पदवी परीक्षेच्या पहिल्याच पेपरमध्ये ‘गोंधळा’चा प्रश्न

jalgaon-digital
3 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पुणे विद्यापीठांतर्गत पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांना काल सोमवारपासून सुरुवात झाली.

मात्र, पहिल्या पेपरपासूनच विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. ऑफलाईन पेपर दोन तासांपेक्षा अधिक वेळ उशिराने सुरू झाला. तर दुसरीकडे ऑनलाईन परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना रेंज गुलच्या अडचणीला समोरे जावे लागले.

राज्य सरकारच्या आदेशानुसार पुणे विद्यापीठांतर्गत पद्वीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा काल सोमवारपासून पुणे विभागातील पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यात सुरू झाल्या. विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन पर्याय परीक्षेसाठी होते. त्यानुसार सुमारे 90 टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेचा पर्याय निवडला.

तर केवळ दहा टक्के विद्यार्थी ऑफलाइन परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. ऑफलाइन परीक्षेसाठी नगर शहरात दोन, तर जिल्ह्यात इतर ठिकाणी त्या त्या महाविद्यालयात सुमारे 34 केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहिती विद्यापिठ उपकेंद्राच्या सुत्रांकडून देण्यात आली.

पद्वीच्या शेवटच्या वर्षासाठीची परीक्षा सकाळी दहा वाजता, दुपारी एक वाजता आणि सायंकाळी चार वाजता अशा तीन सत्रात दररोज पेपर होत आहेत. 50 गुणांची ही परीक्षा असून विद्यार्थ्यांना केवळ बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. त्यात पर्याय निवडून एका तासाच्या वेळेत हे पेपर द्यायचे आहेत. बीएस्सी, बीकॉम, बीए, अभियांत्रिकी, एमबीए, बीसीएस अशा विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा एकाच वेळी होत आहेत. सोमवारी दिवसभरात विविध अभ्यासक्रमांच्या एकूण 17 विषयांच्या परीक्षा झाल्या. त्यात बॅकलॉकच्या परीक्षेचाही समावेश आहे.

दरम्यान, सकाळी दहा वाजता सुरू होणार्‍या पहिल्या पेपरला अडचण आली. पेपरची वेळ दहाची असताना विद्यापीठाकडून प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठीचा ओटीपी (वन टाईम पासवर्ड) महाविद्यालयांना वेळत मिळाला नाही. त्यामुळे दहाचा पेपर तब्बल 12 वाजता सुरू झाला, तर एक वाजता असणारा पेपर तब्बल चार वाजता सुरू झाला.

चार वाजता असणारा पेपर मात्र वेळेत घेण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांना कित्येक तास ताटकळत बसावे लागले. ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना घरीच कॉम्प्युटर किंवा मोबाइलवर परीक्षेची सोय होती. परंतु अनेक ठिकाणी घरात नेटवर्कची समस्या असल्याने विद्यार्थ्यांनी घराबाहेर, झाडाखाली किंवा इतर ठिकाणी परीक्षा दिली.

परंतु त्यातही अधूनमधून नेटवर्कची अडचण येत होती, अशी माहिती विद्यार्थ्यांकडून समजली. पहिल्याच पेपरला विद्यार्थी यांचे हाल झाल्याने आता पुढील पेपरच्या वेळ विद्यापीठ काय मार्ग काढणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष राहणार आहे.

सॅनिटयझर, मार्स्कची सक्ती

ऑफलाइन परीक्षेसाठी मुले केंद्रावर आले असता करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात आली. सर्व मुलांना सॅनिटायझरची व्यवस्था करणे, त्यांचे थर्मल स्कॅनिंग करणे, वर्गात सोशल डिस्टंसिंगनुसार व्यवस्था, तसेच मास्क अनिवार्य अशी खबरदारी परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *