सायबर गुन्हेही नोंदवा स्थानिक पोलीस ठाण्यात

jalgaon-digital
4 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अलिकडच्या काळात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यात घडणारे सर्व सायबर गुन्हे पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलीस ठाण्यात दाखल होत आहेत. दरम्यान वाढते सायबर गुन्हे आणि सायबर पोलीस ठाण्यातील अपुरे मनुष्यबळ यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकार्‍यांना सायबर गुन्हे दाखल करून घेण्याचे आदेश दिले आहेत. सदर गुन्ह्यामध्ये आवश्यक ती तांत्रीक मदत सायबर पोलिसांची घ्यावी, असे आदेशात नमूद केले आहे.

यापुढे सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणे, राजकीय, सामाजिक, भाषिक, प्रांतिक तेढ निर्माण करणे, बदनामी करणे तसेच तक्रारदार यांनी स्वत: फसवणूक करणार्‍या व्यक्तीच्या खात्यावर पैसे भरले असलेबाबत गुन्हे, एटीएम कार्ड क्लोनिंग व कार्ड अदलाबदलीच्या हातचलाखीबाबत गुन्हे अशा प्रकारच्या गुन्ह्यांबाबत तक्रारदार आल्यास त्याच्या तक्रारीची प्राधान्याने दखल घेऊन गुन्हे दाखल करावे, सदर गुन्ह्यांमध्ये आवश्यक ती तांत्रीक मदत ही सायबर पोलिसांची घ्यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सायबर गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोशल मीडियावर बदनामी करणे, विविध आमिष दाखवून खात्यातून पैसे काढून घेणे, मोबाईलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगून फसवणूक करणे असे गुन्हे दाखल होत आहे. गेल्या सहा महिन्यांत येथील सायबर पोलीस ठाण्यात 41 गुन्हे दाखल झाले आहेत. तक्रार अर्ज दाखल होण्याचे प्रमाण देखील जास्त आहेत.

दरम्यान तक्रारदार हे त्यांची फसवणूक झालेबाबत तक्रार घेऊन स्थानिक पोलीस ठाण्यात गेल्यास त्यांना ही ऑनलाईन झालेली फसवणूक आहे, असे सांगून तक्रार दाखल न करता त्यांना सायबर पोलीस ठाणे, अहमदनगर येथे जाण्याबाबत सांगितले जात होते. तक्रारदार यांची हेळसांड व त्यांची गैरसोय होत होती. जिल्ह्यातील अकोला, संगमनेर, कोपरगाव, शिर्डी, श्रीरामपूर येथील तक्रारदारांना अहमदनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार द्यावी लागत होती.

आता मात्र अधीक्षक पाटील यांनी आदेश काढून सायबर गुन्हे स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल करून घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अन्य गुन्ह्यांप्रमाणे आता सर्व सायबर गुन्हेही जवळच्या पोलीस ठाण्यात नोंदविता येणार आहेत.

सायबर पोलीस करणार मदत

सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायची आहे. सदरचा गुन्हा स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर गुन्ह्यामध्ये आवश्यक ती तांत्रीक मदत ही सायबर पोलीस ठाणे, अहमदनगर यांची घेण्याबाबत आदेशात नमूद करण्यात आले आहे. स्थानिक पोलीस ठाणे यांच्याकडून सायबर पोलीस ठाण्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस मदत अर्ज आल्यास सायबर पोलिसांनी योग्य ती तांत्रीक मदत करण्याच्या सूचना अधीक्षक पाटील यांनी दिल्या आहेत.

27 गुन्ह्यांचे दोषारोपत्र दाखल

सायबर पोलीस ठाण्यात गेल्या सहा महिन्यांत सोशल मीडियावरील बदनामी, ऑनलाईन फसवणूक, विविध अमिषाने केलेली फसवणूक, अ‍ॅपद्वारे होणार्‍या फसवणुकीचे तब्बल 41 गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्वांचा तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी करून आतापर्यंत 27 गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.

एक पीआय 41 गुन्हे

पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह पोलीस हवालदार, नाईक यांचा समावेश असतो. पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी असल्यामुळे त्यांच्याकडे तपासकामी जास्त गुन्हे नसतात. येथे मात्र सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी असलेले ज्ञानेश्वर भोसले यांच्याकडे गेल्या सहा महिन्यांमध्ये 41 गुन्हे तपासासाठी दाखल झाले आहेत. सायबर पोलीस ठाण्यात दाखल होणार्‍या प्रत्येक गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांनी करायचा असल्याने एक निरीक्षक आणि त्यांच्याकडे एकाचवेळी 41 गुन्हे दाखल झाले आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *