Friday, April 26, 2024
Homeनगरवृद्धाची फसवणूक करणारा खंडणीखोर पोलिसांच्या जाळ्यात

वृद्धाची फसवणूक करणारा खंडणीखोर पोलिसांच्या जाळ्यात

अकोले |प्रतिनिधी| Akole

राज्य महिला आयोग मुंबई यांचेकडील खोट्या तक्रारीची भिती दाखवून वृध्द इसमाची 5 लाख 35 हजार रुपयांची फसवणूक करणारा खंडणीखोर अकोले पोलिसांनी जेरबंद केला आहे.

- Advertisement -

यातील तक्रारदार वृध्द इसम व त्यांचे सुनेमध्ये गृहकलह व मालमत्तेच्या वाटपावरुन झालेल्या वादाचा फायदा घेऊन आरोपी सचिन बाळू रेवगडे (वय 28 वर्षे, रा. हिवरगाव ता. अकोले) याने वृध्द इसमास तुमच्या विरुध्द तुमच्या सुनेने राज्य महिला आयोग, महाराष्ट्र शासन मुंबई यांचेकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीमध्ये तुम्हाला वीस वर्षे शिक्षा होईल, अशी वृध्द इसमास भिती घालून तसेच राज्य महिला आयोग मुंबई या वैधानिक संस्थेचे नावे बनावट कागदपत्र व बनावट शिक्के तयार करुन तसेच खोट्या सह्या करुन वृध्द इसमास वेळोवेळी फोनव्दारे तसेच प्रत्यक्ष भेटून त्यांना राज्य महिला आयोग व पोलीस स्टेशन यांचे कारवाईची भिती घातली.

वेळोवेळी बळजबरीने रुपये 5 लाख 35 हजार रुपये रक्कमेची खंडणी गोळा केली. अधिक पैशांची मागणी करु लागला असता वृध्द इसमाने पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरुन अकोले पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 239/2022 भा.दं.वि. कलम 420, 471, 472, 473, 384, 385 प्रमाणे गुन्हा दाखल करुन खंडणीखोर सचिन रेवगडे यास अकोले पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यास दि. 29 मे रोजी न्यायालयात हजर केले असता त्यास प्रथम दि. 01 जून रोजी पर्यंत व त्यानंतर दि. 04 जून रोजीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

आरोपी सचिन रेवगडे हा पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असताना आरोपीकडून खंडणी घेतलेली 1 लाख 50 हजार रुपये रोख व कॉम्पुटर सेट, पेनड्राईव्ह, बनावट रबरी शिक्का, राज्य महिला आयोगाचे नावाने बनविलेले कागदपत्रे, गुन्ह्यात वापरलेले दोन मोबाईल फोन, एक चारचाकी वाहन असा एकूण 5 लाख 50 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याचे तपासात आरोपी याने त्याचे मोबाईलच्या सहाय्याने 8 वेगवेगळ्या नावाचे बनावट ई-मेलआयडी तयार करुन त्यावरुन खोट्या स्वरुपाच्या तक्रारी महिला आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदविल्या आहेत.

तसेच आरोपीत याने महाराष्ट्रातील विविध न्युज चॅनेलनावे बनावट न्युज ब्लॉग तयार करुन तसेच एका वृत्तपत्रात बनावट बातमी तयार करुन खोट्या बातम्या प्रसारित करुन यातील फिर्यादीस खंडणी देण्यास भाग पाडले आहे. आरोपीने यासारखे आणखी गुन्हे केले असल्याची शक्यता असल्याने त्याबाबत सखोल तपास सुरु आहे. गुन्ह्यात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या