दाढ खुर्द येथे मल्हारी बुधे यांच्यावर बिबट्याचा हल्ला

jalgaon-digital
2 Min Read

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथील मल्हारी साहेबराव बुधे (वय 45) यांच्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला असून दैव बलवत्तर म्हणून या हल्ल्यातून ते बचावले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

डॉ. अजित तांबे व मल्हारी बुधे हे मोटारसायकलवरुन प्रवरा उजव्या कालव्यावरील पुलाजवळून शुक्रवारी दि. 14 जुलै रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास दाढ खुर्दच्या दिशेने चालले होते. यावेळी गुहा – शिबलापूर रस्त्याच्या कडेला शिकारीच्या शोधात दबा धरून बसलेल्या बिबट्याने डॉ. तांबे हे गाडी चालवत असल्याने पाठीमागे बसलेल्या मल्हारी बुधे यांच्यावर झेप घेत हल्ला केला. त्यामुळे बुधे यांच्या पायाला खोलवर जखम झाली. यावेळी डॉ. तांबे यांच्या सावधानतेमुळे पुढील अनर्थ टळला आहे.

याप्रसंगी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मल्हारी बुधे यांच्यावर दाढ बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करुन खबरदारी म्हणून पुढील उपचारासाठी जिल्हा ग्रामीण रुग्णालय अहमदनगर येथे पाठवण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी याच रस्त्यावरुन मांडवे (साकूर) येथील एक व्यक्ती राहुरीच्या दिशेने चालली असताना याच ठिकाणी बिबट्याने त्यांच्यावर अशाच प्रकारे हल्ला केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यामुळे दाढ खुर्द सह पंचक्रोशीत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या महिन्यातील ही चौथी घटना असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच दाढ खुर्दचे सरपंच सतिश जोशी, ग्रामपंचायत सदस्य चेतन पर्वत, वन विभागाचे वनरक्षक हरिशचंद्र जोजार, वन कर्मचारी डि. सी. चौधरी यांनी जखमी मल्हारी बुधे यांची घरी भेट घेऊन त्यांच्यासह कुटुंबाला धीर देत त्वरीत पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले सरपंच सतिश जोशी, ग्रामपंचायत सदस्य चेतन पर्वत, विजय कहार, डॉ. अजित तांबे, दत्तात्रय पर्वत, भिमराज पर्वत, विलास पर्वत, भारत कहार, संजय पो. पर्वत, सोमनाथ माळी, रवींद्र माळी, संदीप बोरसे, संतोष बिरे, तुकाराम पर्वत, संपत बोर्‍हाडे आदींनी आक्रमक भूमिका घेत पिंजरा लावण्याची मागणी केल्यामुळे वनविभागाने याठिकाणी शनिवारी पिंजरा लावला असल्याची माहिती मिळाली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *