साईबाबा सुपर रुग्णालय प्रशासनाच्या कुचकामी यंत्रणेमुळे शेकडो करोनाबाधीत रुग्णांचे बळी

jalgaon-digital
2 Min Read

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा विश्वस्त व्यवस्थेच्या साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनाअभावी व गलथान व्यवस्थेमुळे माझ्या आजीचा मृत्यू झाला असून त्याबरोबरच शेकडो करोनाबाधीत रुग्णांचे बळी गेले असून येथील कुचकामी यंत्रणेला ठिकाणावर आणावे. त्याचबरोबर दोषींवर कडक कारवाई करावी अन्यथा लोकशाही मार्गाने व उच्च न्यायालयाच्या माध्यमातून न्याय मागणार असल्याचे लेखी निवेदन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक दशरथ गव्हाणे यांनी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांना दिले.

श्री गव्हाणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की साईबाबा विश्वस्त व्यवस्थेच्या श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आतापर्यंत शेकडोंंच्या आसपास निष्पाप रुग्णांचे बळी गेलेले असून अनेक रुग्णांचे बळी हे तेथील गलथान व्यवस्थेच्या कारणाने ठरले आहे. याठिकाणचे काही डॉक्टर हे वेळेवर तपासणी करण्यासाठी जात नाही, गेले तर रुग्णांना तपासणी न करताच फक्त राऊंडचा फार्स करून निघून जातात. तर काही डॉक्टर हे खाजगी कोव्हिड सेंटरला सेवा देत आहे. दि. 18 रोजी पहाटे माझ्या आजीच्या अँडमिट पासून ते मृत्यूपर्यंत तेथील एकही एम.डी प्रभारी डॉक्टर तपासणीसाठी व उपचारासाठी आले नाही. असे असतांना त्याठिकाणी ड्युटीवर असलेल्या परिचारिकांनी उपचार दिले. मात्र उपचार करताना त्यांची शुगर, ब्लड प्रेशरचा विचार न करता त्यांना दोन रेमेडीसिवर इंजेक्शन दिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप केला.

मृत्यू झालेल्या आजींच्या बॉडीला पॅक करण्यासाठी येथील एकही कर्मचारी धावला नाही त्यामुळे आम्ही नातेवाईकांची मदत मागितली. परिचारिकांंकडे हँन्ड ग्लोज मागितले असता उद्धटपणे त्यांनी शिल्लक नसल्याचे कारण सांगत आमच्या हातातील क्लोज काढून देऊ का असे उत्तर दिले. मृतदेह माँरच्युरीमध्ये ठेवण्यासाठी विलंब लावला. सदरची बाब उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे यांना सांगितल्यानंतर स्टाफ खडबडून जागा झाला. वास्तविक पाहता तेथील परिस्थिती आम्ही अनुभवली आहे. रुग्णालय प्रशासनाच्या गलथान कारभाराला अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक वैतागले असून फक्त साईबाबांची सेवा म्हणून तेथे भक्तिभावाने रुग्णांना अ‍ॅडमिट केले जाते.

आपण कार्यतत्पर अधिकारी असताना आपण सदर रुग्णालयातील कोव्हिड सेंटरचा गलथान व्यवस्थापनाकडे लक्ष घालून त्यातील कुचकामी यंत्रणेला ठिकाणावर आणावे व यापुढे निष्पाप लोकांचे बळी वाचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली असून जर रुग्णालयातील गलथान व्यवस्थापन सुधारले नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला असून वेळ पडल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे श्री. गव्हाणे यांनी निवेदनात म्हटले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *