Wednesday, April 24, 2024
Homeनगरमृत्यूचे दाखले घेण्यासाठी होतेय गर्दी

मृत्यूचे दाखले घेण्यासाठी होतेय गर्दी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेच्या हद्दीतील रूग्णालयांमध्ये करोना रूग्ण उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर महापालिकेच्यावतीने अंत्यसंस्कार केले जातात. त्याच्या मृत्यूची नोंद महापालिकेकडे होत आहे. यामुळे मृत्यूचे दाखले महापालिकेकडून दिले जात आहेत. या दाखल्यासाठी जिल्ह्याभरातून लोक जुन्या महापालिकेच्या कार्यालयाबाहेरील सुविधा केंद्रात गर्दी करत आहेत यामुळे जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांमुळे करोना संसर्गाचा धोका होण्याची भीती आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते.

- Advertisement -

करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात मनपा प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना सुरू आहेत. दुसरीकडे मात्र मनपाच्या कार्यालयातच नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसत आहे. मृत्यूचे दाखले घेण्यासाठी सुविधा केंद्राच्या बाहेर गर्दी होत आहे. मृत्यूचे दाखले घेण्यासाठी जिल्हाभरातून नागरिक त्याठिकाणी आलेले असतात. मनपा प्रशासनाकडून तेथे कोणतेच नियोजन केले जात नाही. नागरिकांकडून शारिरीक अंतराचे पालन केले जात नाही. यामुळे करोना वाढीचा धोका आहे.

नगरमध्ये चांगल्या आरोग्य सुविधा मिळत असल्याने जिल्हाभरातून करोना उपचारासाठी नागरिक नगरमध्ये दाखल होत आहे. उपचारादरम्यान रूग्णाचा मृत्यू झाल्यास त्याची नोंद मनपाकडे होते. यामुळे संबंधीत रूग्णाच्या नातेवाईकांना मृत्यूचा दाखल मनपाकडे मिळतो. मृत व्यक्तीच्या दाखल्याची गरज असल्याने नातेवाईक आता सुविधा केंद्रात गर्दी करत आहेत.

करोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांना मनपाच्या सुविधा केंद्रात दाखले दिले जात आहेत. दाखला मिळण्यासाठी सुरूवातीला एक अर्ज भरून द्यावा. तो अर्ज कार्यालयात स्वीकारल्यानंतर नातेवाईकाला पावती दिली जाते. त्या पावतीवर दाखला कधी मिळणार आहे, याची तारीख नमूद केलेली असते. नागरिकांनी त्याच तारखेला येऊन दाखले घेऊन जावे. विनाकारण त्याठिकाणी थांबून गर्दी करू नये.

– रवींद्र बारस्कर (सभागृह नेते मनपा)

करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना मृत्यूच्या दाखल्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. तरी देखील दाखला मिळण्याची शाश्वती नसते. गर्दी झाल्याने करोनाचा धोका आहे. दाखला घेण्यासाठी जिल्ह्यातून लोक येत असल्याने दाखला देणार्‍या कर्मचार्‍यांना करोनाचा धोका आहे. यामुळे मनपाने पोस्टाने घरपोहच दाखले देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे केली आहे.

– संतोष नवसुपे (अध्यक्ष, शिव राष्ट्र सेना)

- Advertisment -

ताज्या बातम्या