DC vs MI : मुंबई-दिल्ली आज निर्णायक लढत

jalgaon-digital
3 Min Read

शारजा | Sharjah

आयपीएल २०२१ मध्ये (IPL 2021) शनिवारी २ ऑक्टोबर रोजी दोन महामुकाबले रंगणार आहेत. पहिला सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघांमध्ये दुपारी ३:३० वाजता शारजा मैदानावर रंगणार आहे. दिल्ली आणि मुंबई संघांसाठी हा सामना महत्वाचा असणार आहे…

मुंबई संघाच्या (Team Mumbai) खात्यात ११ सामन्यांमध्ये ५ विजय आणि ६ पराभवांसह १० गुण जमा आहेत. दुसऱ्या हाफमध्ये मुंबई इंडियन्स (MI) संघाला कोलकाता नाईट रायडर्स (KKR), चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघांकडून सलग ३ पराभवांचा सामना करावा लागला होता. त्यामुळे मुंबई इंडियन्स आयपीएल २०२१ च्या बाद फेरीच्या शर्यतीत टिकणार का? असा प्रश्न आयपीएल (IPL) चाहत्यांच्या मनात निर्माण झाला होता.

मात्र पंजाब किंग्ज (PBKS) संघाविरुद्ध विरुद्धच्या विजयाने मुंबई इंडियन्स संघाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलच्या शेवटच्या टप्प्यात जोरदार कमबॅक करतो असा आजवरचा इतिहास आहे.

मुंबई इंडियन्स संघाचे अनुभवी अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि कायरान पोलार्ड पंजाबकिंग्ज संघाविरुद्ध रंगात आल्यामुळे मुंबई संघाला दिलासा मिळाला आहे. उर्वरीत ३ सामन्यांमध्ये मोठ्या फरकाने सामना जिंकून बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्याचे आव्हान असणार आहे.

मात्र संघासाठी चिंतेची बाब म्हणजे कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव अद्याप मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यांच्याकडून या निर्णायक सामन्यात मोठी खेळी अपेक्षित आहे.

दुसरीकडे दिल्ली संघाबद्दल सांगायचे झाले तर मागील कोलकाताविरुद्ध शारजा येथे झालेल्या सामन्यात शिखर धवन, आणि पृथ्वी शॉच्या बदली संघात स्थान मिळालेला स्टीव्ह स्मीथ त्यांनी पहिल्या ४ षटकांमध्ये ४० धावांची सलामी देऊन संघाला आकर्षक सुरुवात करून दिल्यामुळे दिल्ली संघ २० षटकांमध्ये १८० चा टप्पा सहज पार करेल, असे दिसत होते.

मात्र शिखर धवन स्टीव्ह स्मीथ आणि कर्णधार रिषभ पंत यांनी एकाकी झुंज अपयशी ठरली. उर्वरीत फलंदाज ठराविक अंतराने बाद झाल्यामुळे दिल्लीला २० षटकात १२८ धावांचे माफक लक्ष गाठण्यात यश आले.

कोलकाता सहज विजय मिळवेल असे दिसत असताना कांगिसो रबाडा, आवेश खान, आर अश्विन यांनी केलेल्या अचूक आणि बहारदार गोलंदाजीमुळे दिल्लीला सामन्यात जबरदस्त कमबॅक करून देण्यात या सर्व गोलंदाजांचा मोलाचा वाटा होता.

मात्र कोलकाताने ३ विकेट्स राखून नाट्यमय विजय नोंदवून दिल्लीचा विजयरथ रोखला. आता मुंबईला नमवून पुन्हा विजयी मार्गावर परतण्यासाठी दिल्ली सज्ज झाला आहे. गतवर्षी २०२० मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत मुंबईने दिल्लीला ४ वेळा पराभूत केले होते. आता दिल्लीला हरवून विजयी षटकार मारण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज झाली आहे.

उद्या होणाऱ्या सामन्यात नेमका कोणता संघ बाजी मारणार? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दोन्ही संघांमध्ये अनेक अनुभवी आणि धुरंदर खेळाडू असल्यामुळे सामना चुरशीचा होणार यात काही शंका नाही.

शिवाय कोलकाताविरुद्ध सलामीवीर पृथ्वी शॉ दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. त्यामुळे शनिवारच्या सामन्यात पृथ्वी शॉ खेळणार का? की पुन्हा स्टीव्ह स्मीथ आणि धवन डावाची सुरुवात करणार याचे उत्तर नाणेफेकीच्या कौलादरम्यान स्पष्ट होईल.

सलिल परांजपे, नाशिक.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *