Thursday, April 25, 2024
Homeनगरदुचाकीसह तोल गेल्याने वांबोरीतील तरूणाचा बंधार्‍यात मृत्यू

दुचाकीसह तोल गेल्याने वांबोरीतील तरूणाचा बंधार्‍यात मृत्यू

उंबरे |वार्ताहर|Umbare

राहुरी तालुक्यातील वांबोरी-मोरवाडी परिसरात मोरवाडी ते इनामदार वस्तीकडे जाणार्‍या करपरा नदी पुलावरून

- Advertisement -

पावसाच्या पाण्यात वांबोरी येथील दुर्गा मारुती लोखंडे (वय 35 वर्ष) हा तरूण पुलावरून पडल्यामुळे तो या पाण्यात वाहून गेला. ही घटना मंगळवार दि.22 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता घडली.

दुर्गा हा भंगार आणण्यासाठी वांबोरीहून मोरवाडी इनामदार वस्तीकडे तीन ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान गेला होता. चिंचेचा मळा ते इनामदार वस्तीकडे जाण्यासाठी मध्ये करपरा नदी आहे. या नदीवरती पूल आहे. या पुलावरून तो पाऊस नसतानाही पलिकडे गेला.

परंतु त्या परिसरामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे दुर्गा भंगार न घेताच परत इकडे येत असताना त्या नदीला पाणी पुलावरून होते. परंतु या पुलाचा काही भाग वाहून गेल्यामुळे पूलपास करताना अचानक पाणी आल्याने व त्याचा रस्त्याचा अंदाज चुकल्यामुळे मोटारसायकल (क्रमांक एम एच 17 ए डी 28 55 हिरो होंडा) सह तो पुलावरून खाली पडला.

मोटर सायकल व तो त्या डबक्यात पडल्यामुळे त्याला पोहता येत नसल्याने व पाण्याचा जोर असल्याने तो खाली वाहून गेला. त्याची मोटरसायकल पाण्यात बुडाल्यामुळे तो वाहून गेल्याचा कोणालाही अंदाज आला नाही.

परंतु आपला मुलगा सहा वाजले तरी घरी आला नाही, म्हणून त्याच्या पत्नीने व आईवडिलांनी त्याला मोबाईलवर फोन केला. परंतु त्याचा फोन लागत नव्हता. मात्र तो भंगार आणण्यासाठी इनामदार वस्तीकडे गेल्याचे त्यांना माहिती होते. त्याचा शोध घेतला असता याठिकाणी आलेल्या नागरिकांनी सांगितले की तो चार साडेचारच्या दरम्यान या ठिकाणाहून घराकडे गेला.

रात्रभर त्याचा शोध घेतला. परंतु त्याचा तपास लागला नाही. बुधवारी सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान नदीकाठी असणारे लोक शेती व्यवसायासाठी व दुग्ध व्यवसायासाठी या पुलावरून जात असताना त्या पाण्यामध्ये पुलाला खेटून पेट्रोलचा तरंग वर दिसू लागला म्हणून काही शेतकर्‍यांनी त्याठिकाणी पाहिले असता तिथे मोटरसायकल आढळून आली.

दुर्गा लोखंडे याची मोटारसायकल असल्याचे निदर्शनास आले. त्या परिसरातील शेतकरी व त्याचे नातेवाईक यांनी या नदीतील असणार्‍या बंधार्‍याकडे त्याचा शोध घेण्याचे काम सुरू केले. सकाळी आठ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत पाण्यामध्ये पोहून तरुणांनी शोधकार्य सुरू ठेवले. 11 वाजण्याच्या दरम्यान त्याचा मृतदेह बंधार्‍याच्या डबक्यामध्ये आढळून आला. यावेळी मृतदेह बाहेर काढण्यात आला.

लोखंडे हा मूळचा जामखेड येथील रहिवासी असून तो गेल्या पंधरा वर्षांपासून वांबोरी येथे राहत आहे. भंगार गोळा करून आपली उपजीविका करीत आहे. तो आईवडिलांना एकुलता एक मुलगा आहे. त्याला तीन बहिणी, पत्नी, तीन मुली, एक मुलगा आहे.

यावेळी मदत कार्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, सामाजिक कार्यकर्ते भानुदास कुसमुडे, अशोक पटारे व या परिसरातील तरुणांनी मदत केली. यावेळी पोलीस हेडकॉन्स्टेबल शिरसाठ, बर्‍हाटे, राठोड यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

शोधकार्य करण्यासाठी संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे पोलीस खात्यात नोकरी करणारे पोलीस कॉन्स्टेबल संतोष शिंदे (रा. गोटुंबा आखाडा) व लखन बर्डे, राहुरी या दोघांनी दोन तास पोहून शोधकार्य सुरू ठेवले. मृतदेह सापडण्यात त्यांना यश आले. यावेळी या दोन्ही तरुणांचे या परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.

पुलाच्या ठेकेदारावर कारवाईची मागणी

वांबोरी येथील मोरवाडी-इनामदार वस्तीकडे करपरा नदीवर ये-जा करण्यासाठी बांधलेल्या पुलाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या परिसरातून शेतमजूर, शेतकरी, शाळेतील लहान विद्यार्थी ये-जा करतात. परंतु हा पूल लवकरच वाहून गेल्याने या परिसरातील शेतकर्‍यांचे अतोनात हाल होत आहेत. या पुलाचे काम चांगले झाले असते तर दुर्गाला आपला जीव गमवावा लागला नसता. त्यामुळे दुर्गा यांच्या मृत्यूस कारणीभूत हा पूलच आहे व या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील रामहरी काळे, राजेंद्र सुभाष पटारे, कबीर खान, श्याम पटारे, चंद्रकांत पटारे, अमोल काळे, वसीम खान, राजेंद्र मोरे, रवींद्र पटारे, महेश साळुंखे आदींसह शेतकर्‍यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या