Cyclone Tauktea : बार्ज पी-३०५ दुर्घटनेत ४९ जणांचा मृत्यू

jalgaon-digital
1 Min Read

दिल्ली | Delhi

तौक्‍तेचक्रीवादळामुळे मुंबईपासून १७५ किलोमीटर अंतरावर खोल समुद्रात बार्ज भरकटले होते. या दुर्घटनेतील मृतांची संख्याही ४९ वर पोहोचली आहे, तर आणखी २६ जण बेपत्ता असून, नौदलाचे जवान त्यांचा शोध घेत आहेत.

दरम्यान,या दुर्घटनेप्रकरणी कॅप्टन राकेश बल्लव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्जवरील कर्मचारी मुस्तफिर रेहमान हुसेन शेख यांनी यलोगेट पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार दाखल केली आहे. चक्रीवादळाची सूचना असूनही कॅप्टन राकेश बल्लव यांनी बार्ज वेळीच न हलवता इतर कर्मचाऱ्यांच्या जीव धोक्यात घातला. या अपघातामधील कर्मचाऱ्यांच्या मृत्यूस तसेच दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तौक्ते चक्रीवादळाबाबत भारतीय हवामान विभाग व राज्य सरकारच्या माध्यमातून वारंवार सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. मात्र असे असतानाही ओएनजीसीने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. यामुळे तब्बल ७०० कामगारांचा जीव धोक्यात आला. ओएनजीसीने सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन न केल्यानेच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता.

तौक्ते चक्रीवादळात ‘ओएनजीसी’च्या हीरा इंधन विहीर परिसरात बार्ज नौका ‘तौक्ते’ सोमवारी रात्री समुद्रात बुडाली. अपघातावेळी या नौकेवर २६१ कर्मचारी होते. या दुर्घटनेनंतर तातडीने नौदलाच्या पाच युद्धनौका, तटरक्षक दलाच्या दोन नौका तसेच, दोन अन्य जहाजांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *