Thursday, April 25, 2024
Homeनाशिकतपोवनातील मनाई असलेल्या परिसरात डेब्रिजचा ढीग

तपोवनातील मनाई असलेल्या परिसरात डेब्रिजचा ढीग

पंचवटी | Panchavti

तपोवनात नाशिक महापालिकेने डेब्रिज टाकण्यासाठी मनाई असल्याचा फलक साधुग्रामच्या मुख्य रस्त्यालगत लावलेला आहे. असे असले तरी अनेकजण या फलकाकडे दुर्लक्ष करीत मोठ्या प्रमाणावर डेब्रिज टाकत आहेत.

- Advertisement -

या परिसरात मोठमोठे डेब्रिजचे ढिगारे पाहायला मिळत असून, आता तर गोदापात्रातील काढण्यात येत असलेला गाळ स्मार्ट सिटी ठेकेदार याठिकाणी टाकत असल्याचे समोर आले आहे.

तपोवनातील साधुग्राम मधील जागा सिंहस्थ कुंभमेळा झाल्यानंतर वापराविना पडून असते. या ठिकाणी असलेली ५४ एकर जागा नाशिक मनपाने अधिग्रहित केलेली आहे. अनेक वर्षे या परिसराकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे या जागेचा वापर काही दिवसांपासून डेब्रिज टाकण्यासाठी करण्यात येत असल्याचे चित्र आहे.

तपोवनाच्या मुख्य मार्गालगत ते बटूक हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर सद्यस्थितीत डेब्रिज मोठ्या प्रमाणात टाकण्यात आले असून, मोठमोठे ढिगारे या भागात तयार होत असल्याचे दृश्य पाहायला मिळते आहे. डेब्रिज टाकण्याचे काम याठिकाणी सुरू असल्याने, तपोवनाच्या मुख्य मार्गालगतच्या भागात महापालिकेने तपोवन परिसरात कुठल्याही प्रकारचे माती, रॉबीट, डेब्रिस मटेरिअल टाकण्यास सक्त मनाई असल्याचा फलक दर्शनी भागात लावला आहे.

या भागात डेब्रिज टाकल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. असा इशारा या फलकाद्वारे देण्यात आला आहे. अशा आशयाचा फलक मनपा कडून लावण्यात आलेला आहे. या परिसरातील पाचशे मीटरच्या अंतरावर असे डेब्रिज टाकून नये असा उल्लेख करण्यात आलेला आहे. असे असताना या परिसरात मोठ्या प्रमाणावर डेब्रिज टाकण्यात आलेले आहे.

यासह बटुक हनुमान मंदिर दिशेने जाणाऱ्या मार्गावर सद्यस्थितीत रोज ट्रकची वाहतूक होत आहे. ही वाहतूक रामवाडी पुलाजवळ गोदावरी नदी पत्रातून काढण्यात येत असलेला गाळ स्मार्ट सिटी ठेकेदार याठिकाणी टाकत असल्याचे समोर आले आहे. यामुळे याठिकाणी माती मिश्रित गाळ यांचे मोठे ढिगारे साचले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

डेब्रिस टाकण्याबरोबरच येथे कचराही फेकण्यात येत आहे. हा कचरा थेट जाळण्याचा प्रकार घडत आहे. या कचऱ्यात प्लास्टिकच्या कचऱ्याचे प्रमाण जास्त आहे. हा कचरा पेटवून देऊन नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. हा कचरा पेटविल्याने त्याची झळ येथील झाडांना बसली आहे. याच जवळच्या भागात पालापाचोळाही पेटविण्याचे प्रकार घडलेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या