे स्वाथ्य बिघडते. सौंदर्यावरही विपरीत परिणाम होतो. यासाठी नियमीतपणे आपल्या डेन्टीसकडे जाणे आवश्यक आहे. मौखिक आजाराबाबत जाणवणारी लक्षणे अथवा त्रास जाणवत असल्यास तत्काळ आपल्या डॉक्टरचा सल्ला घेणे गरजेचे आहे. किडलेले दात काढणे अथवा त्यात सिमेंट, चांदी भरणे सहज शक्य आहे. काढलेल्या दाताच्या जागेवर नवीन दात बसविण्याची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहे. शिवाय वैद्यक शास्त्रात झालेल्या वेगवेगळ्या संशोधनातून कोणत्याही मौखिक आजारावर पूर्णपणे उपचार करणे शक्य झाले आहे.

म्युकरमायक्रोसिसचा धोका

कोरोनानंतर अनेकांना म्युकरमायक्रोसिस या नव्या आजाराचा अर्थात काळ्या बुरशीचा धोका जाणवत आहे. यामुळे चेहर्‍यावर सूज येणे, दात दुखणे, हिरडीत सूज, पू येणे, नागपुडी बंद होणे, दृष्टी अंधूक होणे, नाकातून काळा द्रव येणे अशी याची लक्षणे असून काही रुग्णांचे दात तर काहींचे डोळेही काढावे लागत आहे. ही बुरशी मेंदुपर्यंत पोहचल्यास रुग्णाच्या जीवाला दाट धोका संभवतो आहे. अर्थात अशी लक्षणे जाणवल्यास तत्काळ उपचार सुरु करणे आणि सगळ्यांनीच कोंबट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करण्यासह दातांची, तोंडाची काळजी घेणे आवश्यक आहे.

दै.देशदूत- रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉसरोड, रोटरी क्लब चोपडा आणि रोटरीक्लब पलावा यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या