Wednesday, April 24, 2024
Homeनगरमोफत प्रवेशासाठी 25 मार्चपर्यंत मुदतवाढ

मोफत प्रवेशासाठी 25 मार्चपर्यंत मुदतवाढ

अहमदनगर (प्रतिनिधी)

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) देण्यात येणाऱ्या मोफत प्रवेशासाठी अर्ज भरण्यास पालकांना आणखी संधी उपलब्ध व्हावी, यासाठी शिक्षण विभागाने आठ दिवस म्हणजे 25 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, गेल्या 17 दिवसांत जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी 8 हजार 310 अर्ज आले आहेत.

- Advertisement -

आरटीईअंतर्गत वंचित घटक आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये 25 टक्के जागांवर मोफत प्रवेश मिळतो. वंचित घटकांत अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास वर्ग, दिव्यांग, अनाथ, एचआरव्हीग्रस्त, तसेच कोविड प्रभावित बालकांचा समावेश होतो.

वंचित घटकातील विद्यार्थ्यांना उत्पन्नाची कोणतीही अट नाही. केवळ जातीच्या दाखल्यावर प्रवेश अर्ज करता येतो. दुर्बल घटकासाठी मात्र तहसीलदारांचा एक लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला लागेल. यंदा जिल्ह्यातील 364 शाळांमध्ये 2 हजार 825 जागा भरायच्या आहेत. 1 ते 17 मार्च या कालावधीत यासाठीऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया होती.

त्यानुसार 17 मार्चपर्यंत जिल्ह्यात 8 हजार 310 अर्ज प्राप्त झाले आहेत. तरीही अजून अनेक पालकांना अर्ज भरता आलेले नाहीत. ऑनलाईन अर्ज भरताना संकेतस्थळावर येणाऱ्या अडचणी, तसेच आवश्यक कागदपत्रे मिळवण्यात वेळ लागत असल्याने अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी पालकांमधून होत होती. त्याची दखल घेत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने अर्ज भरण्यात आता 25 मार्चपर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीत पालकांनी आपल्या पाल्यांचे अर्ज भरून घ्यावेत. यापुढे मुदतवाढ मिळणार नाही, असेही शिक्षक संचालकांनी पत्रात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या