Friday, April 26, 2024
Homeनगर‘त्या’ तरुणाचा अपघाती नव्हे, मारहाणीत मृत्यू

‘त्या’ तरुणाचा अपघाती नव्हे, मारहाणीत मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

म्हशीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याच्या घटनेला वेगळे वळण मिळाले आहे. मयत विवेक विक्रम गायकवाड (वय 26 रा. गुलमोहर रोड, सावेडी) याला म्हशी चरवणार्‍या इसमाने काठीने मारल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितल्याचा दावा विवेक याची आई भारती विक्रम गायकवाड (वय 55 वर्षे, रा. नगर) यांनी केला आहे. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

अमित विलास निस्ताने (रा. गवळीवाडा) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी मयत विवेक हा दुचाकीवरून जात असताना मिस्किन मळा रस्त्यावर त्याला म्हशीने धडक दिली. यात तो मयत झाला होता. या प्रकरणी सुरूवातीला तोफखाना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. आता मयत विवेक याच्या आईने फिर्याद दिली आहे.

माझा मुलगा विवेक याचा अपघात झाला असून तो मयत झाला असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही सर्वजण तत्काळ तोफखाना पोलीस ठाण्यात गेलो. मुलगा विवेक हा दुचाकी गाडीसह पडलेला होता. त्याच्या शेजारून म्हशी जात होत्या. म्हशी चरवणार्‍या इसमाने त्याला काठीने मारले व त्यामुळे विवेक हा न उठता तसाच रस्त्यावर पडला होता. सोहेल सय्यद याने तेथून जाणार्‍या रिक्षातून विवेकला रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी विवेक हा उपचारापूर्वीच मयत झाला असल्याचे घोषित केले, असे सोहेल कबीर सय्यद याने आम्हाला सांगितले.

त्यानंतर तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलो असता, तेथे पोलिसांनी एका इसमास आणले होते. सोहेल सय्यद याने सदर इसम हाच म्हशी चरण्यासाठी घेऊन जाणारा असल्याचे सांगितले. त्यामुळे अमित विलास निस्ताने यानेच माझा मुलगा विवेक गायकवाड याला म्हशीला धडकल्याच्या कारणावरून काठीने मारून ठार मारले, असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जे.सी मुजावर करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या