Thursday, April 25, 2024
Homeनगरतलवारीने केक कापणे पडले महागात; गुन्हा दाखल

तलवारीने केक कापणे पडले महागात; गुन्हा दाखल

राहाता | प्रतिनिधी

वीस ते पंचवीस मित्रांना एकत्र जमवून तलवारीच्या साह्याने वाढदिवसाचा केक कापणे एका जणाला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी राहता पोलीस ठाण्यात (rahata police station) वसीम युनूस खाटीक याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहाता पोलीस ठाण्याच्या कोर्हाळे बीट हद्दीत २८ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास केलवड गावात वसीम युनुस खाटीक मूळ राहाणार केलवड आणि सध्या राहणार राहाता (नवनाथनगर) याने केलवड येथे वाढदिवसानिमित्त वीस ते पंचवीस मित्रांना एकत्र जमवून तलवारीच्या साह्याने केक कापल्याची माहिती राहता पोलिसांना मिळताच पोलिसांनी कारवाई केली आहे.

खाटीक हा कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेलेला होता, चार दिवसांनी तो राहात्यात आल्याचे समजताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. ही तलवार प्लास्टिकची असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असले तरी कोविडची परिस्थिती बघता जिल्हा प्रशासनाने निर्बंध कडक केलेले असल्याने जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि २० ते २५ जणांचा समूह एकत्र जमून कोविड रोगाचा प्रादुर्भाव होईल असे वर्तन केल्याप्रकरणी वसीम युनुस खाटीक याच्या विरोधात पोलीस नाईक कल्याण काळे यांच्या फिर्यादीवरून भादवि कलम 188, 269, 271 यासह साथरोग अधिनियम 1897 चे कलम 2 ( ब ) आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 ( अ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राहता पोलीस करत आहेत. तरी कुणीही कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याची गय केली जाणार नाही असा इशारा पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या