Thursday, April 25, 2024
Homeनाशिकऑक्सिजन, जीवनावश्यक औषध तुटवड्यावर तोडगा काढा

ऑक्सिजन, जीवनावश्यक औषध तुटवड्यावर तोडगा काढा

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकमधील करोनाची परिस्थिती तसेच ऑक्सिजन आणि जीवनावश्यक औषधांची कमतरता यावर आयएमएच्या पदाधिकार्‍यांनी पालकमंत्र्यांकडे विशेष लक्ष घालून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.

- Advertisement -

इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक शाखेचे पदाधिकारी व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची बैठक पार पडली. सध्याच्या परिस्थितीत नाशिकला 125 ते 150 टन ऑक्सिजनची गरज असून आता फक्त 85 टन ऑक्सिजनचा पुरवठा नाशिकला होत आहे. यावर सरकारकडे विशेष मागणी करून अधिक ऑक्सिजन टँकर उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच इंडस्ट्रीयल ऑक्सिजन मेडिकल वापरासाठी वळवता येईल का यावरही चर्चा झाली.

त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट अधिकाधिक प्रमाणात कसे तयार करण्यात येऊ शकतात आणि भविष्यातही अशी समस्या येऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य ते निर्णय घ्यावेत, अशी विनंती आयएमए अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस यांनी केली. त्याचप्रमाणे रेमडिसीव्हर व जीवनावश्यक औषधांचा तुटवडा जाणवत असून यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी बोलतांना पालकमंत्र्यांनी प्रशासन पूर्णपणे डॉक्टरांच्या पाठीशी असून लवकरात लवकर ऑक्सिजन, रेमडिसीव्हर व इतर आवश्यक गोष्टींचा पुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन दिले. तसेच या करोना संकटात नाशिकमधील सर्व वैद्यकीय व्यावसायिक अपुरी साधने असूनही खूप चांगले काम करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. नागरिकांनीदेखील या काळात संयम बाळगावा आणि प्रशासनाला आणि डॉक्टरांना सहकार्य करावे, असे आवाहनदेखील केले.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष रंजन ठाकरे तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस, उपाध्यक्ष डॉ.विशाल गुंजाळ, माजी अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे, डॉ. अनिरुद्ध भांडारकर, डॉ. शोधन गोंदकर, डॉ. नीलेश निकम आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या