Thursday, April 25, 2024
Homeजळगावकडक निर्बंधाला जळगावकरांचा खो

कडक निर्बंधाला जळगावकरांचा खो

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

करोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आज रोजी सोमवारपासून पोलीस अधीक्षकांनी सकाळी 11 नंतर जनता कर्फ्यू लागू केला आहे.

- Advertisement -

अकरावाजेनंतर पोलिसांकडून चौकाचौकात नागरिकांची चौकशी करुन विनाकारण फिरणार्‍यांना चोप दिला जात होता. मात्र दुपारी 1 वाजेनंतर एकाही चौकात पोलिस नसल्याने नागरिकांची पुन्हा वर्दळ सुरु झाली. त्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या आवाहनासह आदेशाला जळगावकरांनी खो दिल्याचे चित्र आज पहिल्याच दिवशी शहरात दिसून आले.

जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आटोक्यात असली तरी अद्याप धोका टळलेला नाही. शासनाने राज्याच्या लॉकडाऊनला मुदतवाढ दिली असून 1 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाय योजना केल्या जात आहे.

मात्र फळ विक्रेत्यांसह भाजीपाला विक्रेत्यांसह खरेदीसाठी प्रचंड गर्दी होत असल्याने त्यामुळे कोरोनाचा प्रसार होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

यामुळे करोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी 17 मे पासून पुढील पंधरा दिवस कडक लॉकडाऊनची आदेश दिले आहे. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी सकाळी 11 वाजेनंतर जिल्हाभरात कर्फ्यू घोषीत केला असून विनाकारण फिरणार्‍यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता.

सायंकाळनंतर पुन्हा कारवाई

दुपारच्या सुमारास एकाही चौकात बंदोबस्तासाठी तैनात असलेले कर्मचारी दिसून आले नाही. मात्र सायंकाळी पाचवाजेनंतर पोलिसांकडून पुन्हा कारवाईला सुरुवात करण्यात आली. मात्र ही कारवाई देखील केवळ तास दोनतासाठी असल्याने रात्रीच्यावेळी शतपावलीसाठी नागरिक रस्त्यावर दिसून आले.

विनाकारण फिरणार्‍यांना दिला चोप

प्रशासनाकडून नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंची खरेदीसाठी सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. परंतु तरी देखील नागरिक अकरा वाजेनंतर विनाकरण रस्त्यावर फिरत असल्याने पोलिसांकडून त्याची चौकशी केली जात होती. तसेच वैद्यकीय सेवा वगळता इतर कारणासाठी रस्त्यावर फिरणार्‍यांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला.

अपर पोलीस अधीक्षकांसह डीवायएसींकडून कारवाई

ब्रेक द चेन अंतर्गत जिल्हा प्रशानाकडूप क्रॅक डाऊन घोषीत करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी 6.30 वाजेपासून प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान अकरा वाजेनंतर महापालिका प्रशासनासह पोलिसांकडून कडक कारवाईला सुरुवात झाली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी कुमार चिंथा हे स्वत: रस्त्यावर उतरुन कारवाई करीत होते.

कर्फ्यू केवळ तीन तासापुरताच का ?

अकरानंतर कर्फ्युचे आदेश दिल्यानंतर पोलीस प्रशासनाने कंबर कसून बंदोबस्ताला सकाळपासून हजर झाले होते. चौकाचौकात बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. सकाळी 11 वाजेनंतर कारवाईला सुरुवात झाली. मात्र ही कारवाई केवळ दोन तासापुरतीच असल्याने 1 वाजेनंतर शहरातील एकाही चौकात पोलिस दिसून आले नाही. त्यामुळे नागरिक बिनधास्त रस्त्यावर फिरत असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे कर्फ्युचे आदेश केवळ दोन ते तीन तासांपुरताच का? असा सवाल उपस्थित होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या