Saturday, April 27, 2024
Homeजळगावसप्ताह घडामोडी : बाप्पा..., सुबुध्दी दे!

सप्ताह घडामोडी : बाप्पा…, सुबुध्दी दे!

डॉ.गोपी सोरडे

जळगाव – Jalgaon

- Advertisement -

राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेने विकासाच्या दृष्टीने विचार केला तर, जळगाव जिल्हा अतिशय मागे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेसह जिल्ह्यातील नेत्यांना ‘सुबुध्दी दे बाप्पा ’…!

जळगाव शहरासह जिल्ह्यात विकासाची वाणवा आहे. अनेक मोठमोठे प्रकल्प रखडले आहेत. नेत्यांकडून केवळ आश्वासनांचा पाऊस असतो. मात्र, प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी होतांना दिसून येत नाही. जिल्ह्यावर अनेक संकट निर्माण झाले आहेत. (corona) कोरोनाचे संकट जात नाही तोच, जिल्ह्यातील (chalisgaon) चाळीसगाव तालुक्यात महापुराचे संकट आले आहे. या संकटातून सर्वसामान्य नागरिक अद्यापही सावरलेले नाही.

जलसंपदा मंत्र्यांसह पालकमंत्री, आमदार, खासदार यांनी त्या भागाची पाहणी केली. परंतू, संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांसह सर्वसामान्य नागरिकांना मदत मिळेल का, पूरग्रस्तांचे तात्काळ पुनर्वसन होईल का, असे नानाविध प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट आले आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसर्‍या लाटेचे संकट अधिक होते. प्रशासकीय आणि आरोग्य यंत्रणेमुळे सद्यातरी काहीसे नियंत्रण मिळविण्यावर यश आले आहे. कोरोनाचा अद्यापही धोका टळलेला नाही. तोच जळगाव शहरासह जिल्ह्यामध्ये डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुणिया यासारख्या साथ रोगाने डोके वर काढले आहे. ज्याप्रमाणे कोरोनाच्या संकट काळात उपाय योजना केल्यात. त्याच पध्दतीने साथरोग नियंत्रणासाठी प्रशासकीय यंत्रणेने उपाययोजना करावी. अशी अपेक्षा सर्वसामन्य नागरिकांकडून होत आहे. किंबहूना, त्यांची अपेक्षा रास्तच आहे.

जळगाव शहराची तर, प्रचंड दुरावस्था झाली आहे. जे आहेत, त्या रस्त्यांची तर वाट लागली आहे. तसेच काही ठिकाणी तर, रस्तेच नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांचे मोठे हाल होवू लागले आहे. तरीही देखील महानगरपालिकेच्या सत्ताधार्‍यांना कुठलेही सोयर-सुतक नाही. वास्तविक पाहता, राज्यात सेनेची सत्ता आहे. महापालिकेतही सेनेची सत्ता आहे. असे असतांना सत्ताधारी जनतेचा विचार न करता, केवळ सत्ता उपभोगण्याचा प्रयत्न करीत आहेत.

जिल्ह्यातील विकास कामांचा आणि प्रलंबित विकास कामांचा आढावा घेण्यासाठी विधी मंडळाची अंदाजपत्रक समिती जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर आली होती. अनेक रखडलेल्या प्रकल्पांना भेट देवून पाहणी केली. त्यामुळे आता, बाप्पा…, जिल्ह्याच्या विकासासाठी नेत्यांना सुबुध्दी दे! एवढंच मागणं आहे.

– मो. 9834166072

- Advertisment -

ताज्या बातम्या