अवैध सावकारी प्रकरणी सहकार विभागाचे जळगावसह कासोद्यात छापे

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध सावकारी विरोधात अनेक तक्रारी सहकार विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार सहकार विभागाच्या तीन पथकांनी आज 16 फेब्रवारी रोजी सपना शैलेश बियाणी, शैलेश श्रीराम बियाणी, श्रीराम गणपत बियाणी यांच्या जळगाव शहरात व कासोदा येथील दुकाने व घरांवर छापे टाकून कारवाई केली.

यात अवैधरित्या सावकारी बाबत अनेक महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी दिली.

जिल्हा सहकार विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी तीन पथके नियुक्त केली. त्यात सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक व छापा पथकप्रमुख के.पी.पाटील(एरंडोल), जी.एच. पाटील(अमळनेर) आणि विलास गावडे (जळगाव) यांच्या नेतृत्वाखाली ही पथके नियुक्त करण्यात आली.

पथकाने सपना शैलेश बियाणी, शैलेश श्रीराम बियाणी, श्रीराम गणपत बियाणी या तिघांच्या कासोदा येथील घरे व दुकान तसेच जळगाव शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटजवळील दत्त कॉलनी येथे अचानक सकाळी 11 ते 12 वाजेदरम्यान छापे टाकले. त्यात ते अवैधरित्या सावकारी करताना आढळून आले.

त्यांच्याकडून सावकारी व्यवहाराची अनेक कागदपत्रे, फाईल जप्त करण्यात आल्या आहेत. जळगाव येथील छाप्यात विलास गावडे यांच्या नेतृत्वाखाली आय.बी. तडवी, चेतन राणे, नीलेश घाटोळ, संगीता गायकवाड यांचा सहभाग होता. तसेच कारवाईवेळी रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांचा बंदोबस्त होता. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

अवैध सावकारी करणार्‍यांचे धाबे दणाणले

जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध सावकारसंदर्भात यापुर्वीही सहकार विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मात्र त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नव्हती. नुकतेच संतोष बिडवई यांनी जिल्हा उपनिबंधक पदाचा पदभार घेतला असुन सहकार विभागाने वर्षभरात अशी धडक कारवाई केल्याने अवैध सावकारी करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. अशी कारवाईची मोहीम सहकार विभागाने वर्षभर सातत्याने केल्यास अनेक अवैध सावकार समोर येतील अशी अपेक्षाही कारवाईच्या निमित्ताने व्यक्त होत आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *