Wednesday, April 24, 2024
Homeनगरदाढ बुद्रुक शिवारात सेवानिवृत्त शिक्षिकेचा बंगला फोडला

दाढ बुद्रुक शिवारात सेवानिवृत्त शिक्षिकेचा बंगला फोडला

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेले चोर्‍या व घरफोडीचे सत्र थांबायला तयार नाही. दाढ बुद्रुक शिवारातील निवृत्त शिक्षिकेचा बंगला फोडून एक लाख रुपयांचे दागिने व पन्नास हजार रुपये रोख असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. दाढ- आश्वी रस्त्यालगत असलेला बंगला फोडून चोरट्यांनी केलेल्या धाडसी चोरीमुळे परिसरात घबराट पसरली आहे.

- Advertisement -

सेवानिवृत्त शिक्षिका निशिगंधा संपतराव गाडेकर (वय 65, रा. तांबे गोठा, दाढ बुद्रुक) या पतीसह पुणे येथे राहत असलेल्या मुलीकडे गेल्या होत्या. बंगल्यात कुणी नसल्याने शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. स्वयंपाकघरातील डबे, देवघर, बेडरुममधील लॉकर, दिवान याची उचकापाचक केली. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकून दिले. कपाटातील एक लाख रुपयांचे दागिने व 50 हजारांची रोख रक्कम चोरट्यांच्या हाती लागली. या ऐवजासह चोरट्यांनी इंपोर्टेड शूज व सुका मेवाही लांबविला.

दुसर्‍या दिवशी सकाळी गाडेकर यांच्या भावजयीने फोन करून घरफोडी झाल्याची माहिती दिली. माहिती मिळताच गाडेकर यांचा मुलगा पत्रकार राहुल गाडेकर यांनी घराकडे धाव घेतली. तेव्हा घराचा मुख्य दरवाजा, टेरेसचा दरवाजा तोडलेला आढळला. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. गाडेकर यांनी तात्काळ लोणी पोलिसांना फोन केला. लोणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच निशिगंधा गाडेकर पुण्यावरून दुपारी दाढमध्ये आल्या. त्या आल्यावर पोलिसांनी चोरीचा पंचनामा केला. तसेच श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. चोरटे जाताना एक कमरेचा बेल्ट टेरेसवर विसरून गेले. या बेल्टचा वास श्वानपथकाला देण्यात आला. पथकातील श्वानाने बंगल्यालगत असलेल्या रस्त्यापर्यंत माग काढला. सायंकाळी ठसेतज्ज्ञांच्या पथकाने येऊन बंगल्यातील सामानावरील ठसे घेतले.

गाडेकर यांचा बंगला फोडण्याआधी चोरट्यांनी गावातील एका किराणा दुकानाचे शटर तोडले; परंतु दुकानचालक वरतीच राहत असल्याने आवाजाने तो उठला. त्यामुळे चोरट्यांनी पळ काढला. याप्रकरणी गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात भा.दं.वि. कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या