Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रदिल्ली-मुंबई विमान, रेल्वे सेवा बंद होणार?

दिल्ली-मुंबई विमान, रेल्वे सेवा बंद होणार?

मुंबई l Mumbai

दिल्लीमध्ये करोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे दिल्ली येथे काही प्रमाणावर पुन्हा एकदा निर्बंध लावले जात आहेत. त्यातच आता मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र सरकारही सावध पावले टाकताना दिसत आहे. त्यामुळे दिल्ली-मुंबई विमान, रेल्वे सेवा यांच्यावर निर्बंध येऊ शकतात. राज्य सरकार याचा विचार करत आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

- Advertisement -

दिवाळीच्या आधीच दिल्लीत करोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होण्यास सुरूवात झाली होती. गेल्या दहा दिवसांत दिल्लीत ६० हजार करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीबरोबरच मुंबईसह महाराष्ट्रातही रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. करोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन राज्य सरकार दिल्ली-मुंबई हवाई व रेल्वे सेवा बंद करण्याची शक्यता आहे. तसा विचारही राज्य सरकार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्लीत करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं राज्य सरकार असा निर्णय घेण्याची शक्यता आहे, असं सूत्रांनी म्हटलं आहे. मुंबई-दिल्ली विमान व रेल्वे सेवा बंद करण्यासंदर्भातील आदेश महाराष्ट्र सरकारकडून लवकरच काढण्यात येतील, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. दिल्लीत मागील २४ तासात तब्बल ७ हजार ५०० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. २८ ऑक्टोबरपासून दिल्लीत रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दिल्लीत सुरूवातीला एकाच दिवसा ५००० हजार रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर ११ नोव्हेंबरपर्यंत २४ तासात आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येनं ८ हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

दरम्यान, मुंबई महापालिका आयुक्तांनी नुकताच आदेश दिला आहे त्यानुसार मुंबई महापालिका शाळा आता थेट पुढच्या वर्षी म्हणजेच जानेवारी २०२१ मध्ये सुरु होणार आहेत. महापालिका आयुक्त आय एस चहल यांनी आपल्या अधिकारांचा वापर करत मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व शाळा ३१ डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याबाबतचे आदेश दिले आहेत. मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील शाळा या दिवाळीनंतर सुरु होतील, असा अंदाज वर्तवला जात होता. परंतू, आता थेट पुढच्याच वर्षी शाळा सुरु होणार असे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट आली, तर ती सगळ्यांना महागात पडेल – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मागील दोन दिवसांत राज्यातील रुग्णांच्या संख्येतही चिंताजनक वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला खबरदारीचा इशारा दिला आहे. “राज्य सरकारनं खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट आली, तर ती सगळ्यांना महागात पडेल. राज्यात लाट येऊ नये असं वाटतं, पण मनात भीती आहे,” अशा शब्दात राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केलं आहे. रत्नागिरीत माध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी राज्यातील करोना परिस्थितीवर भाष्य करताना चिंता व्यक्त केली.

“दिल्लीत सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र सरकारनं खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळं राज्यातील जनतेनं केरळ आणि दिल्लीचा बोध घ्यावा,” असं आवाहन आरोग्यमंत्री टोपे यांनी नागरिकांना केलं आहे. तसेच “केरळ आणि दिल्लीमध्ये करोनाचा प्रसार वाढत आहे. मास्कचा वापर टाळणं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन न झाल्यामुळे दिल्ली आणि केरळमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे शाळा सुरु होत असताना मुलांची सुरक्षा महत्वाची आहे. त्यामुळे शाळांच्या निर्जंतुकीकरणासाठी शिक्षकांना जे शक्य असेल ते त्यांनी करावं. नाहीतर एखाद्याला कंत्राट देऊन शाळांचं निर्जंतुकीकरण करावं,” अशी विनंती टोपे यांनी केली आहे.

“राज्यात सध्या कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळे पार पाडण्याची परवानगी राज्य सरकारनं दिलेली आहे. मात्र, आता लग्नासाठी उपस्थिती संख्या वाढवण्याचे संकेतही टोपे यांनी दिले आहेत. तसंच कुणीही करोनाला गृहित धरू नये. सर्वांनी काळजी घ्यावी, स्वंयशिस्त पाळली पाहिजे, तरच करोनाच्या दुसऱ्या लाटेवर मात करणं शक्य होईल, असंही राजेश टोपे म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या