Friday, April 26, 2024
Homeनगर....त्या काळात ‘अशोक’ची ऊसतोडीची लगबग

….त्या काळात ‘अशोक’ची ऊसतोडीची लगबग

माळवाडगाव |वार्ताहर| Malvadgav

मृग नक्षत्रात काळ्याकुट्ट ढगातून कुठे पाऊस येण्याची चिन्हे तर कुठं रिमझिम सुरू झालेली असते, अशा काळात शेतकर्‍यांची सहाव्यातील ऊस लागवडीची लगबग आतापर्यंत सर्वांनी पाहिलेली आहे .परंतु याच मृग नक्षत्रातील पावसातील काल दि. 12 जून रोजी अखेरच्या ऊसतोडणीची लगबग प्रथमच पाहावयास मिळत असल्याने यंदाच्या 2021-22 च्या गळीत हंगामाची अविस्मरणीय नोंद होऊन अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची आज सांगता होत आहे.

- Advertisement -

गळीत हंगामाच्या अखेरच्या दिवशी कारखाना अधिकारी, कर्मचारी काल भर पावसात उसाच्या फडात दिसून आले. उंदिरगांव गटातील माळवाडगाव शिवारात गट नं.245 श्रीधर किसनराव आसने एक हेक्टर, सुदाम श्रीधर आसने, रेखा सुदाम आसने गट नं.65 क्षेत्र चार एकर, खानापूर शिवारात बाबासाहेब बारकू बुट्टे, एक एकर, भामाठाण शिवारात अण्णासाहेब ढोकणे एक एकर ऊस असा एकूण साडे आठ एकर ऊस तोडण्यासाठी 11 जूनला हार्वेस्टिंग मशिनसह ताफा तैनात करण्यात आला.

परंतु पाऊस पडल्याने मशिन बंद पडले. कारखाना सहा. शेतकी अधिकारी संतोष सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली फिल्डमन सुरेश मदने, भाऊसाहेब आसने, राजेंद्र मुठे, गुलाब वाघ यांनी तोडणी मजूर उपलब्ध करून भर पावसात ऊस तोडणी करून घेतली. एरव्ही बांधावर उभे राहून वाहन स्लीप देणाऱे कर्मचारी पावसात, चिखलात पाहून शेतकरी अवाक झाले.

अशोक सहकारी साखर कारखान्याने या गळीत हंगामात कार्यक्षेत्रातील ऊस बाहेरील कारखान्यास पाठवू या अपेक्षेने क्षमतेपेक्षा अतिरिक्त उसाची नोंद केल्याने ऊस तोडणी प्रोग्राम जूनच्या दुसर्‍या आठवड्यापर्यत चालला. मार्च एप्रीलमध्ये आटोपणारा गळीत हंगाम एखाद्या हंगामात 15 मेपर्यंत चाललेला आहे. परंतु यंदाचा 21-22 चा हंगाम पावसाळ्यात 13 जूनपर्यंत चालला. कडक उन्हाळ्यात मे महिना सुरू होताच ऊस तोड मजकुरासह, हार्वेस्टिंग मशिन लेबरने ऊस उत्पादक शेतकर्‍यांकडून कारखान्याच्या मोबदल्या व्यतिरीक्त एक्स्ट्रा पैसे घेऊन ऊस तोड सुरू केली.

जसजसा सिझन लांबणीवर चालला तसतशी शेतकर्‍यांना आपला ऊस शिल्लक राहतो की काय? याची चिंता वाटू लागल्याने पुढार्‍यापासून, डॉक्टर, वकिल, पत्रकार यांच्यासह कारखाना अधिकारी, कर्मचारी सर्वांनाच तोडणीसाठी मजुरांना पैसे मोजावे लागले. एक जूननंतर बिगर मोसमी पावसाने मेहरबानी केल्याने या बारा दिवसांत कारखाना केवळ हार्वेस्टिंग मशिनमुळे 25 हजार टन उसाचे गाळप करून आपले संपूर्ण गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करू शकला.

8 लाख 53 हजार टन गाळप 2 लाख 50 हजार टन बाहेर पाठविला

अशोक सहकारी साखर कारखाच्याचे शेतकरी अधिकारी एन .डी. चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कारखान्याने 8 लाख 53 हजार टन उसाचे गाळप करून आम्ही उद्दिष्ट पुर्ण करू शकलो. कारखान्यामार्फत 2 लाख 50 हजार टन ऊस बाहेरील कारखान्याना पाठविण्यात आला. सर्व गाळपाचे उद्दिष्ट हार्वेस्टिंग मशिनमुळे पूर्ण करू शकलो. जून महिन्यात पावसाने अडथळा आला नाही, ही एक जमेची बाजू असल्याने कुणाचाही ऊस शिल्लक राहिला नसल्याचे चौधरी यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या