Friday, April 26, 2024
Homeनगरदारणा पाठोपाठ गंगापूर फुल्ल, गोदावरीत 16582 क्युसेकने पाणी

दारणा पाठोपाठ गंगापूर फुल्ल, गोदावरीत 16582 क्युसेकने पाणी

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

सह्यद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम होता. यामुळे दारणातून 12788 क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. गंगापूर धरण परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने हे धरण 97.98 टक्क्यांवर पोहचल्याने गंगापूर मधुन काल 1520 क्युसेक ने विसर्ग सोडण्यात आला. नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात पाण्याची आवक वाढल्याने गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने 16582 क्युसेकने पाणी सोडणे सुरु होते. त्यामुळे गोदावरी दुथडी भरुन वाहत आहे. खाली जायकवाडीचा साठा काल सायंकाळी 6 वाजता 56.53 टक्क्यांवर पोहचला होता.

- Advertisement -

काल नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्याआगोदर काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासांत दारणाच्या पाणलोटात 41 मिमी, इगतपुरीला 98 मिमी, घोटीला 60 मिमी असा पाऊस झाला. तर भावलीला 110 मिमी पावसाची नोंद झाली. तर भामला 51 मिमी पावसाची नोंद झाल्याने भाम मधून 2800 क्युसेक, भावलीतून 481 क्युसेक तर दारणाच्या पाणलोट क्षेत्रातून काही पाणी असे एकूण अर्धा टीएमसीहुन नवीन पाणी मागील 24 तासांत दारणात दाखल झाले. त्यामुळे 97.10 टक्क्यांवर पोहचलेल्या दारणातुन काल सकाळी 6 वाजता 10 हजार 60 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. काल दिवसभर पावसाची रिपरिप घाटमाथ्यावर सुरु होते. त्यामुळे दारणात पाण्याची आवक होत असल्याने काल दुपारी 12788 क्युसेक इतका करण्यात आला. नंतर तो रात्री 9 वाजता पुन्हा 10 हजार 60 क्ुयसेक वर आणण्यात आला. काल उशीरा पर्यंत हा विसर्ग स्थिर होता.

दारणा धरणाच्या खाली दारणा नदीत कडवाचा 2200 क्युसेक, आळंदीचा 30 क्युसेक तर वालदेवीचा 183 क्युसेक विसर्ग दाखल होत असल्याने दारणासह या धरणांचे पाणी दारणा नदीतून गोदावरीत दाखल होवुन नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होत आहे.

गंगापूर मधून विसर्ग

गंगापूर धरणाच्या पाणलोटात काल दिवसभरात जोरदार पाऊस झाला. हे धरण 97.98 टक्क्यांवर पोहचल्याने या धरणातून काल दुपारी 3 वाजता 553 क्युसेकने विसर्ग सोडणे सुरु झाले. हा विसर्ग दोन तासांनी 1520 क्युसेक इतका करण्यात आला. हा विसर्ग काल उशीरा पर्यंत टिकून होता. काल सकाळी 6 ते सायंकाळी 5 वाजे पर्यंत गंगापूरच्या भिंतीजवळ 11 तासांत 35 मिमी पावसाची नोंद झाली. या कालावधीत या धरणात 73 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. गंगापूर समुहातील कश्यपी 75.10 टक्के भरले आहे. त्यात दिवसभरात 25 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. गौतमी धरण 83.93 टक्के भरले आहे. काल दिवसभरात त्र्यंबकला 22 मिमी, अंबोलीला 45 मिमी पावसाची नोंद झाली.

वरील धरणांमधून नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात मोठ्या प्रमाणात पाणी दाखल होत असल्याने काल सकाळी 6 वाजता या बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 10272 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. पाणी वाढू लागल्याने गोदावरीतील विसर्ग सकाळी 9 वाजता 13427 क्युसेक इतका करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता त्यात वाढ करुन तो 16582 क्युसेक इतका करण्यात आला. हा विसर्ग रात्री उशीरा पर्यंत तसाच टिकून होता. काल सकाळी 6 पर्यंत या बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 6.8 टीएमसी इतका विसर्ग करण्यात आला होता. आज सोमवारी सकाळी एक टीएमसी हुन अधिक पाण्याचा विसर्ग झालेला असेल.

जायकवाडीतील पाणी 56.53 टक्क्यांवर !

जायकवाडी जलाशयात काल सायंकाळी 6 वाजता 14 हजार 74 क्युसेकने नवीन पाणी दाखल होत होते. नवीन दाखल होणार्‍यात पाण्यात वाढ होणार आहे. काल सायंकाळी हे धरण 56.53 टक्क्यांवर पोहचले होते. या धरणात उपयुक्त साठा 43.35 टीएमसी इतका झाला आहे. हा उपयुक्तसाठा 50 टीएमसी झाल्यानंतर समन्यायी पाणी वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार जायकवाडीच्या नगर, नाशिक च्या धरणातून पाणी सोडण्याची गरज भासणार नाही. मात्र ओव्हरफ्लो जायकवाडीच्या दिशेने सुरु राहु शकतो.

आज गोदावरीच्या कालव्यांना पाणी

गोदावरीत नदीत विसर्ग सुरु असल्याने गोदावरीच्या दोन्ही कालव्यांना पिण्याच्या पाण्यासाठी तात्काळ पाणी सोडावे, अशी मागणी राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदाच्या नाशिक विभागाकडे केल्यानंतर याची दखल घेत जलसंपदाने आज सोमवारी सकाळी 10 वाजता गोदावरीचे दोन्ही कालव्यांना पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. याबाबत जलसंपदाचे नाशिक विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी दुजोरा दिला. त्यामुळे आजपासुन गोदावरी कालवे वाहते होणार आहेत. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनाही दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या