Tuesday, April 23, 2024
Homeनगर‘सीएमव्ही’ शेतकर्‍यांसाठी डोकेदुखी

‘सीएमव्ही’ शेतकर्‍यांसाठी डोकेदुखी

ज्ञानेश्‍वर खुळे

वीरगाव –

- Advertisement -

निसर्गात अस्थायी स्वरुपात असणार्‍या माव्याच्या 80 प्रजातींमुळे निर्माण झालेला सीएमव्ही (कुकुंबर मोजँक व्हायरस) जगभरातील टोमॅटो

पिकास घातक ठरला असून टोमॅटोसहित ढोबळी मिरची आणि वेलवर्गीय भाजीपाल्याचे या विषाणूने मोठे नुकसान केले आहे. वनस्पती शास्त्रज्ञांसमोर सीएमव्हीच्या उच्चाटनाचे तगडे आव्हान त्यामुळे उभे राहिले आहे.

ग्लोबल वार्मिंगमुळे बदललेल्या वातावरणाचा या रोगाच्या प्रसारात अप्रत्यक्षरित्या मोठा सहभाग आहे. वातावरण बदलामुळे पीकपध्दतीत अमुलाग्र बदल झाल्यामुळे विषाणूंच्या मावा या वाहक किडीच्या प्रसारास मदतच होते. महाराष्ट्रातील भाजीपाला पिकांपैकी मुख्य असणार्‍या टोमॅटो पिकाचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जाते. राज्यात पुणे, अहमदनगर, सातारा, नाशिक हे जिल्हे टोमॅटो उत्पादनात अग्रेसर असून एकूण 43600 हेक्टर क्षेत्रावरील बागायती भागात लागवड केली जाते. रब्बी अथवा उन्हाळी टोमॅटो हमखास आर्थिक परतावा देणारे असल्याने बांग्लादेश आणि आखाती देशात निर्यात होणार्‍या टोमॅटो पिकाकडे शेतकर्‍यांचा कल साहजिकच अधिक आहे.

अलिकडच्या काळात मात्र सीएमव्हीने टोमॅटो पिकावर थैमान घातले असून फळाच्या अपक्वतेची समानता, फळावर पिवळसर वाण येणे यामुळे मार्च ते मे महिन्यातील टोमॅटो उत्पन्नात 50 ते 80 टक्के नुकसान झाल्याच्या तक्रारी वाढत आहेत. पांढर्‍या माशीमुळे होणारा बेगेमो व्हायरस, फुलकिडीमुळे संसर्ग होणारा टोस्पो व्हायरस, संपर्काने प्रसारीत होणारा टोबामो व्हायरस या विषाणूजन्य रोगांचा आधीच सामना करणार्‍या टोमॅटो पिकाला आता माव्यामुळे येणार्‍या सीएमव्हीने अधिक त्रस्त केले आहे.

ढगाळ व दमट वातावरणात माव्याचे प्रजोत्पादन वेगाने होत असल्याने नोव्हेंबर ते एप्रिल महिन्यापर्यंत मावा सक्रिय असतो.प्रमुख विषाणूजन्य रोगांचा मावा हे प्रमुख वाहक असल्याने मावा प्रतिबंध हेच शेतकर्‍यांसमोर प्रमुख आव्हान ठरले आहे. यासाठी रोपवाटिका स्तरावर उच्च दर्जाचे व्यवस्थापन अपेक्षित आहे.शास्त्रीय पध्दतीने उत्पादित व प्रमाणित बियाणांचा वापर गरजेचा असून शास्त्रीय पध्दतीनेच रोपवाटिका स्तरावर रोपांचे संगोपन हे आव्हान ठरणार आहे. जेणेकरून शेतकर्‍यांना निरोगी रोपांचा पुरवठा होण्यास मदत होईल.

कुकूंबर मोजँक व्हायरसपासून बचावासाठी टोमॅटो शेतीच्या कडेने मका, बाजरी,ज्वारीची उभारणी केल्यास माव्याला मोठ्या प्रमाणावर अडथळा ठरुन या विषाणूजन्य रोगापासून टोमॅटोचे नक्की संरक्षण होईल असे बेंगलोरचे वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. कृष्णा रेड्डी यांनी सांगितले आहे.अनेक औषध कंपनीकडून औषधांतर्फे सीएमव्हीवर प्रभावी इलाजाचा खोटा दावा केला जात असून माव्याच्या नियंत्रणातूनच सीएमव्हीपासून टोमॅटोची मुक्ती होईल असा दावाही त्यांनी केला आहे.

निरोगी रोपनिर्मितीची गरज!

सीएमव्हीबाबत अकोले आणि संगमनेर तालुक्यात 750 पेक्षा अधिक तक्रारी आल्या असून 1200 ते 1500 एकर क्षेत्र बाधित झाले होते. फळ काढणीपूर्वी सीएमव्ही लक्षात येतो. जानेवारी ते मार्च दरम्यान लागवड झालेल्या टोमॅटो पिकात पिवळी फळे, असमान पक्वता, ओबडधोबड आणि सुरकुतलेली फळे आढळून येतात. कोणत्याही बाजारपेठेत या फळांचा स्विकार होत नाही. माव्याच्या प्रतिबंधातून रोगाचा सामना करता येईलच शिवाय या विषाणूजन्य रोगाचे रोपवाटिका स्तरावर व्यवस्थापन अपेक्षित आहे. त्यासाठी रोपांचे नायलॉन नेट कव्हर 60-80 मेशखाली संगोपन होणे अपेक्षित असून रोपाच्या बेडमध्ये शेणखत, निंबोळी पेंड प्रति चौ. मी. 1 किलो मिसळणे अपेक्षित आहे. रोपांची हँडलिंगही नायलॉन नेटकव्हरखाली करुन नियमित वेळेतील रोपांवरील रासायनिक औषध फवारणीने सीएमव्हीला प्रतिबंध करणारे टोमॅटो रोप तयार होईलच परंतु, टोमॅटो शेती उभारल्यावर माव्याला प्रतिबंध करणेही गरजेचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या