दाणाबाजारातील प्लास्टिक गोडावून सील

jalgaon-digital
2 Min Read

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

प्लास्टीक वापर आणि विक्रीला राज्य शासनाने बंदी घातली आहे. मात्र जळगाव शहरात सर्रासपणे विक्री होत आहे. दाणा बाजारातील दत्त मंदिराजवळ शिव प्लास्टिक या विक्रेत्याच्या गोडावूनमध्ये प्लास्टिक असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभागाने सोमवारी तपासणी केली.

दरम्यान, दुकानाच्या वरच्या भागात असलेल्या गोडावूनमधून अडीच ते तीन ट्रॅक्टर माल जप्त करण्यात आला. तसेच गोडावूनला सील करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त पवन पाटील यांनी दिली.

मनपा प्रशासनाच्या आरोग्य विभागातर्फे गेल्या काही महिन्यांपासून प्लास्टिक व्यावसायिकांवर कारवाईची मोहीम राबविली जात आहे.

मनपा आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त पवन पाटील यांना मिळालेल्या माहितीवरुन शिव प्लास्टिक या दुकानात जावून तपासणी केली. त्यानंतर त्यांनी वरच्या माळ्यावर जावून पाहणी केली असता, प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला.

त्यामुळे जवळपास दोन ते अडीच ट्रॅक्टरभर प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई सहाय्यक आयुक्त पवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक श्री. अत्तरदे, श्री. धांडे, उल्हास इंगळे, श्री. बागुल यांच्यासह पथकाने केली.

लाईट गेल्यामुळे अर्धवट कारवाई

महापालिकेचे पथक गोडावूनमध्ये जावून कारवाई करत असतांना, अचानक लाईट गेली. त्यामुळे अर्धवट कारवाई करुन गोडावून सील करण्यात आले. या संदर्भात मंगळवारी दंडात्मक कारवाईदेखील केली जाणार असल्याचे सहाय्यक आयुक्त पवन पाटील यांनी सांगितले.

चार महिन्यांत साडेपाच लाखांचा दंड वसूल

शहरात प्लास्टिक विक्री करणार्‍या व्यावसायिकांवर तसेच किरकोळ विक्रेत्यांवर कारवाईची मोहीम गेल्या चार महिन्यांपासून सुरु आहे. आतापर्यंत जवळपास साडेपाच लाखांचा दंड वसूल केला असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त पवन पाटील यांनी दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *