Sunday, May 5, 2024
Homeनगरआ. काळेंचा आयत्या पिठावर रेघोट्यांचा केविलवाणा प्रयत्न - दत्ता काले

आ. काळेंचा आयत्या पिठावर रेघोट्यांचा केविलवाणा प्रयत्न – दत्ता काले

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

शहरातील बसस्थानक 5 कोटी 92 लख, पोलीस स्टेशन 3 कोटी 32 लक्ष, नगरपालिका 4 कोटी, पंचायत समिती इमारत 4 कोटी 88 लक्ष, बाजार ओटे 2 कोटी 50 लक्ष, गोकुळनगरी पूल 37 लक्ष, शहर अंतर्गत रस्ते 5 कोटी, फायर स्टेशन 74 लक्ष 93 हजार, वाढीव पाणीपुरवठा योजना 7 कोटी 50 लक्ष, सार्वजनिक वाचनालय 1 कोटी 32 लक्ष, नवीन अग्निशामक 32 लक्ष 50 हजार आदींसह कोट्यवधीची कामे ही भाजपा प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी निधी मिळवत उभी केली आहेत.

- Advertisement -

त्याचे श्रेय घेण्यासाठी आमदार आशुतोष काळे केविलवाणी धडपड करत असून एकप्रकारे स्वतःच्या निधीतून एकही ठोस काम लोकार्पण करण्यासारखे त्यांना गेले अडीच वर्षात करता आले नाही हे अपयश आमदार काळे यांनी स्नेहलता कोल्हे यांच्या कार्यकाळातील विकासकामे लोकार्पण करण्याचा घाट घालून सिद्ध केले आहे अशी टीका भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले यांनी केला आहे.

कोपरगाव शहरावर आलेल्या प्रत्येक संकटात हाकेच्या अंतरावर असलेला संजीवनी उद्योग समूह हा सर्वप्रथम धावून येतो कारण शहराची सुबत्ता राखणे हा प्रथम उद्देश कोल्हे गटाचा राहिला आहे. नगरपालिकेत शहराच्या विकासाचे सर्व ठराव हे बहुमताने मंजूर करून कायमच प्रगतीचा विचार जपण्याचे काम कोल्हे गटाने केले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पाच नंबरसह तलावांसाठीच्या जागा घेऊन ठेवत दूरदृष्टी माजी मंत्री कोल्हे यांनी जपली तर पाच नंबर तलावासाठीच्या ठरावाचे अनुमोदक व सूचक हे भाजपा सेना युतीचे नगरसेवक आहेत ही वस्तुस्थिती आहे. मात्र श्रेय घेण्यासाठी काही पण..या वृत्तीने सारे काही सुरू आहे.

स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव शहराला अधिकचे स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे यासाठी निळवंडे शिर्डी कोपरगाव बंद पाईपलाईन पाणी योजना मंजूर करून आणली मात्र काही कुटील व्यक्तींनी राजकीय फायद्यासाठी न्यायालयीन आडकाठ्या आणून कोपरगावसह शिर्डीला येणारे पाणीही थांबवत तोंडचे पाणी अडवण्याचे पाप केले. माझे काम मी प्रामाणिकपणे केले व करत आहे, मला काम न करू देण्यासाठी अनेक राजकीय संकटे उभी केली गेली, न्यायालयीन आडकाठ्या निर्माण केल्या गेल्या मात्र विकासात्मक कामे मी उभी करू शकले.

जी उद्घाटने आता होत आहेत त्यासाठी मला निधी उभारता आला याचे समाधान अतिशय मोठे आहे, असे मोठे विचार ठेऊन सर्वसामान्य दीन दलित गोरगरीब कष्टकरी व्यापारी सर्वांसाठी उपयुक्त अशा विकासकामांचा डोंगर स्नेहलताताई कोल्हे यांनी उभा केला, त्यामुळे विद्यमान आमदारांना माजी आ. कोल्हे यांच्या काळातील निधी उपलब्ध झालेल्या कामाची उद्घाटने करून आपला कार्यकाळ साजरा करावा लागतो आहे, असे मत दत्ता काले यांनी नोंदवले.

कोपरगाव शहर सुजलाम् सुफलाम् होण्यासाठी व विकासाची कामे भव्य दिव्य होण्याचे माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांचे स्वप्न होते. त्यामुळे ही सर्व विकासकामे त्यांच्या स्मृतींना समर्पित करून जनसेवेसाठी लोकार्पित आहेत. शहराला स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे आणि ग्रामीण भागातील शेती मुबलक पाणी मिळून फुलावी यासाठी सार्वत्रिक प्रयत्न असावेत.

– स्नेहलता कोल्हे, भाजपा प्रदेश सचिव.

- Advertisment -

ताज्या बातम्या