Friday, May 10, 2024
Homeदेश विदेशCyclone Tauktae : कर्नाटकात चौघांचा मृत्यू

Cyclone Tauktae : कर्नाटकात चौघांचा मृत्यू

मुंबई | Mumbai

देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेनं कहर केला आहे. त्यातच महाराष्ट्रासह चार राज्यांवर ‘तौक्ते’ या चक्रीवादळाचे संकट घोंघावू लागले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील किनारपट्टीकडील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादाळाचा तडाखा कोकण किनारपट्टीवरील रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना अधिक बसण्याचा संभव आहे.

- Advertisement -

दरम्यान, तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं मार्गक्रमण असून, चक्रीवादळाने गोव्यात धडक मारली. गोव्याच्या किनारपट्टीवर प्रचंड वेगानं हे वादळ धडकलं आहे. दुपारपर्यंत चक्रीवादळाचं केंद्र उत्तर, उत्तर पश्चिम गोवा केंद्र असेल, असं अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता. त्यानंतर चक्रीवादळाने गोव्याच्या किनारपट्टीवर पाऊल ठेवलं. चक्रीवादळामुळे गोव्यात मुसळधार पाऊस झाला. त्याचबरोबर वेगवान वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. गोव्यातील अनेक मार्गांवर मोठंमोठी झाडं उन्मळून पडली असून, अनेक ठिकाणी झाडं पडल्यानं घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. काही ठिकाणी वाहनांवरही झाडं कोसळी आहेत असल्यानं वाहनांचं नुकसान झालं आहे. चक्रीवादळाचा गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला फटका बसला आहे. या रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार केले जात आहेत. ३३ केव्ही विद्युत वाहक तारांवर झाडं कोसळल्यानं रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या, मात्र, जनरेटरच्या मदतीने वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला. सध्या रुग्णांना ऑक्सिजन लागत असून, विनाअडथळा ऑक्सिजन पुरवण्याची गरज निर्माण झाली आहे.

तसेच, या चक्रीवादळामुळं बऱ्याच ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. या वादळामुळे किनारपट्टीवर येणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यानं कोकणातील एका रेल्वेवर झाड कोसळलं आहे. त्यामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. आज सकाळी नेत्रावती एक्सप्रेस ट्रेन मडगाववरून थिवीमकडे जात असताना या ट्रेनला अपघात झाला आहे. एक झालं रेल्वेवर कोसळल्यानं मध्येच ही रेल्वे थांबवावी लागली आहे. तसेच पश्चिम रेल्वेने महाराष्ट्र आणि गुजरातमधून जाणाऱ्या 61 मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आलेला आहेत.

या चक्रीवादळामुळे आतापर्यंत ४ जणांना जीव गमवावा लागला असून सहा जिल्ह्यांतील ७३ गावांना या वादळाचा फटका बसला आहे, अशी माहिती कर्नाटक राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.

कोकणात रत्नागिरीमध्ये शनिवारी सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली होती. केरळलाही वादळी वाऱ्यासह पावसाचा जबरदस्त तडाखा बसला आहे. केरळमध्ये अनेक ठिकाणांवर विजेचे खांब आणि झाडे रस्त्यांवर उन्मळून पडल्याने जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. या वादळाचा रोख हा गुजरात, दमण-दिवू आणि दादरा-नगर हवेलीच्या दिशेने असला तरीसुद्धा कोकण आणि किनारी भागांमध्ये त्याचा प्रभाव दिसू लागला आहे.

दरम्यान, आज सकाळी दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्र्यांनी महाराष्ट्र, गुजरातचे मुख्यमंत्री तसेच दादर नगर हवेलीचे प्रशासक यांच्याकडून तयारीचा आढावा घेतला. चक्रीवादळात नुकसान होऊ नये म्हणून राज्य शासनाने केलेल्या तयारीबाबत सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, रुग्णालयांचा वीज पुरवठा खंडित होणार नाही तसेच बॅकअप यंत्रणा लगेच कार्यान्वित होईल व रुग्णांच्या उपचारांत अडथळा येणार नाही यासाठी सावध राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जम्बो व इतर कोविड केंद्रेही पावसापासून संरक्षण करणारी असली, तरी मोठे वादळ झाल्यास समस्या उद्भवू शकते, हे लक्षात घेऊन सावधगिरी म्हणून मुंबई तसेच इतरत्रही या केंद्रांतील रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले आहे.

सध्याच्या काळात ऑक्सिजनची गरज लक्षात घेता सागरी किनाऱ्यांवरील ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या प्रकल्पांमधील उत्पादन व वाहतूक सुरळीत सुरु राहील यासाठी नियोजन केले आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस यांना विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. किनाऱ्यांवरील कच्च्या घरांतील लोकांना दुसरीकडे हलविण्यात आल्याचेही ते म्हणाले.मंत्रालय नियंत्रण कक्ष सज्ज असून इतरही जिल्ह्यातील नियंत्रण कक्षांशी त्यांचा व्यवस्थित समन्वय आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेलं चक्रीवादळ तौक्ते शनिवारी सायंकाळी ताशी ३० ते ४० किलोमीटरने वादळ पुढे सरकत होतं. हवामाना विभागाच्या ताज्या माहितीप्रमाणे हे वादळ सध्या मुंबईच्या दक्षिणेला ४९० किमी अंतरावर असून, १८ मे रोजी ते गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या