Thursday, April 25, 2024
Homeनगरशिक्षण विभागाच्या सर्वेक्षणात आढळली एक हजार शाळाबाह्य मुले

शिक्षण विभागाच्या सर्वेक्षणात आढळली एक हजार शाळाबाह्य मुले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या काळात केलेल्या सर्वेक्षणात 756 मुले जिल्ह्यात स्थलांतरीत होऊन आलेली, तर 246 मुले इतरत्र स्थलांतरीत झालेली अशी एकूण 1002 मुले शाळाबाह्य आढळली आहेत. शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी शिक्षण विभागाने ही शोधमोहीम राबवली.

- Advertisement -

जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदींनी वीटभट्टी, रेल्वे स्टेशन, प्रत्येक गावातील गजबजलेल्या वस्त्या, ऊसतोड कामगारांच्या वस्त्या, बाजारतळ, बांधकाम व्यवसायातील कामगार, तसेच रस्त्यावर राहणारे कुटुंब अशा ठिकाणी भेटी देऊन 6 ते 14 वयोगटातील बालके ज्यांनी अद्याप शाळेत नाव दाखल केले नाही किंवा ज्यांची शाळेतील अनुपस्थिती एक महिन्यापेक्षा जास्त आहे अशा बालकांचा शोध घेण्यात आला. दरवर्षीच ही मोहीम राबविली जाते. यावर्षी जुलैमध्ये राबविलेल्या मिशन झिरो ड्रॉप मोहीमेतही 160 शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर अशी 15 दिवसांचे हे सर्वेक्षण जिल्ह्यात करण्यात आले. त्यात एकूण 1002 मुले-मुली शाळाबाह्य आढळली आहेत.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियम 2009 नुसार वय वर्ष 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकास मोफत व सक्तीचे शिक्षण घेण्याचा हक्क आहे. असे असले तरी राज्यात पालकांचे विविध व्यवसायाच्या निमित्ताने होणारे स्थलांतर व त्यामुळे मुलांच्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षणात खंड पडण्याची समस्या निर्माण होताना दिसत आहे. त्यातही मुलींचे प्रमाण वाढण्याची भीती जास्त आहे. स्थलांतर करणारी कुटुंबे ही आर्थिक स्तर निम्न असलेल्या वंचित सामाजिक गटातील, भूमीहीन अथवा अल्पभूधारक असतात.

तसेच रोजगाराची अनिश्चितता, सामाजिक असुरक्षितता व पालकांच्या मनातील भीती यामुळे वाढणारी बालमजुरी आणि बालविवाहांचे प्रमाण वाढत आहे ते रोखण्याचे एक आव्हान आहे. मोठ्या प्रमाणात ही कुटुंबे ऊसतोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रात तर शेजारी असणार्‍या कर्नाटक व गुजरात राज्यात स्थलांतर करतात. हे स्थलांतर साधारणत: सप्टेंबर महिन्यात होत असते. तसेच वीटभट्टी, दगडखाण मजूर, कोळसा खाणी, शेतमजुरी, बांधकाम व्यवसाय, रस्ते, नाले, जिनिंग मिल आदी प्रकारच्या कामानिमित्त विविध कामगार स्थलांतर करीत असतात. त्यामुळे ही मुले शोधण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले.

तालुकानिहाय आलेले स्थलांतरीत

कोपरगाव 192, नेवासा 148, अकोले 7, जामखेड 23, कर्जत 3, नगर 34, पारनेर 12, पाथर्डी 34, राहाता 49, राहुरी 19, संगमनेर 13, शेवगाव 35, श्रीगोंदा 123, श्रीरामपूर 55, मनपा 09 – एकूण 756

- Advertisment -

ताज्या बातम्या