Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यामुंबई एका घराण्याची ठेवायची नाही !

मुंबई एका घराण्याची ठेवायची नाही !

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

काहींना महाराष्ट्रातील राज्य गेल्याचे दुःख होत नाही. पण मुंबईचे राज्य गेले की दुःख होते. कारण यांनी २५ वर्ष मुंबईच्या भरवशावर पूर्ण केले. त्यामुळे आता मुंबई महापालिका ही मूठभर लोकांची, एका परिवाराची, एका घराण्याची ठेवायची नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करीत त्यांना निवडणुकीचे आव्हान दिले.

- Advertisement -

आम्ही मराठीच्या नावाने मते मागणारे नव्हे तर मराठीची सेवा करणारे लोक आहोत. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईच्या विकासासाठी जे स्वप्न पाहिले ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे, असे सांगत फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या मदतीने सरकार स्थापन केल्यानंतर भाजपने मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. भाजपने आपल्या निवडणूक मोहिमेला ‘लक्ष्य २०२२ मुंबई ध्येयपूर्ती’ असे नाव दिले आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबई भाजपच्या वतीने षण्मुखानंद सभागृहात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना फडणवीस यांनी शिवसेनेवर नाव न घेता हल्लाबोल केला. मुंबईकरांच्या प्रश्नांना हात घालताना फडणवीस यांनी शिवसेनेच्या भावनिक मुद्द्यांची खिल्ली उडवली. यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार, मंगल प्रभात लोढा, मुंबईतील भाजप आमदार उपस्थित होते.

बाळासाहेब ठाकरे यांचे नाव सांगून जे निवडून आले त्यांनी बाळासाहेबांचे स्वप्न धुळीचे मिळवले. ते स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत. ते इतके आत्मकेंद्री होते की स्वतःच्या पलिकडे पाहू शकले नाहीत. सर्वसामान्य मुंबईकरांकडे यांनी कधीच लक्ष दिले नाही. त्यामुळे मुंबईकरांकडे पाहणारे लोक आपल्याला मुंबई महापालिकेत निवडून आणायचे आहेत, असे फडणवीस म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या