रमजान ईदच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी

जुने नाशिक । प्रतिनिधी

पवित्र रमजान ईदचा सण अवघे काही दिवसांवर येऊन ठेपल्याने ईदच्या खरेदीसाठी बाजारात बुरखाधारी मुस्लिम महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत आहे. तर ईदनिमित्त येथील दूध बाजार परिसरातील रमजानच्या विशेष बाजारात मध्यरात्रीपर्यंत खवय्यांची गर्दी दिसून येत आहे. तसेच मुलतानपुरा हा परिसर मुंबईतील मदनपुरासारखा रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. दरम्यान काल रविवारची सुट्टी असल्यामुळे बाजारात अधिक गर्दी दिसून आली.

ईदच्या खरेदीसाठी शहरातील दहीपूल, मेनरोड, कॉलेजरोड, शालिमार, पगडबंद लेन, सरस्वती लेन, भद्रकाली, शिवाजी मार्केट आदी भागातील बाजारपेठांमध्ये मुस्लिम महिलांची गर्दी दिसून येत आहे. ईदनिमित्त महात्मा फुले मार्केट परिसरातील बाजारात रंगीबेरंगी आकर्षक सुतरफेणीची अनेक दुकाने थाटली आहेत. याशिवाय शेवाया, ड्रायफ्रूट, खोबरे आदी पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. दरम्यान सालाबाद प्रमाणे येथील हाजी युनूस तांबोळी यांनी दूध बाजारातील जैन मंदिराच्या जागेत मखदूम ड्रायफ्रूटचे दुकान थाटले आहे.

याठिकाणी शहर परिसरातील मुस्लिम बांधवांसह ग्रामीण भागातील अनेक मुस्लिम बांधव खरेदीसाठी एकच गर्दी करीत आहे. उपवास सोडल्यानंतर विविध पदार्थांचे सेवन करण्यासाठी दूध बाजार परिसरातील हॉटेल व तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेली विविध पदार्थांची दुकानांवर खवय्यांची मध्यरात्रीपर्यंत मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. यामध्ये शहरासह नाशिक रोड, देवळाली कॅम्प, नवीन नाशिक, सातपूर व ग्रामीण भागातील खवय्यांचा समावेश आहे.

उपवास केल्यानंतर सायंकाळी रोजा सोडण्यासाठी शहरातील सर्व मशिदींमध्ये लोक सहभागातून इफतारीची मोफत सोय करण्यात आली आहे. यावेळी परिसरातील लोकांसह खरेदीसाठी शहरात येणार्‍या भाविकांची चांगली सोय झाली आहे.

मुस्लिम बांधवांचा मोठा सण असलेल्या पवित्र रमजान ईदसाठी बाजारात कपडे खरेदीसाठी लहान- मोठे, आबाल- वृद्ध गर्दी करीत आहे. दरम्यान मुस्लिम बहुल भागात अनेक घरांमध्ये देखील कपडे विक्रीला आले आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत अशा ठिकाणी गर्दी होत आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *