Thursday, April 25, 2024
Homeनगरसराईत गुन्हेगार काळे टोळीविरूध्द मोक्का

सराईत गुन्हेगार काळे टोळीविरूध्द मोक्का

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अहमदनगरसह नाशिक जिल्ह्यात संघटीत गुन्हेगारी करणार्‍या लहु बबलु काळे (रा. पळसे ता. जि. नाशिक) टोळीविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमातील (मोक्का) कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. काळे टोळीमध्ये अन्य तिघांचा समावेश असून ते श्रीरामपूर तालुक्यातील रहिवासी आहेत. योगेश सिताराम पाटेकर (वय 19), संदीप दादाहरी काळे (वय 32 दोघे रा. वडाळा महादेव ता. श्रीरामपूर) व विशाल बालाजी भोसले (वय 29 रा. राऊत वस्ती, अशोकनगर ता. श्रीरामपूर) अशी कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत. तिघे अटकेत असून टोळी प्रमुख काळे पसार आहे.

- Advertisement -

14 जानेवारी, 2022 मकरसंक्रांतीच्या दिवशी भिंगार पोलीस ठाणे हद्दीतील कानडे मळा येथे महिलेच्या गळ्यातील चार तोळे सोन्याचे दागिने बळजबरीने चोरून नेले होते. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भादंवि कलम 394, 411, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपासादरम्यान सदरचा गुन्हा काळे टोळीने केल्याचे समोर आले. आरोपी काळे हा नाशिक येथून अहमदनगर जिल्ह्यात येऊन त्याच्या येथील साथीदारांसह महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र बळजबरीने चोरी करत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. काळे टोळीविरूध्द भिंगार, संगमनेर तालुका, संगमनेर शहर, श्रीरामपूर तालुका, कोतवाली, कोपरगाव शहर, तसेच नाशिक जिल्ह्यातील आडगाव, सिन्नर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे 11 गुन्हे दाखल आहेत.

सदर टोळीविरूध्द मोक्का कलमान्वये कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव भिंगार कॅम्प पोलिसांनी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावास महानिरीक्षक डॉ. शेखर पाटील यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे (नगर शहर) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, उपनिरीक्षक बेंडकोळी, अंमलदार सोनार, खेडकर यांनी सदरचा प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे पाठविला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या