Wednesday, April 24, 2024
Homeधुळेदिव्यांगांनी पाळला काळा दिवस

दिव्यांगांनी पाळला काळा दिवस

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

दिव्यांगांच्या न्यायहक्काकडे दुर्लक्ष करणारे तसेच निष्क्रिय कर्मचार्‍यांना पाठिशी घालणारे अधिकारी, दिव्यांगांना त्यांच्या योजनेचा लाभ न देणारे ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभारामुळे जागतिक दिव्यांग दिवस हा प्रहार जनशक्ती पक्षातर्फे काळा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात आली.

- Advertisement -

याबाबत प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिव्यांगांना न्याय हक्क मिळण्यासाठी प्रशासनाविरोधात अनेक वेळा आंदोलने करण्यात आले.

निवेदनेही देण्यात आले, तरी देखील दिव्यांगांना त्यांचा न्याय हक्क मिळाला नाही. प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी हे तोंडी आश्वासन देतात.

आंदोलन तिव्र होत असेल तेव्हा लेखी स्वरुपात आश्वासन देतात व वेळ मारुन नेतात. कृती मात्र काहीच करत नाही. ग्रामसेवक दिव्यांगांच्या कल्याणासाठी असलेल्या शासन निर्णयाकडे दुर्लक्ष करुन शासनाच्या डोळ्यात धुळफेक करीत असतात.

दिव्यांगांना अपमानास्पद वागणूक व उडवा उडवीची उत्तरे देतात. गटविकास अधिकारी अशा ग्रामसेवकांवर नियंत्रण ठेवत नाहीत. यामुळे दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळत नाही. अशा कामचुकार निष्क्रिय कर्मचार्‍यांबाबत जि.प.च्या सीईओंकडे तक्रारी करुनही त्याचा उपयोग होत नाही.

प्रशासनाच्या अशा मनमानी कारभारामुळे झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी 3 डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिवस साजरा न करता काळा दिवस म्हणून साजरा करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

दिव्यांगांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर दि.1 जानेवारी 2011 रोजी सामुहिक आत्मदहन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

आंदोलनात जिल्हाध्यक्ष वसंत बोरसे, मंदाकिनी गायकवाड, दिलीप दगडे, संजय विभांडिक, धवलू लकडे, संजय कांकरिया, प्रल्हाद पाटील, सरला सूर्यवंशी, शितल चव्हाण, देवा सोनार, भटू पाटील, सुकलाल पाटील आदिंसह दिव्यांग बांधव सहभागी झाले होते.

अशा आहेत मागण्या- सन 2011 ते सन 2020 पर्यंतच्या दिव्यांगांसाठी असलेल्या ग्रामपंचायत मधील मागील 3 टक्के व चालू वर्षाच्या 5 टक्के निधी दिव्यांगांना तत्काळ मिळावा, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांगांचे नोंदणी रजिस्टर ठेवावे.

दिव्यांगांना व्यवसायाकरिता ग्रामपंचायत अंतर्गत 200 चौ.फु. जागा उपलब्ध करून द्यावी. प्रत्येक ग्रामपंचायती अंतर्गत दिव्यांनांना घरकुलाचा लाभ मिळावा, जि.प.मध्ये दिव्यांगांसाठी कायमस्वरुपी व्हिलचेअर उपलब्ध करून द्यावी. जि.प. मधील सर्व विभागात जाण्यासाठी दिव्यांगांकरीता रँम्प किंवा लिफ्टची सोय करावी.

- Advertisment -

ताज्या बातम्या