Saturday, April 27, 2024
Homeनगरदीडशेहून अधिक व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई

दीडशेहून अधिक व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

यंदा गणेशोत्सव व मोहरम सणांवर करोनाचे सावट आहे. यामुळे मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली असून साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. उत्सव साध्या पद्धतीने होणार असला तरी या काळामध्ये उपद्रवी व गुन्हेगारांकडून त्याला गालबोट लागू नये, म्हणून शहर व उपनगरातील दीडशेहून जास्त व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

अनेकदा उपद्रवी व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांकडून सण-उत्सवाच्या काळात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते. त्यामुळे असा प्रकार उद्भवू नये यासाठी उपद्रवी व्यक्ती व गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात येते. गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांना उत्सवाच्या कालावधीत शहरातून हद्दपार होण्याची नोटीस बजावण्यात येते.

शहर व परिसरात यावर्षी गणेशोत्सव व मोहरम साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनातर्फे गणेशोत्सवाकरिता मंडप टाकण्यास मनाई करण्यात आली आहे. यासह गणेश आगमन, विसर्जन व मोहरमच्या कुठल्याही मिरवणुकीला परवानगी देण्यात येणार नसल्याने पोलिसांवरील ताण यंदा कमी असणार आहे.

मात्र संवेदनशील मानल्या जाणार्‍या नगर शहराकडे पोलीस बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. प्रत्येक सार्वजनिक गणेश मंडळाला पोलिसांनी नोटिसा दिल्या आहेत. प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटीचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असे नोटिशीद्वारे सुनावले आहे.

रेकॉर्डवरील गुन्हेगारांसोबत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या राजकीय पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते पोलिसांच्या रडारवर आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. राजकीय पक्षाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांवर देखील पोलिसांची नजर आहे.

या आरोपींवर देखील प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. पूर्वीचे गंभीर गुन्हे दाखल केलेले, हद्दपारीची कारवाई झालेल्या गुन्हेगारांचा देखील यात समावेश आहे. अशा शहर व उपनगरातील 160 हून अधिक जणांची यादी पोलिसांनी तयार केली आहे.

या गुन्हेगारांना ताब्यात घेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच शहरात अनेकदा दंगलीचे प्रकार घडले आहेत. या दंगलीमध्ये अटक झालेले व जामिनावर सुटलेल्या आरोपींवर देखील पोलिसांचे लक्ष आहे.

तीन ठिकाणी दंगल नियंत्रणाचे प्रात्यक्षिक

गणेशोत्सव व मोहरम उत्सव काळात शहरात शांतता रहावी, यासाठी शहर पोलिसांकडून जय्यत तयारी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी शहरात तीन ठिकाणी दंगल नियंत्रणाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. नगरचा मोहरम राज्यात प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवातही मोठी गर्दी होत असते. यंदा मात्र, हे दोन्ही उत्सव करोनामुळे साध्या पद्धतीने साजरे केले जाणार आहेत. शहरात शांतता रहावी म्हणून तिन्ही पोलीस ठाणे हद्दीत दंगल काबू प्रात्यक्षिक घेण्यात आले. तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतील प्रोफेसर चौक, कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील कापड बाजार, भिंगार पोलीस ठाणे हद्दीतील मुकुंदनगरमध्ये हे दंगल काबू प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी दशहतवादी विरोधी पथक, राज्य राखीव दल, श्वान पथक, पोलीस दल यांना पाचारण करण्यात आले होते. हे पाहण्यासाठी नगरकरांनी गर्दी केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या