Friday, April 26, 2024
Homeदेश विदेश'मी अजूनही शेतकऱ्यांसोबत..'; दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केल्यानंतर ग्रेटा थनबर्गची प्रतिक्रिया

‘मी अजूनही शेतकऱ्यांसोबत..’; दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केल्यानंतर ग्रेटा थनबर्गची प्रतिक्रिया

दिल्ली l Delhi

भारतातील शेतकरी आंदोलनावर आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या चर्चा सुरु आहे. जगभरातील सेलिब्रेटिंनी या आंदोलनावर ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त करत पाठिंबा दर्शवला आहे. शेतकरी आंदोलनावर ट्विट करणारी पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg) विरुद्ध दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.

- Advertisement -

ग्रेटा थनबर्गने मंगळवारी रात्री टि्वट करताना भारतातील शेतकरी आंदोलकांच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहोत, असे म्हटले होते. ग्रेटा विरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरमध्ये ग्रेटा थनबर्गवर १५३ अ (धर्माच्या आधारावर वेगवेगळया गटांमध्ये वैरभाव निर्माण करणं) आणि कलम १२० ब (गुन्हेगारी कट रचण) या कलमातंर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवल्यानंतर आता ग्रेटा थनबर्गने टि्वटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. “मी शेतकऱ्यांसोबत आहे. त्यांच्या शांतीपूर्ण आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. कुठलाही द्वेष, धमकी किंवा मानवी हक्काच्या उल्लंघनामुळे यात बदल होणार नाही” असे ग्रेटा थनबर्गने म्हटले आहे.

१८ वर्षीय ग्रेटा थनबर्गनं नुकतंच ‘भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आम्ही समर्थन देत आहोत’ असं ट्विट केलं होतं. त्यानंतर ख्यातनाम पॉप गायिका रिहाना हिनेदेखील या मुद्यावर एक ट्विट करत भारतातील शेतकरी आंदोलकांना पाठिंबा जाहीर केला होता. यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक सेलिब्रिटींनी या मुद्यावर ट्विट केलं होतं.

दरम्यान, रिहाना, ग्रेटा थनबर्ग, मिया खलिफा, अमांडा सर्नी यांनी सोशल मीडियावरून शेतकरी आंदोलनाच्या समर्थानार्थ भावना व्यक्त केल्या होत्या. सोशल मीडियात शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर केंद्र सरकार खवळले आहे. अशा मुद्यांवर टिप्पणी करण्याआधी आधी तथ्य बघा, विषय पूर्णपणे समजून घ्या, सोशल मीडिया हॅशटॅग्स आणि कमेंट्सच्या सनसनाटीमध्ये पडणे ही केवळ चुकीची गोष्ट नव्हे, तर बेजबाबदारपणाचे लक्षण आहे, असे सरकारने अमेरिकेतील कलाकारांना सुनावले आहे.

ग्रेटाची दुटप्पी भूमिका समोर

ग्रेटा थनबर्ग हिने शेतकरी आंदोलनाबद्दल केलेलं ट्विट एक ‘षडयंत्र’ असल्याचं भारतीय जनता पक्षाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी म्हटलंय. नोबल पुरस्कार पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी चांगल्या कामांसाठी दिलं जातं परंतु, इथे तर जे लोक पेंढा जाळतात, वातारवणाला प्रदूषित करतात, पाण्याचा दुरुपयोग करतात त्यांच्यासोबतच ग्रेटा थनबर्ग उभी राहिली आहे. हा दुटप्पी चेहरा या संपूर्ण कार्यक्रमातून आता समोर आला आहे’ असं म्हणत मीनाक्षी लेखी यांनी ग्रेटा थनबर्ग हिला आपल्या निशाण्यावर घेतलं.

ग्रेटा थनबर्ग ही एक लहान मुलगी आहे. माझ्या हातात असतं तर मी तिला बाल पुरस्कार दिला असता आणि तिचं नाव नोबल पुरस्कारातून हटवलं असतं, असं म्हणत ग्रेटाला दिल्या गेलेल्या ‘नोबल पुरस्कारा’वरच भाजप खासदारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

- Advertisment -

ताज्या बातम्या