दत्तू भोकनळचे दमदार कमबॅक; महाराष्ट्राला सिंगल स्कल नौकायानमध्ये पहिलं पदक

jalgaon-digital
3 Min Read

मापुसा | Mapusa

महाराष्ट्राच्या दत्तू भोकनळने बुधवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील नौकायानमध्ये रौप्यपदक जिंकले. याशिवाय पुरुषांच्या कॉक्सलेस फोर प्रकारात रौप्य तसेच क्वाड्रापूल आणि डबल स्कल गटांमध्ये कांस्यपदक पटकावले. नौकायानमध्ये महाराष्ट्राने दोन रौप्य, दोन कांस्य अशी एकूण चार पदकांची कमाई केली. महाराष्ट्रासाठी सिंगल स्कल नौकायानमध्ये पदक कमावणारा दत्तू भोकनळ हा पहिला खेळाडू ठरला आहे.

पुरुष वैयक्तिक स्कल गटात आंतरराष्ट्रीय खेळाडू दत्तू भोकनळला तीन सेकंदांच्या फरकाने सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. त्याने ६ मिनिटे, ३१.९ सेकंद अशी वेळ नोंदवली. या गटात सेनादलच्या बलराज पनवारने सुवर्ण पदक (६ मिनिटे, २८.५ सेकंद) आणि पंजाबच्या करमजीत सिंगने (६ मिनिटे, २८.५ सेकंद) कांस्य पदक पटकावले.

पुरुषांच्या कॉक्सलेस फोर गटात महाराष्ट्राने रुपेरी यश मिळवले. अक्षत, गुरमित सिंग, विपुल घुर्डे आणि जसमेल सिंग यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या संघाने ५ मिनिटे, ५२.१ सेकंद अशी वेळ नोंदवली. सेनादलाने (५ मिनिटे, ४७.५ सेकंद) सुवर्णपदक जिंकले. त्यांच्या संघात जसविंदर सिंग, भीम सिंग, पुनीत कुमार आणि आशीष यांचा समावेश होता. लखवीर सिंग, जसप्रीत सिंग, हरपाल सिंग आणि परविंदर सिंग यांचा समावेश असलेल्या झारखंडच्या संघाने कांस्य पदक मिळवले.

पुरुषांच्या क्वाड्रापूल गटात तेजस शिंदे, ओमकार म्हस्के, मितेश गिल, अजय त्यागी या चौकडीने ५ मिनिटे, ३४.७ सेकंदांसह तिसरा क्रमांक मिळवला. सेनादलच्या सतनाम सिंग, परमिंदर सिंग, जाकर खान, सुखमीत सिंग या संघाने सुवर्णपदक जिंकताना ५ मिनिटे, २९.१ सेकंद अशी वेळ राखली. तर दिल्लीच्या संघाने (५ मिनिटे, ३१.१ सेकंद) सुवर्णपदक पटकावले. या संघात सुनील अत्री, उज्ज्वल कुमार सिंग, मनीष, रोहित यांचा समावेश होता.

पुरुषांच्या डबल स्कल गटात मितेश गिल आणि अजय त्यागी जोडीने ६ मिनिटे, २९.० सेकंद अशी वेळ नोंदवत कांस्य पदक प्राप्त केले. सेनादलच्या सतनाम सिंग आणि परमिंदर सिंग (६ मिनिटे, १३.१ सेकंद) जोडीने सुवर्ण पदक आणि दिल्लीच्या मनजित कुमार आणि रवी जोडीने (६ मिनिटे, २१.३ सेकंद) कांस्य पदक पटकावले.

नौकानयन सात स्पर्धा प्रकारांमध्ये महाराष्ट्राचे क्रीडापटू सहभागी झाले. यापैकी चार पदके मिळाली. मागील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या कामगिरीची तुलना केल्यास ही प्रशंसनीय नक्कीच आहे.

– राजेंद्र शेळके, महाराष्ट्राचे प्रशिक्षक.

सरावातील सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळालेले आहे. सिंगल स्कल क्रीडाप्रकारात हे पहिलेच पदक असल्याने नौकायान मधील सर्वच प्रकारात पदक मिळाल्याचा आनंद वेगळाच आहे. या स्पर्धेने पुन्हा एकदा कमबॅक करता आले आहे.

– दत्तू भोकनळ, आंतरराष्ट्रीय खेळाडू, नौकायान.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *