Friday, April 26, 2024
Homeनगरदसर्‍याच्या मुहूर्तावर बाजारपेठेला झळाळी..!

दसर्‍याच्या मुहूर्तावर बाजारपेठेला झळाळी..!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या सहा महिन्यांपासून नगरच्या बाजारपेठेला लागलेले करोनाचे ग्रहण रविवारी दसर्‍याच्या मुहूर्तावर सुटताना दिसले.

- Advertisement -

नगरकरांनी साडे तीन मुहूर्तापैकी एक असणार्‍या दसर्‍याच्या मुहूर्तावर सोने, चांदी, दुचाकी, चार चाकी वाहनांसोबत विजेची विविध उपकरणे, मोबाईल, टीव्ही, लॉपटॉप आणि फ्रीज यासह अन्य संसारोपयोगी साहित्याची भरभरून खरेदी करताना दिसले. यामुळे नगरच्या विविध क्षेत्रातील व्यापारी आणि व्यावसायिक यांच्यात पुन्हा आत्मविश्वास निर्माण झाला असून हे वातावरण असेच दिवाळीपर्यंत टिकून राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

मार्च 2020 पासून जिल्ह्यात करोनाचा शिरकाव झाला आणि नगरची बाजारपेठ ठप्पच झाली. आधी गुडीपाडवा, त्यानंतर अक्षयतृत्तीया हे मुहूर्त करोनामुळे वाया गेल्यामुळे सर्वसामान्य दुकानदारांपासून ते बड्या व्यापार्‍यांपर्यंत सर्वांचे आर्थिक कंबरडे मोडल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. राज्य सरकारने दोन महिन्यांपासून टप्प्या टप्प्याने बाजारपेठेसह अन्य क्षेत्र खुली करण्याचा निर्णय घेतला.

मात्र, त्यात करोनाचा संसर्ग वाढल्याने मोठ्या संख्येने करोना रुग्णांसह मृत्यूचे प्रमाण वाढले. यामुळे बाजारापेठेसह सर्वसामान्यांच्या मनात भितीचे वातावरण होते. गेल्या 15 दिवसांपासून जिल्ह्यात करोनाचा संसर्ग कमी झाला असून त्यात नवरात्री उत्सव सुरू झाला आणि सर्वांमध्ये उत्साह संचारला होता.

या उत्साहाचे फलीत रविवारी नगरकरांनी अनुभवले. नगरचा सराफ बाजार, बडी सुवर्ण दालने यासह दुचाकी आणि चार चाकी वाहनांची शोरुममध्ये गर्दी झाली होती. यात एकट्या नगर शहरात हजारोंच्या संख्येने दुचाकी वाहनांची विक्री होताना दिसली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा दसरा चांगला गेला. यंदा विक्रीत वाढ झाली नसली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झालेली नाही. दुचाकी आणि चार चाकी वाहनांच्या कंपन्यांनी ग्राहकांसाठी विविध सवलती जाहीर केल्या होत्या. त्यांचा फायदा घेताना दिसले.

नगरची सुवर्ण दालने आणि सराफ बाजार हा जिल्ह्यात नव्हे, तर राज्यात प्रसिध्द आहे. याठिकाणी ग्राहकांनी सोन्याला 51 हजार रुपये तोळा भाव असताना भरभरून खरेदी केली. यात विविध प्रकारातील घडीव सुवर्ण अलंकार, वेगवेगळ्या प्रकारातील मंगळसूत्र, अंगठ्या, गंठण, मिनी गंठण, आकर्षक पाटल्या, कर्ण फूल यांना मोठी मागणी असल्याचे सुवर्ण व्यवसायिक यांनी सांगितले.

गत वर्षीच्या तुलनेत आणि करोना संकटाच्या सावटामध्ये चांगला व्यवसाय झाल्याचा विश्वास सुवर्ण व्यवसायिक यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे करोना संकट आणि आर्थिक मंदीमध्ये नगरकरांनी 50 टक्के व्यवहार हे रोख रक्कमेत केले. अशी परिस्थिती दिवाळीपर्यंत राहिल्यास जिल्ह्यातील आर्थिक घडी बसण्यास सुरूवात होणार आहे.

छोटे व्यवसायिक खुश

नगरशहरासह ग्रामीण भागात दसरा सणानिमित्त नागरिक घराबाहेर पडत त्यांनी विविध पुजेच्या साहित्यासह अन्य खरेदीचा आनंद लुटला. यामुळे बाजारात बर्‍यापैकी चलनाचा पुरवठा झाला. चांगल्यापैकी व्यवसाय झाल्याने नगर शहरातील छोटे व्यवसायिक खुश असल्याचे दिसून आले. याचा सकारात्मक परिणाम येणार्‍या काळात होणार आहे.

झेंडू, शेवंतीने खाल्ला भाव

जिल्ह्यात यंदा अतिरिक्त पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले. यात दिवाळी दसरा सणादरम्यान मोठी मागणी असणार्‍या झेंडू आणि शेवंती पिकाचे मोठे नुकसान झाले. जादा पावसाने फुले सडल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकर्‍यांनी ते फेकून दिले. मात्र, आवक घटल्याने झेंडूचा दिवसभर भाव 200 रुपये तर शेवंती आणि ऑस्टर फुलांचा भाव 350 ते 400 रुपये भाव घाऊक बाजारपेठेत होता. सुट्या बाजारात झेंडूची फुले 400 रुपये किलोपर्यंत विकली गेली.

दसर्‍याच्या मुहूर्तावर सोने, चांदी, वाहन आणि मोठे विद्युत साहित्य खरेदीचा मुहूर्त असतो. जर दसरा चांगला झाला तर त्याचा सकारात्मक परिणाम हा कापड व्यवसाय विक्रीवर होत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. यामुळे यंदा दिवाळीत कापड व्यवसाय चांगला होईल, अशी अपेक्षा नगरच्या कापड व्यवसायिकांना आहे. नगरची कापड बाजारपेठ राज्यात प्रसिध्द असून करोना संकटातून या बाजारपेठेला बाहेर काढण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सध्या विविध योजना कापड व्यावसायिकांनी आखल्या आहेत. त्याला प्रतिसाद मिळणार असल्याचा विश्वास कापड व्यवसायिकांना आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या