Wednesday, May 8, 2024
Homeनगरतीन अथवा चार वर्षाची पदवी घेण्याचे विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य

तीन अथवा चार वर्षाची पदवी घेण्याचे विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

भारतातील गेल्या सत्तर वर्षातील शिक्षणव्यवस्थेवर, केवळ बौद्धिक विकासावर भर देणारी शिक्षण व्यवस्था म्हणून टीका केली गेली आहे. आज शिक्षणाचा विचार जेव्हा केला जातो, शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भाने जेव्हा बोलले जाते तेव्हा ते सारे मार्कात मोजले जाते. आपण मार्कामध्ये जे मोजतो ती खरच गुणवत्ता असते का? आणि ती गुणवत्ता आहे असे मानले तर ती गुणवत्ता ही केवळ बौद्धिकच असते.

- Advertisement -

मग शारीरिक आणि मानसिक विकासाचे काय करायचे हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. शिक्षणातून ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या साध्यतेबद्दल काय? असा प्रश्न पडतोच. या सर्व प्रश्नांवर उत्तर शोधण्याचा संगमनेर महाविद्यालयाचा सातत्याने प्रयत्न राहिलेला आहे. प्राचार्य म. वि. कौंडीण्य, ओंकारनाथ मालपाणी यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर महाविद्यालयाने एक प्रयोगशील महाविद्यालय म्हणून लौकिक मिळविला आहे. काळाची आव्हाने पेलू शकणारा नवयुवक निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याची सर्वप्रथम संधी संगमनेर महाविद्यालयाला मिळाली आहे, अशी माहिती शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी पत्रकार परिषदेतून दिली.

संगमनेर महाविद्यालयात 2023-24 या शैक्षणिक वर्षात प्रथम वर्ष पदवीचे प्रवेश नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार होणार यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेतून ते बोलत होते.

पुढे बोलतांना डॉ. मालपाणी म्हणाले, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचे प्रमुख फायदे संगमनेर तालुका व परिसरातील विद्यार्थ्यांना होणार आहेत

विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य उपलब्ध होईल. पारंपारिक पद्धतीत विद्यार्थ्याला त्याच्या आवडीच्या इतर विद्याशाखांचे विषय निवडण्याची सोय नव्हती. सन 2023-24 पासून संगमनेर महाविद्यालयात प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्याला त्याच्या/तिच्या आवडीच्या इतर विद्याशाखेचे अभ्यासक्रम निवडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल., विद्यार्थ्याला आपल्या आवडीचे मर्यादित कालावधीचे अभ्यासक्रम स्वायत्त संगमनेर महाविद्यालयात पूर्ण करता येतात.

विद्यार्थ्याला मातृभाषेतून पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्याची सोय नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात संगमनेर महाविद्यालयात करण्यात आली आहे. पारंपारिक अभ्यासक्रमात इंग्रजीची अनावश्यक सक्ती होती. नवीन शैक्षणिक धोरणात सर्व विषयांना समान न्याय देण्यात आला आहे. कोणताही विषय अथवा कौशल्य कमी महत्वाचे मानलेले नाही. याचा सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी होईल., संगमनेर महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्यू व परदेशात इंटरशिपची सोय यापूर्वीच करण्यात आलेली आहे. महाविद्यालयातील बी व्होक अभ्यासक्रमाचे अनेक विद्यार्थी युरोपमधील अनेक देशात कार्यरत आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी करताना विद्यार्थ्यांना अशा संधी अधिक प्रमाणात उपलब्ध होतील. संगमनेर महाविद्यालयाला रोजगाराभीमुख व कौशल्याधिष्ठित शिक्षणाची प्रदीर्घ परंपरा आहे.

संगमनेर महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्यूच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हमखास नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाते., राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना संगमनेर महाविद्यालयात अशा प्रकारचे अभ्यासक्रम अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा महाविद्यालयाचा मानस आहे. सध्या महाविद्यालयात 63 विविध प्रकारचे कौशल्याधिष्ठित प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविले जात आहेत. तसेच पाच विविध विषयातील बी व्होक पदवी अभ्यासक्रम राबविले जातात., नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार पदवी घेण्याची नगर जिल्ह्यात केवळ संगमनेर महाविद्यालयातच संधी उपलब्ध आहे. या पद्धतीत विद्यार्थ्याला काही कारणाने शिक्षण सोडावे लागल्यास तो शिक्षण प्रवाहातून बाहेर पडणार नाही याची काळजी घेतली जाईल.

विद्यार्थ्याने पदवीचे पहिले वर्ष पूर्ण केल्यानंतर त्याला सर्टिफिकेट मिळेल. दुसरे वर्ष पूर्ण केल्यावर डिप्लोमाचे प्रमाणपत्र दिले जाईल व तिसर्‍या वर्षानंतर पदवी प्रमाणपत्र मिळेल. विद्यार्थ्याला तीन वर्षाची अथवा चार वर्षाची पदवी घेण्याचे स्वातंत्र्य असेल. चौथ्या वर्षांच्या पदवीचा पर्याय विद्यार्थ्याला असेल. त्याला ऑनर्स तथा संशोधनाची पदवी मिळेल. चौथ्या वर्षाची संशोधन पदवी विद्यार्थ्यांने घेतल्यास त्याला पीएच डी करता येईल. महाविद्यालयातील विविध 11 विषयांच्या संशोधन केंद्रामधून 63 संशोधक मार्गदर्शक 227 पेक्षा जास्त संशोधक विद्यार्थ्यांना मागर्दर्शन करत आहेत., महाविद्यालयाने महाविद्यालयातील गरीब होतकरू, गरजू विद्यार्ध्यांसाठी कमवा व शिका योजनेअंतर्गत मागेल त्याला काम देऊन विद्यार्थ्यांच्या आर्थिक समस्या दूर करण्याच्या प्रयत्न केला आहे. तसेच आर्थिक परिस्थिती हलाखीची असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय विद्याधन कलश योजना सुरु केलेली आहे.

संगमनेर महाविद्यालयाच्या कार्याची महाराष्ट्रभर प्रशंसा झालेली आहे. अनुभवी प्राध्यापक, गुणवत्तेचा व नाविन्याचा आपणास असलेला ध्यास यामुळेच महाविद्यालयाने आधी स्वायत्त दर्जा मिळविला व शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या जिल्ह्यात सर्वप्रथम अंमलबजावणीचा मान महाविद्यालयाला मिळाला आहे. यामुळेच विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली ने महाराष्ट्र राज्यातील 32 महाविद्यालयांची निवड नॅक मार्गदर्शक म्हणून परामर्श योजनेसाठी केली होती. या 32 महाविद्यालयांपैकी संगमनेर महाविद्यालय एक होते. संगमनेर महाविद्यालय नेहमीच नवनवीन उपक्रमाचे, संकल्पनांचे उगम स्थान म्हणून ओळखले जाते. नवनवीन उपक्रम करण्यासाठी आमची शिक्षण प्रसारक संस्था – व्यवस्थापन मंडळ आर्थिक पाठबळ देवून गंभीरपणे पाठीशी उभी राहते, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या