Friday, April 26, 2024
Homeनगरनगर : शहरातील दुचाक्या चोरणारी टोळी पकडली

नगर : शहरातील दुचाक्या चोरणारी टोळी पकडली

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

शहर व उपनगरातील दुचाक्या चोरून ग्रामीण भागात विक्री करणार्‍या चौघांच्या टोळीला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

प्रकाश शंकर भुजबळ (वय- 30 रा. सैनिकनगर, भिंगार), दीपक तान्हाजी लंवाडे (वय- 22), दिलीप तान्हाजी लंवाडे (वय- 22 दोघे रा. मांडवे ता. पाथर्डी), महेश श्रीकिरण देशमुख (वय- 22 रा. कासार पिंपळगाव ता. पाथर्डी) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपनीच्या 25 दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

शहर व परिसरातून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. चोरीची दुचाकी घेऊन जाणार्‍या एका संशयिताला माळीवाडा परिसरातील स्थानिकांनी पाहिले. त्यांनी तत्काल कोतवाली पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नितीन रणदिवे यांच्या पथकाला निरीक्षक लोखंडे यांनी कारवाई करण्याबाबत सुचना केल्या.

पोलिसांनी माळीवाडा परिसरात सापळा लावून प्रकाश भुजबळ या दुचाकी चोरट्याला अटक केली. त्याने शहरातून दुचाक्या चोरी करत असल्याची कबूली दिली. यासाठी दिपक लवांडे व दिलीप लवांडे या दोघा सख्या भावांची मदत घेत असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी लवांडे बंधूंना दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली. चोरीच्या दुचाकी विक्री बाबत पोलिसांनी आरोपींकडे चौकशी सुरू केली.

पाथर्डी तालुक्यातील महेश देशमुख याच्या मदतीने सर्व चोरीच्या दुचाकी ग्रामीण भागात कमी किंमतीला विक्री करत असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली. पोलिसांनी देशमुख याला या गुन्ह्यात अटक केली. यानंतर चोरीच्या दुचाकी पाथर्डी, शेवगाव, नेवासा तालुक्यातून हस्तगत केल्या. आतापर्यंत 25 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. अजून काही दुचाक्या मिळून येण्याची शक्यता आहे.

पोलीस त्यादृष्टीकोनातून तपास करीत आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील, शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नितीन रणदिवे यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी गणेश धोत्रे, नितीन शिंदे, शाहीद शेख, बापुसाहेब गोरे, भारत इंगळे, प्रमोद लहारे, सुजय हिवाळे, प्रशांत राठोड यांनी ही कारवाई केली.

करोनामुळे नोकरी गेली आणि दुचाकी चोरीला सुरूवात झाली…

आरोपी प्रकाश भुजबळ हा शहरातून दुचाकी चोरी करत होता. दुचाकी चोरी बाबतची कला त्याला अवगत होती. परंतू, यासाठी कोणाची तरी मदत आवश्यक होती. भुजबळ याची गाठ दिपक लवांडे व दिलीप लवांडे या दोघा सख्या भावांसोबत पडली. लवांडे बंधू लॉकडाऊनपूर्वी पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसीमध्ये कंपनीत कामाला होते. करोनामुळे त्यांची नोकरी गेली. यामुळे त्यांनी भुजबळ याला दुचाकी चोरीत मदत करण्याचे ठरविले. आरोपी भुजबळ व लवांडे बंधू यांनी नगर शहर व उपनगरातून दुचाकी चोरी करण्यास सुरवात केली. चोरीच्या दुचाकी विक्री करण्यासाठी त्यांनी महेश देशमुख याच्याशी संपर्क केला. देशमुख याने दुचाकी विक्री करण्याची तयारी दर्शविली. देशमुख याने ग्रामीण भागातील लोकांना कमी किंमतीमध्ये या दुचाकी विक्री केल्या. पोलिसांनी त्या सर्व हस्तगत केल्या आहे.

दुचाकीची अशी होत असे विक्री

आरोपी भुजबळ व लवांडे बंधू यांनी चोरीच्या दुचाकी घेऊन देशमुख याच्याशी संपर्क केला. देशमुख याने ग्रामीण भागातील लोकांना या दुचाकी कमी किंमतीमध्ये विक्री करण्यासाठी सुरूवात केली. आमच्याकडे दुचाकी आहे. त्या जुन्या असल्याने कमी किंमतीमध्ये मिळतील असे म्हणत देशमुख याने लोकांना दुचाकी घेण्यास भाग पाडले. दुचाकी नावावर कधी केली जाईल असे देशमुख याला विचारल्यावर तो दहा ते बारा दिवसांची मुदत देत होता. दहा ते पंधरा हजार रूपये दुचाकीची किंमत ठरली जात. सुरूवातीला दोन ते पाच हजार रूपये घेऊन दुचाकी ताब्यात दिली जात होती. दुचाकी नावावर केल्यानंतर बाकी पैसे द्या असे तो ग्राहकांना सांगत असे. पंरतू, नंतर त्यांच्याकडे तो जात नव्हता.

- Advertisment -

ताज्या बातम्या