तरुण अत्याचार प्रकरण: प्रकरण दडपवणार्‍यांवर कारवाई करा; सर्वपक्षीय मोर्चात एकमुखी मागणी

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी

दरी येथील फार्महाऊसमध्ये तरुणांवर अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा घडल्यानंतर हे प्रकरण दडपण्यासाठी लोकप्रतिनिधीसह शहर पोलिसांमधील पोलीस अधिकार्‍याने प्रयत्न केला. त्यामुळे ज्यांनी हा प्रयत्न केला, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शहरातून काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली.

फार्महाऊसवर टोळक्याने दोघा डीजे चालकांना अमानुष मारहाण व अनैसर्गिक अत्याचार करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना गुरुवारी (दि.9) मध्यरात्री घडली होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी नाशिक अन्याय निवारण संघर्ष समितीतर्फे सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. गोल्फ क्लब मैदान ते शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. दोघा युवकांना अमानुष मारहाण करुन अनैसर्गिक अत्याचार व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी नाशिक तालुका पोलिसांनी 11 संशयितांना अटक केली आहे. त्याप्रकरणी आणखी संशयित फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक अन्याय निवारण संघर्ष समितीच्या वतीने शनिवारी (दि.18) निषेध मोर्चाचे आयेाजन करण्यात आले होते. त्यानुसार या मोर्चात माजी मंत्री शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील, कविता कर्डक, सत्यभामा गाडेकर, वत्सला खैरे, आशा तडवी, कल्पना पांडे, शरद आहेर, प्रशांत दिवे, राहुल दिवे, रंजन ठाकरे, बाळासाहेब कर्डक, सचीन मराठे, सुरेश मारु, सुरेश दलोड, राजेंद्र बागुल, संपत जाधव, राजू देसले, दीपक डोके आदी उपस्थित होते. यावेळी मोर्चात महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.

प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर कठोर कारवाईसह गुन्हा दाखल करावा. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फार्म हाऊस मालकावर गुन्हा दाखल करावा, दोन्ही पीडित तरुणांना व त्यांच्या कुटुंबास त्वरित पोलीस संरक्षण मिळावे. फार्म हाऊस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सक्ती करण्यात यावी. अत्याचार पीडित तरुणांना समाजकल्याण खात्यामार्फत त्वरित आर्थिक मदत द्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *