Friday, April 26, 2024
Homeनगरसराईत गुन्हेगाराची मार्केट यार्डमध्ये दहशत

सराईत गुन्हेगाराची मार्केट यार्डमध्ये दहशत

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

सराईत गुन्हेगाराने मार्केट यार्डमध्ये एका व्यापार्‍याला मारहाण करत हत्याराचा धाक दाखवून दहशत निर्माण केली.

- Advertisement -

यावेळी परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते. बिरज्या जाधव (पूर्ण नाव माहिती नाही रा. स्टेशनरोड, नगर) व त्याचा एक अनोळखी साथीदार यांनी ही दहशत निर्माण केली. याप्रकरणी व्यापारी सुधीर रूपचंद खिळे (वय- 30 रा. सारसनगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात जबरी चोरी, आर्म अ‍ॅक्ट कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळी मार्केट यार्ड मध्ये व्यापारी खिळे यांनी शेतकर्‍यांकडून ऊस विकत घेतला. खिळे हे ऊसाचे पेंमेट शेतकर्‍यांना देत असताना बिरज्या व त्याचा एक साथीदार त्यांच्याकडे आला. त्यांच्या हातामध्ये हत्यार होते. बिरज्याने खिळे यांच्या तोंडावर बुक्की मारून त्यांच्या हातामधील 900 रूपये हिसकावून घेतले.

हातामधील हत्यार हवेत फिरवून, कोणी जर मध्ये आले तर एका एकाला संपवून टाकील असे म्हणत परिसरात दहशत निर्माण केली. काही वेळाने बिरज्या व त्याचा साथीदार तेथून निघून गेले. घटनेची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाल्यानंतर शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, सहाय्यक निरीक्षक हेमंत भंगाळे यांनी मार्केट यार्ड परिसरात भेट दिली. आरोपी बिरज्या विरोधात गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत भंगाळे करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या