Thursday, April 25, 2024
Homeनाशिकगर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

अंबासन । वार्ताहर Ambasan

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आलेल्या गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल घडली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनागोंदी कारभारामुळेच गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप संतप्त नातेवाईकांनी करत गर्दी केल्याने अनुचित प्रकार घडू नये यास्तव आरोग्य केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

- Advertisement -

या घटनेसंदर्भात वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक आरोग्य केंद्रात वैशाली किशोर तोरे (वय 19) ही गर्भवती महिलेस सासू रेशमाबाई संतोष तोरे यांनी 11 च्या सुमारास उपचारासाठी आणले होते. गर्भवती महिलेचा रक्त तपासणीचा रिपोर्ट वैद्यकीय आधिका-यांनी तपासला असता शरीरात 7.1 ग्रॅम इतके कमी रक्त असल्याचे दिसून आले. त्यामुळे रक्त वाढीसाठी उपचार सुरू केले गेले. सलाईनव्दारे आयर्न सुक्रोस हे रक्तवाढीचे इंजेक्शन देण्यात आले होते.

मात्र काही वेळातच या महिलेला मळमळ उलटीचा त्रास जाणवू लागल्याने तातडीने दिलेली सलाईन बंद करण्यात येवून त्रास कमी व्हावा याबाबत उपचार सुरू केले मात्र संबंधित महिलेकडून उपचारास प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे अधिक उपचारासाठी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यासाठी रूग्णवाहिका पाचारण केली गेली. मात्र श्वास घेण्यासाठी सदर महिलेस अधिकच त्रास होऊ लागल्याने तिला कृत्रिम श्वासोच्छवास दिला गेला. परंतू वैशालीकडून उपचारास प्रतिसाद मिळत नव्हता. ह्रदयाचे ठोके बंद पडल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

उपचारासाठी गेलेल्या वैशाली तोरे या गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे वृत्त आदिवासी वस्तीत पोहचताच वस्तीसह परिसरातील नागरीकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रावर धाव घेतली. यावेळी वैद्यकिय अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळेच महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप संतप्त नातेवाईकांनी करत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अनागोंदी कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला केला. या घटनेची माहिती मिळताच जायखेडा सपोनि पुरूषोत्तम शिरसाठ यांनी उपनिरीक्षक नवनाथ रसाळसह पोलिसांचा प्राथमिक आरोग्य केंद्रावर बंदोबस्त तैनात केला.

नाशिक येथील शासकीय रुग्णालयात मयत वैशाली तोरे यांचे इनकॅमेरा शवविच्छेदन केले जाणार असून फॉरेन्सिक लॅबमधून अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल अशी माहिती संतप्त नातेवाईकांना देण्यात आल्याने तणाव निवळला.

शरीरात रक्त कमी असल्या कारणामुळे गर्भवती महिला तपासणी करण्यासाठी आली असता वैद्यकीय आधिकार्‍यांनी रक्तवाढीसाठी आवश्यक असलेले औषधोपचार सुरू केले असतानाच महिलेचा मृत्यू झाला आहे. या बाबत सखोल चौकशी केली जात असून ज्या बॅचचे इंजेक्शन वापरले होते त्या बॅचचे उर्वरित इंजेक्शन लॅब टेस्टिंगसाठी जिल्हा स्तरावर पाठविले जात आहे.

हर्षल महाजन, तालुका वैद्यकिय अधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या