Sunday, May 5, 2024
Homeनाशिकखड्ड्यांनी घेतला शेतकर्‍याचा बळी

खड्ड्यांनी घेतला शेतकर्‍याचा बळी

सिन्नर । वार्ताहर Sinnar

गोंदे फाटा ते अकोले रस्त्यावरील ( Gonde Phata To Akole Road ) खड्ड्यांमुळे दुचाकीवरून पडल्याने मार लागून चापडगाव येथील शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. हरिदास लक्ष्मण सांगळे (45) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.

- Advertisement -

रस्त्याच्या दुरवस्थेबाबत वेळोवेळी लक्ष वेधूनही अधिकार्‍यांनी रस्त्यावरील खड्डे न बुजवल्याने ही घटना घडली असून या घटनेला संबंधित अधिकारी व समृद्धी महामार्गाचे ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप मनसेना पदाधिकार्‍यांनी केला आहे. ऐन दिवाळीच्या दिवसांत सांगळे यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

सिन्नर-अकोले या रस्त्याची समृध्दी महामार्गाच्या कामामुळे पूर्णतः वाट लागलेली आहे. त्यामुळे वाहनधारकांना या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रस्त्यावर ठिकठिकाणी गुडघ्याएवढे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता वाहून गेला आहे. मृत सांगळे हे दापूरहून शेतीसाठी लागणारे बी-बियाणे घेऊन घराकडे जात असताना धुळवड फाट्याजवळील शरताटी येथील मोठ्या खड्ड्यामध्ये गाडी पडून त्यांचा अपघात झाला.

या अपघातात त्यांचे प्राण गेले. सांगळे कुटुंबातील कर्ता माणूस गेल्याने संपूर्ण कुटुंबाचा आधार हरपला आहे. मनसेनेच्या पदाधिकर्‍यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याबाबत अनेक वेळा संपर्क साधून काम करण्याची मागणी केली होती. मात्र, सदर अधिकार्‍यांनी याकडे कानाडोळा केल्याने सांगळे कुटुंबावर ही वेळ आली आहे.

या घटनेस कामचुकार अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप पदाधिकारी करत आहेत. संबंधित अधिकार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व सांगळे यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तहसीलदारांना निवेदन देऊन करणार असल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले. संपूर्ण तालुक्यातील रस्त्यांचे समृध्दी महामार्ग व पावसाने नुकसान झाले असून हे रस्ते त्वरीत दुरुस्त करावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पदाधिकार्‍यांनी दिला आहे.

निगरगट्ट प्रशासन

मनसेनेने वेळोवेळी तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व तहसिल प्रश्नासनाला निवेदन देऊनही कुठलीही कामे होत नाहीत. आज खड्ड्यांमुळे एका शेतकर्‍यांचा बळी गेला आहे. अजून किती अंत बघणार हे प्रशासन? शेतकर्‍याच्या कुटुंबाला मदत करुन तात्काळ सर्व रस्ते दुरुस्त न झाल्यास या निगरगट्ट प्रशासनाविरुद्ध ठिय्या आंदोलन करणार आहे.

विलास सांगळे, तालुकाध्यक्ष, मनसेना

- Advertisment -

ताज्या बातम्या